Jump to content

सरसगड

सरसगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


सरसगड
नावसरसगड
उंची४४४ मी.
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणरायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गावपाली-सुधागड
डोंगररांग
सध्याची अवस्थाखराब
स्थापना{{{स्थापना}}}


पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते.

या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग, रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.

इथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविणाऱ्या दुर्गवेध युवा मराठा फाऊंडेशनच्या सदस्यांनी किल्ले परिसरातील 3 शूचकूपे(शौचालय), 2 सातवाहन कालीन श्री गणेशाची शिल्पे, चोर दरवाजा, तटबंदीत खोदलेली पाण्याची टाके, वीरगळ, पाण्याचा निचरा करणारे नाले, महादरवाजावरील कोरीव शिल्पे असा ऐतिहासिक वारसा भेटला आहे.

इतिहास

सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, दिवडी, खांब टाकी यावरून हा किल्ला सातवाहनांच्या काळातील असल्याचे दिसून येते.

इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. बहामनी कालखंडाचा पुरावा म्हणून इथे गुजरात सल्तनत काळातील नाणे पाली गावातील ग्रामस्थाला २०२४ सालीच्या शिवजयंतीला गडफेरीदरम्यान सापडले आहे. त्याचसोबत पाशिलकर घराण्याकडे त्यांच्या मंदिरात पूजाला जाणारा तोफगोळा व dotted शिवराई नाणे ही छत्रपती शिवरायांच्या काळाची साक्ष देते. किल्ल्यावर स्वच्छता मोहीमेदरम्यान सापडलेली मडक्यांची खापरे, गोफनगोळे ही गडावरील राबता व ऐतिहासिक कालखंडाचा उद्घोष करतात.

शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरून आहे.

तळई उर्फ घेरा सरसगड गावात आजही पुरातन वाडे व पाशिलकर हे किल्ल्याशी निगडीत घराणे वास्तव्यास आहे. त्याचसोबत पाली गावात ऐतिहासिक विहिरी, तलाव, वाडे, टाके, मंदिरे, समाध्या बघायला मिळतात. बाजूच्याच रासळ गावमध्ये गधेगळ, विरगळ, पुरातन शिलालेख असलेली विहीर आणि समाध्या आहेत. पालीतून सिद्धेश्वर गावाच्या मार्गावर डाव्या बाजूला जुन्या समाध्या आहेत व सिद्धेश्वर गावात यादवकालीन मंदिरे व मुर्त्या आहेत.

छायाचित्रे

गडावरील पाहण्याची ठिकाणे

१. सातवाहन कालीन गुंफा.

२. सातवाहन काळातील एकाच कातळात कोरलेल्या ९६ पायऱ्या व मुख्य दक्षिण दरवाजा, खोदीव देवडी व पायऱ्या.

३. तटबंदीमध्ये असलेली शौचालय.

४. बालेकिल्ल्याच्या मार्गावर असलेली पाण्याची टाकी. (पिंडी हौद, ऐनाचा हौद, अष्टकांचा हौद, औदुंबर हौद ई.)

५. नाथपंथीय समाधी

६. फ्रेश वॉटर स्पोंज (fresh Water Sponge.) सजीव आढळणारी पाण्याचे टाके.

७. दगडी खोदिव टाक्यांवर कोरलेले श्री गणेशाची २ शिल्पे.

८. भिंतीवर कोरलेले वीरगळ, सतीशिला व शिल्प.

९. महादरवाजा, पहाऱ्याच्या चौकी, सदर, चिलखती बुरुज, दिंडी दरवाजा, चोर दरवाजा, व महादरवाजा वरील शिल्पे.

१०. बालेकिल्ल्याच्या आवारातील वाड्यांचे अवशेष

११. गडदेवता केदारेश्वराचे मंदिर व तलाव.

१२. शाहपिर / नाथपंथीय समाधी.

१३. पाण्याची टाकी.

१४. ढालकाठीची जागा.

१५. महादरवाजा तून तळई गाव रस्त्यावरील पाण्याची टाकी.

१६. गडपायथ्याला असलेले घेरा सरसगडावरील गडदेवी वाघजाई देवीचे मंदिर.

१७. बुद्ध लेणी

१८. चोर दिंडी (गुप्त दरवाजा) - गडावर संवर्धन कार्य करणाऱ्या दुर्गवेध युवा मराठा परिवार या संस्थेच्या गड सेवकांनी मातीखाली गडाला गेलेला चोर दिंडी किंवा गुप्त दरवाजा २०२२-२३ मध्ये शोधून गडप्रेमींच्या अभ्यासासाठी खुला केला आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

पाली गावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. गणपती मंदिराजवळून म्हणजे देऊळवाड्याकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणेही सोयीचे आहे. दक्षिणेच्या बाजूकडील कातळमाथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून ९६ भक्कम पायऱ्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो. मध्यभागी असण्याऱ्या वाटोळ्या सुळक्याभोवती चक्कर मारता येते. या ५० मीटर उंचीच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी टाकी, तळी, कोठ्या, गुहा, तालीमखाने आहेत. याच गुहांमधे पांडवानीही वस्ती केली होती असे म्हणतात.

बाह्य दुवे

नकाशा : http://wikimapia.org/417364/