Jump to content

सर्गेई बुबका

सर्गेई नझारोविच बुबका उंच उडीचा (पोल व्हॉल्ट) विक्रमादित्य म्हणून जगभर ओळखला जातो.


तत्कालीन सोवियेत संघाच्या युक्रेन राज्यातील लुहान्सक शहरात डिसेंबर ४ १९६३ला सर्गेईचा जन्म झाला. त्याचे वडील सेनेत होते तर आई वैद्यकीय कामात मदतनीस म्हणून काम करीत असे. त्या दोघांनाही कोणत्याही खेळाचे ज्ञान नव्हते. सर्गेईचा मोठा भाऊ वासिली बुबका सुद्धा उंच उडी खेळात पारंगत होता. वासिलीने ५.८६ मी.ची उंच उडी मारून वैयक्तिक विक्रम नोंदविला.

सर्गेईने वयाच्या ११ व्या वर्षी वोरोशिलोव्हग्राद येथील चिल्ड्रन अँड युथ स्पोर्ट् स्कुल मध्ये विताली पेत्रोव्ह यांच्याकडून उंच उडी खेळाचे यथासांग प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. खेळातील आणखी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी १९७८ साली गुरू वितालीसह सर्गेई दोनेत्स्क येथे दाखल झाला.

सर्गेईची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १९८१ साली युरोपियन ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये भाग घेऊन सुरू झाली. या स्पर्धेत सर्गेई ७ व्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर १९८३ साली हेलसिंकी येथे झालेल्या विश्व स्पर्धेत ५.७० मी. (१८ फु. ८ इं.)ची उंच उडी मारत सर्गेईने आपले पहिले सुवर्ण पदक पटकाविले. तेव्हापासून १९९७ पर्यंत सर्गेई बुबका नावाचे वादळ पोल व्हॉल्ट या खेळात सक्रीय राहिले. सर्गेई बुबका आणि विश्वविक्रम असे पक्के समीकरणच तयार झाले.

२६ मे १९८४ या दिवशी सर्गेईने तेव्हाचा विश्वविक्रम मोडत ५.८५ मी.ची उंच उडी मारून नवा विक्रम प्रस्थापित केला, त्याच्या पुढील आठवड्यात ५.८८ मी.ची उडी मारून एक नवा विक्रम केला तर पुढील महिन्याभरातच ५.९० मी.ची उडी मारून आणखी एक नवा विक्रम केला. १३ जुलै १९८५ या दिवशी पॅरीस येथे ६.०० मी. (१९ फु. ८ इं.)ची उंच उडी मारून सर्गेईने आणखी एक नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. इतकी उंच उडी या आधी जगातील एकाही खेळाडूने मारली नव्हती आणि हा नवा विक्रम कोणी मोडू शकेल असे वाटतही नव्हते. कारण सर्गेईला कोणीही आव्हान देऊ शकणारे नव्हते. या विक्रमानंतर सर्गेई बुबका सतत दहा वर्षे मेहनत करीत राहिला, नव नवीन विक्रम प्रस्थापित करीत राहिला. १९९४ साली सर्गेईने ६.१४ मी. (२० फु. १ ३/४ इं) इतकी उंच उडी मारून नवा जागतिक उच्चांक गाठला. ६.१० मी. पेक्षा जास्त उंच उडी मारणारा तो जगातील पहिला आणि एकमात्र खेळाडू ठरला आहे. (जून २००९ पर्यंत अबाधीत)

सर्गेईने ६.०० मी. किंवा त्यापेक्षा जास्त उंच उडी तब्बल ४५ वेळा मारली आहे. त्या उलट उंच उडीच्या इतिहासात इतर सर्व खेळाडूंनी मिळून ४२ वेळा ६.०० मी किंवा त्यापेक्षा जास्त उंच उडी मारली आहे. त्याने उंच उडीचा राष्ट्रीय विक्रम १८ वेळा तर आंतरराष्ट्रीय विक्रम १७ वेळा मोडला आहे. सर्गेई बुबका आणि विताली पेत्रोव्ह यांनी शोधून काढलेली अभिनव पद्धत नव नवीन विक्रम करण्यास महत्त्वपूर्ण ठरली.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ॲथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) ही संस्था दर दोन वर्षांनी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करते. त्यातील सर्गेईचा दबदबा:-

वर्ष स्थळ उडी

(मी. मध्ये)

पदक
१९८३ हेलसिंकी

५.७०

सुवर्ण
१९८७ रोम

५.८५

सुवर्ण
१९९१ तोक्यो

५.९५

सुवर्ण
१९९३ स्टटगार्ट

६.००

सुवर्ण
१९९५ गॉथेनबर्ग

५.९२

सुवर्ण
१९९७ ॲथेन्स

६.०१

सुवर्ण

विक्रमादित्य सर्गेई ऑलिंपिक बाबतीत मात्र दुर्दैवी ठरला. त्याच्या काळाता झालेल्या १९८४ सालातील ऑलिंपिक खेळांवर सोवियत संघाने बहिष्कार टाकला होता. १९८८ च्या सोल ऑलिंपिक मध्ये एकमात्र सुवर्णपदक सर्गेईला मिळ्विता आले. १९९२ बार्सिलोना मध्ये तो अपात्र ठरल्याने बाद झाला. १९९६ अटलांटा येथील ऑलिंपिक मध्ये टाचेच्या दुखण्यामुळे सर्गेई भागच घेऊ शकला नाही. तर २००० सालातील सिडनी ऑलिंपिक मध्ये त्याने ५.७० मी.ची उडी मारूनही तो अपात्र ठरला.