Jump to content

सरोजिनी बाबर


सरोजिनी बाबर
जन्मजानेवारी ७, १९२०
बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यूएप्रिल २०, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी, कविता
विषय लोकसंस्कृती, लोकगीत

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल २०, २००८) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या.[] त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.[]

बालपण व शिक्षण

सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्यांनी पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात येथे प्रवेश घेतला. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

कारकीर्द

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास, लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन इत्यादी कामे त्यांनी पार पाडली.सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.

लोकसाहित्य विषयातील विशेष योगदान

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या.[] त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले.[] "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले.[]

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला चिं.ग. कर्वे हे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. तसेच सन 1958 मध्ये नियोजन आयोगाच्या शिक्षण विभागाच्या शिफारसीनुसार दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्त्री शिक्षणासंबंधीच्या आयोगाच्या त्या सचिव होत्या.

सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ

महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचे सरोजिनी बाबर यांच्याकडे येणे-जाणे असायचे. त्यांपैकी काही जण : प्र.के. अत्रे, कवी गिरीश, बा.ग.जगताप, ग.ल.ठोकळ, रियासतकार सरदेसाई, सेतुमाधवराव पगडी, डॉ.वा.भा.पाठक, बाबासाहेब पुरंदरे, म.म. द.वा.पोतदार द.रा. बेंद्रे, श्री.म.माटे, आबासाहेब मुजुमदार, कवी यशवंत, डॉ. के.ना. वाटवे, आनंदीबाई शिर्के, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, वगैरे. या सर्वांच्या सहवासात साहित्यिक चर्चा घडत, इतिहासविषयक विवेचने होत असत. वडिलांशी (कृ.भा. बाबर यांच्याशी) देखील कितीतरी वेळा सरोजिनी बाबर यांची सांगोपांग चर्चा होत असे.

वक्तृत्व आणि संगीत

सरोजिनी बाबर यांची वक्तृत्व कला देखील उत्तम व वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांनी भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचेही शिक्षण काही काळ घेतले होते. गजाननराव वाटवे, गोविंदराव टेंबे,भीमसेन जोशी, सुधीर फडके,बबनराव नावडीकर,जयमाला शिलेदार,वत्सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर यांच्याशी आपुलकीचे संबंध असल्याने त्यांच्या संगीत कलेवरती थोरामोठ्यांचे गायनसंस्कार होत राहिले. लोकसंगीताची अगदी विलक्षण आवड असल्याने त्यांचा लोकगीतांवर अगदी विशेष प्रभुत्व होते. त्या अत्यंत उत्तम लोकगीते म्हणत असत.त्यांचा लोकगीतांवरील अमर्याद शब्दसंग्रह व गायनकौशल्यातले वेगळेपण श्रोत्यांसाठी खास आकर्षणाचा बिंदू ठरत असे.

बाबर यांचा सहभाग असलेल्या समित्या

  • आकाशवाणीच्या पुणे केंद्राची सल्लागार समिती : आकाशवाणीवरील अनेक कार्यक्रमात सरोजिनी बाबर यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. शिवाय लोकवाग्मय -लोकगीते, लोकजीवन, लोकसंस्कृतीवर आधारित अशा १२ विषयांवर दरमहा एक अशा १२ उत्कृष्ट कार्यक्रमांची मालिका आपल्या सहभगिनींना सोबत घेऊन सदर केली. काही कार्यक्रम आकाशवाणी महोत्सवात (live) प्रक्षेपणाचे वेळी सादर केले.
  • दूरचित्रवाणी : २३ जानेवारी १९९० पासून मुंबई दूरदर्शनने सरोजिनी बाबर यांची ’रानजाई” ही १३ भागांची मालिका सादर केली. यातील प्रत्येक भागाचे लेखन करून अनेक मराठी ठिकाणांचे, गाण्यांचे, नृत्यांचे, रिवाजांचे चित्रण करून कवयित्री शांताबाई शेळके यांच्याबरोबर केलेली चर्चा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक ठरली.
  • लोकसाहित्यविषयक संमेलन : मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्यविषयक संमेलन भरवले. त्यात अनेक परिसंवाद घडवले. लोककलांचे प्रदर्शनही उत्कृष्टपणे उभारले.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : या मंडळामुळे अनेक चांगल्यी माहितीपूर्ण पुस्तकांची निर्मिती होत होती.
  • गुरुवर्य सोनोपंत (मामा) दांडेकर प्रमुख असलेली नामदेव गाथा संशोधन समिती. या समितीने तब्बल ११ वर्षे संत नामदेवांच्या एकेका अभंगांचा निरनिराळ्या पोथ्यांतील पाठांचा अभ्यास करून नामदेवांच्या लेखनाची अधिकृत प्रत प्रसिद्ध केली.
  • नाट्य परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) : -रंगमंचावर सदर केल्या जाणाऱ्या नाटकांच्या आणि तमाशांच्या संहिता तपासून त्यात वेळप्रसंगी दुरुस्त्या करवून घेऊन संमती देणारी ही समिती होती.
  • समाज शिक्षण माला : केवळ नवशिक्षित जनसामान्यच नव्हे, तर प्रचंड अशा विद्वानांमध्येही ’समाज शिक्षण माला’ प्रिय झाली. एकूण ५५० पुस्तकांमध्ये, स्वतः श्री कृ.भा.बाबर यांची एकूण ९९ पुस्तके, तसेच सरोजिनी बाबरांची एकूण ८७ पुस्तके, त्यांच्या दोघी धाकट्या भगिनी - कुमुदिनी पवार यांची १८ पुस्तके आणि शरदिनी मोहिते यांची ५१ पुस्तके, अशी एकूण २५५ पुस्तके ही या बाबर घराण्यातील लेखकांची झाली. या व्यतिरिक्त, समाजातील अनेक नामवंत विद्वान लेखकांनी उर्वरित २९५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ग.ल. ठोकळ, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, शरदचंद्र गोखले, सेतू माधवराव पगडी, गंगुताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ.रा.ना. दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, दत्तो वामन पोतदार, गोविंदस्वामी आफळे, बा.भ. बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, बापू वाटवे, बबनराव नावडीकर, ना.सी.फडके, मालतीबाई दांडेकर, मृणालिनी देसाई, नानासाहेब गाडगीळ, गो.नी. दांडेकर, शांता शेळके, राम शेवाळकर, जयंत नारळीकर व अशा असंख्य प्रतिभावान लेखकांची नावे आहेत. वडील गुरुवर्य कृ.भा. बाबर, म्हणजेच अण्णा असेपर्यंत मालेचे २८५ अंक निघाले. त्यानंतरही सरोजिनी बाबर यांनी नेटाने प्रकाशन चालू ठेवले. आणि ५५० पुस्तकांचा मनोरा उभा राहिला. या प्रकाशन सोहळ्याला महमहोपाध्याय द.वा. पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे विद्वान, साहित्यिक, राजकीय पुढारी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून असत. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, मधुकरराव चौधरी, ना.ग .गोरे, राजाराम बापू पाटील, मोहन धारिया, शरद पवार, नंदिनी सत्पथी असे काही पुढारी, शंतनुराव किर्लोस्कर, बी.जी. शिर्के यांच्यासारखे उद्योगपती आवर्जून येत असत. प्रौढ शिक्षणाचे समाज शिक्षण मालेने काम केले.
  • समाज शिक्षण प्रकाशन : या प्रकाशनाने सरोजिनी बाबर यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली.

सरोजिनी बाबर यांची पुस्तके[]

कादंबऱ्या

  • अजिता (१९५३)
  • आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
  • इथं गोष्ट संपली
  • कमळाचं जाळं (१९४६)
  • तू भेटायला नको होतास
  • स्वयंवर (१९७९)
  • हिरवा चुडा

कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह

  • आमची गाणी
  • काळी मखमल
  • कुलाचार
  • खिरापत
  • खुणेची पाने
  • गुलाबकळी
  • ग्रामलक्ष्मी
  • चंद्राची भारजा
  • चिंचेची पत्रावळी
  • झालं गेलं सांगते
  • डोंगरची मैना
  • देवदर्शन
  • धरित्रीच्या लेकी
  • नवलाख तारांगण
  • नवलाखी हार
  • नव्याची पुनव
  • निरशा दुधाची घागर
  • निळे डोळे
  • पाटपाणी
  • भांगातुरा
  • भिंगरी
  • भूक लाडू तहान लाडू
  • मंगलाक्षता
  • महिला मंडळ
  • मानवी प्रवास
  • माहेरचा चंद्र
  • मी माझ्या घरची
  • मुक्तांगणं
  • यशोधरा
  • राधाई
  • राही रुक्मिणी
  • रुखवत
  • सुशोभन
  • स्थित्यंतर
  • स्वारी सुखात आहे

काव्यसंग्रह

  • चाफेकळी
  • झोळणा (१९६४)

महिलांविषयक

  • मराठीतील स्त्रीधन
  • वनिता सारस्वत (१९६१)
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  • स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

बालवाङ्मय

  • काचेची पेन्सील
  • जम्माडी जम्मत : भाग १ आणि २
  • बालनाटिका : भाग १ ते ४
  • भारतीय स्त्रीरत्‍ने : भाग १ ते ४

इतर

  • भारतीय स्त्री शिक्षण संस्था
  • भाषा व संस्कृती
  • मराठी लोककथा
  • महाराष्ट्र : लोकसंस्कृती व साहित्य
  • रेशीम गाठी
  • लोकगीतातील सगे सोयरे
  • लोकसाहित्य शब्दकोश

संपादने[]

  • आदिवासींचे सण-उत्सव
  • एक होता राजा
  • कारागिरी (१९९२)
  • कुलदैवत
  • छंद माझा आगळा
  • जनलोकांचा सामवेद
  • जाई मोगरा
  • जा माझ्या माहेरा
  • तीर्थांचे सागर
  • दसरा दिवाळी
  • नंदादीप
  • नादब्रम्ह
  • बाळराजे
  • भोंडला भुलाबाई
  • महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
  • मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
  • रांगोळी
  • राजविलासी केवडा
  • लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत
  • लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती
  • लोकसाहित्य : शब्दकोश
  • लोकसाहित्य साजशिणगार
  • वसंतदादा गौरव ग्रंथ
  • वैजयंती
  • श्रावण भाद्रपद
  • समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
  • सांगीवांगी
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी

सहसंपादित केलेली पुस्तके

  • इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
  • एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
  • साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
  • सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी

आत्मचरित्र

  • माझ्या खुणा माझ्या मला

मुलाखत

मुंबई दूरदर्शनवरून २३ डिसेंबर १९८४ला प्रक्षेपित झालेली "प्रतिभा आणि प्रतिमा" या कार्यक्रमात सरोजिनी बाबर यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली.

भूषविलेली पदे

  • १९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
  • १९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
  • १९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार[]

  • २५ मे १९८४ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे गौरववृत्ती प्रदान करण्यात आली.
  • ५ फेब्रुवारी १९८२ला राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’ (२३ डिसेंबर १९९७)
  • ७ सप्टेंबर १९९७ला शारदा विद्यापीठातर्फे ऋषीपंचमी निमित्त सत्कार करण्यात आला.
  • ३० जानेवारी १९९२ला कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठातर्फे भद्रकाली पुरस्कार प्रदान केला गेला.
  • २६ एप्रिल २००७ला भारती विद्यापीठातर्फे जीवनसाधना गौरव सत्कार केला .
  • १० फेब्रुवारी २००८ला पुणे विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दिला.
  • २३ ऑक्टोबर १९९७ला पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
  • पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गौरव
  • मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार
  • जानेवारी १९९२ मध्ये शिवसेनेने, रमाई प्रतिष्ठानतर्फे सौ.मीनाताई ठाकरे यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने अंधेरीच्या शहाजी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातल्या काही कर्तबगार स्त्रियांचा गौरव केला. त्यात डॉ.सरोजिनी बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
  • १ ऑक्टोबर १९९५ला गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार देऊन सन्मान.
  • १२ एप्रिल १९९६ला र.ना.चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला .
  • २७ डिसेंबर १९९६ला साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे सरोजिनी बाबर यांचा फोटो महाराष्ट्र साहित्य परिषदेत लावण्यात आला.

संदर्भ

  1. ^ "सरोजिनी बाबर (Sarojini Babar)". मराठी विश्वकोश. 2019-07-31. 2022-02-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b "लोकसाहित्यात उमललेली 'सरोजिनी'". Maharashtra Times. 2022-02-10 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "डॉ.सरोजिनी बाबर". sarojinibabar.com. 2022-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-10 रोजी पाहिले.
  4. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १०३. ISBN 978-81-7425-310-1.