Jump to content

सरस्वती नदी

सरस्वती नदी

सरस्वती ही भारतातील एक प्राचीन महानदी असल्याचे समजले जाते.[]

प्राचीन संदर्भ

ऋग्वेदात सरस्वती सूक्त आहे. यामध्ये सरस्वती नदीचे वर्णन केलेले आहे आणि तिची स्तुती केलेली आहे.[] वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथांत आढळतो. महाभारतात विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो. सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हणले आहे. पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.[] शिवाने ब्रह्महत्या केल्याने त्याला जे पातक लागले त्याच्या क्षालनासाठी तो सरस्वती नदीत स्नान करू लागताच ती गुप्त झाली असे वामन पुराणात सांगितले आहे.(३.८)

लक्ष्मी, गंगा, सरस्वती या श्रीविष्णूच्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होऊन त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होऊन पृथ्वीवर अवतरल्या.[] महाभारत या ग्रंथातही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो.[]

भौगोलिक महत्त्व

पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली. प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून हरियाणा, राजस्थान, व गुजरात या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी गंगा नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी यमुना नदी सरस्वती नदीला मिळत होती. सरस्वतीचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे सतलज नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते, व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.

लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण[]

सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहॅम, ऑर्थर ए. मॅकडोनल, मी. किथ यासारख्या अभ्यासकांनी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वती नदीच्या शुष्क प्रवासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.[] वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे, अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले. डॉ. वि.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात मोलाचे काम केले.[] वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात, पण जी भारताच्या आजच्या नकाशात दाखवता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.[]

सद्यःस्थिती

भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे हरियाणातल्या यमुनानगर जिल्ह्यातल्या आदी-बद्रीपासून ते गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातल्या खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आले असून, घग्गरच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel ) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.[] सन २००२ ते २००४ आणि सन २००९ ते २०१४ या काळात पुरातत्त्व विभागातर्फे हरियाणातल्या आदी-बद्री, कुरुक्षेत्र, फतेहाबाद, हिस्सार, राजस्थानातल्या गंगानगर, हनुमानगड, करणपुरा आणि गुजरातमधल्या खिरसारा, आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणे उत्खनन करण्यात आले.[१०] सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी, असे सिद्ध करणारे पुरावे या उत्खननातून आढळून आले आहेत.[११] प्रख्यात शास्त्रज्ञ के. एस. वालदिया यांच्या म्हणण्यानुसार, सरस्वतीला पूर्वेकडे आणि पश्‍चिमेकडे अशा दोन उपनद्या असाव्यात आणि ही नदी हरियाणा, राजस्थान व उत्तर गुजरातमधून वाहत असावी. जेसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळले, की रानाऊ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढेच नव्हे तर, तिथे खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळते. बाकीच्या गावांमध्ये मिळते तसे खारट पाणी येथे मिळत नाही. येथील गावकऱ्यांच्या धारणेनुसार, ‘या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतो आहे.! रानाऊपासून साधारणपणे २२ किलोमीटर दूर असलेल्या; पण रानाऊच्याच रेषेत असलेल्या घंटियाली आणि टनोट या गावांतही हीच परिस्थिती आहे.

सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधल्या बंदरपूंछ या गढवाल-हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगांमधल्या हिमनदीतून झाला असावा. ‘ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून घग्गर नदीपात्रातल्या लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्‍चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधनानुसार, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींमधल्या पाण्याच्या ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते १४ हजार वर्षं जुने असावे. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचे आढळून आले आहे. नदीकाठची गावे गेली ४० वर्षे या विहिरींचे पाणी वापरत आहेत. असे असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असे गावकरी सांगतात.

उपग्रह-प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला देण्यात आलेल्या प्रत्यक्ष भेटींवरून, या भागातल्या सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोऱ्यात भरपूर गाळसंचयन केले असावे, असेही या अभ्यासातून सूचित होत आहे. पंजाब, हरियाणातून आणि उत्तर राजस्थानातून वाहत सरस्वती नदीचा प्रवाह खंभायतच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमधे प्रवाह कोरडा होऊन पुढे हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेने जात असावा. भूशास्त्रज्ञांना या खोऱ्यातल्या प्रचंड गाळसंचयनाबद्दल आणि दरवर्षी १५ सेंटिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडणाऱ्या थर वाळवंटाच्या पश्‍चिम भागात आढळणारी पाण्याची विपुलता याबद्दल नेहमीच उत्सुकता लागून राहिली आहे. सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणे कठीण झाल्यामुळे आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळे ‘सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी,’ असे अनेकांना अजूनही वाटते. विसाहून अधिक वर्षांचा काळ या नदीचं अस्तित्व सिद्ध करण्यात गेली आहेत. जोधपूरच्या ‘केंद्रीय रुक्ष प्रदेश संशोधन संस्थे’ने भरपूर आणि नेमके संशोधन करून ‘सरस्वती नदी अस्तित्वात होती’ असे मत मांडले आहे.

उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातूनही काही गोष्टींचा उलगडा होऊ शकला आहे. नदीमार्गातल्या ‘क्षत्रना’च्या ईशान्येला सरस्वतीचा एक प्रवाह ‘मार्कंडा नदी’ म्हणून वाहत असावा. आजची छाऊतांग नदी आणि तिचा सुरतगडजवळ घग्गर नदीशी होणारा संगम यावरूनही जुन्या, कोरड्या पडलेल्या प्रवाहाची कल्पना येऊ शकते. उपग्रह-प्रतिमांवरून असाही तर्क करता येतो, की जुन्या घग्गर नदीचे अनुपगडजवळ दोन प्रवाह झाले असावेत. त्यातला एक मारोटजवळ व दुसरा बैरिनाजवळ लुप्त झाला असावा. म्हणजेच प्राचीन नदी इतकी रुंद असावी. लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्याने घेतला जाणारा पुनर्शोध हा वायव्य भारतातल्या प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणाने आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे, यात शंका नाही.[१२]

भूसर्वेक्षण आणि त्याचा निष्कर्ष

महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्समुळे) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले.

लँडसेटने दिलेल्या माहितीनुसार प्राचीन सरस्वती नदी पूर्व राजस्थानातून अधिक पूर्वेच्या बाजूने वाहत असावी. डॉ.वाकणकर, डॉ.आर्य आणि इंगळे या अभ्यासकांना ओल्डहॅम (१८९३), वाडिया (१९३८), अमलघोष (१९६०) यांनी केलेल्या भू सर्वेक्षणाची मदत नक्की झाली. ही सर्वेक्षणे व्यक्तिगत स्वरूपाची होती. या सर्व विस्तृत सर्वेक्षणातून एक विषय स्पष्ट झाला की इ.स.पू. २००० वर्षांच्या मागे एक प्रचंड नदी, स्वतःची पात्रे सतत बदलत, राजस्थान, बहावलपूर, उत्तर सिंध किंवा कच्छच्या रणातून अरबी समुद्राला निरनिराळ्या मुखातून मिळत असावी. सरस्वती नदी अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी जी स्थित्यंतरे झाली ती पण ध्यानात घ्यावी लागतात. बिकानेरजवळची वाळू आणि मुरमाची उत्पत्ती पूर्व आद्याश्म युगातील असावी असे भू-शास्त्रज्ञ समजतात. नंतर सरस्वती अंगावर येणाऱ्या वाळवंटाला टाळीत वाहू लागली. कालांतराने सरस्वती कच्छच्या रणात वाहू लागली. नंतर बापपोखरणमार्गे ती उत्तर चौथ्या काळात (Late Quarternary period)अनेक लहान नद्यांना सामावून घेऊ लागली. ज्यावेळी हिमालय व शिवालिक पर्वतांच्या रंगात भू-उद्रेक चालू होता, त्यावेळी सतलजने मार्ग बदलला. परिणामतः सरस्वतीच्या जलाचा पुरवठा कमी झाला. अशा भू-उत्थानाचा परिणाम वैदिक लोकवस्त्यांवर अधिकच झाले. त्यांना आपला प्रदेश सोडून गंगा व सदामीरा नद्यांच्या पाणथळ प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागले.

प्रख्यात भू-शास्त्रज्ञ डॉ. एम.ए. कृष्णन (१९६८) यांनी नोंदविले आहे की सरस्वती अंबाला जिल्ह्याच्या सीमेवर सिरमूर पर्वत रांगांच्या शिवालिक डोंगरातून बाहेर पडते. ती आदी-बद्री येथे समतल भूमीवर वाहू लागते आणि पुढे पत्थर प्रदेशात भवानीपूर आणि बलछापानंतर ती नाहीशी होते. परंतु ती थोड्या अंतरानंतर पुन्हा भूपृष्ठावर येऊन कर्नालजवळ प्रकट होते. याच परिसरात घग्गर (दृषद्वती) या नावाने ती उगम पावते.[१३]

सरस्वती नदीच्या विषयावरील पुस्तके

  • आणि सरस्वती नदी लुप्त झाली...गुप्त झाली (लेखक - शरश्चंद्र लिमये); पुस्तक प्रकाशन दिनांक - १२ मे २०१६
  • सरस्वती नदीचा शोध-भारतीय इतिहास संकलन समिती प्रकाशन
  • लुप्त सरस्वती नदी शोध (संक्षिप्त वृत्तांत) डाॅ. वि.श्री. वाकणकर, डाॅ. चिं.ना.परचुरे
  • सरस्वती शोध वाकणकर वि.श्री (श्री. बाबासाहेब आपटे स्मारक समिती प्रकाशन)

बाह्य दुवे

  1. उपक्रम संकेतस्थळावरील चर्चा-सरस्वती नदी Archived 2010-01-08 at the Wayback Machine.
  2. ऋग्वेदातील सरस्वती/पाण्यावरून तंटा?! Archived 2010-12-31 at the Wayback Machine.

संदर्भ

  1. ^ Singh, Manoj (2018). Vaidik Sanatan Hindutva (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352666874.
  2. ^ Speir), Mrs Manning (Charlotte (1869). Ancient and Mediaeval India (इंग्रजी भाषेत). W.H. Allen.
  3. ^ a b भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  4. ^ Sharma, Rambilas; Śarmā, Rāmavilāsa (1999). Bhāratīya saṃskr̥ti aura Hindī-pradeśa (हिंदी भाषेत). Kitabghar Prakashan. ISBN 9788170164388.
  5. ^ Ālocanā (हिंदी भाषेत). Rājakamala Prakāśana. 2002.
  6. ^ Prakash, Om; Śāstrī, Chandrakānta Balī (1990). Essays on philosophy and writing of history (हिंदी भाषेत). Atma Ram and Sons.
  7. ^ Sheshadari, H. V. कृतिरूप संघ -दर्शन (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9788189622008.
  8. ^ लुप्त सरस्वती नदी शोध, वाकणकर, परचुरे (१९९२)
  9. ^ Jaina, Dharmacandra; Śukla, Saṅkaṭāprasāda (2007). Āditīrthaṅkara R̥shabhadeva: jīvanavr̥tta, svarupa, evaṃ Śiva ke sātha tādātmya (हिंदी भाषेत). Sarasvatī Nadī Śodha Saṃsthāna, Hariyāṇā.
  10. ^ Mālī, Bī Ela (1991). Rājasthānī sāhitya kā ādikāla (हिंदी भाषेत). Rājasthānī Bhāshā Bāla Sāhitya Prakāśana Ṭrasṭa.
  11. ^ Danino, Michel (2010). The Lost River: On the Trail of the Sarasvatī (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143068648.
  12. ^ पुनर्शोध सरस्वतीचा (डॉ. श्रीकांत कार्लेकर) सकाळ वृत्तपत्र (दि.९ जुलै २०१७)
  13. ^ लुप्त सरस्वती नदी शोध वाकणकर,परचुरे (१९९२)