Jump to content

सरदेशपांडे

सरदेशपांडे हे एक आडनाव आहे.हे आडनाव आपल्याला मुख्यत्वे महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात आढळून येते. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंमध्ये आढळते.

नावाची व्युत्पत्ती

सरदेशपांडे ही पदवी साधारण १४-१५ व्या शतकात सुलतानांनी दिली असावी. यातील 'सर' या शब्दाचा अर्थ प्रमुख (Head) असा आहे. देश या शब्दाचा अर्थ राष्ट्र, किंवा एक विभाग, प्रांत, गावांचा समूह असा होतो. पांडे हा शब्द पांड्ये या शब्दाचा अपभ्रंश असून तो मूळ पंडित (शिक्षण घेतलेला/ ज्ञानी) या शब्दावरून आला आहे. पांडे म्हणजे महसुली कागदपत्रे तयार करणारा-संकलित करणारा असा होय. अर्थात सरदेशपांडे म्हणजे विशिष्ट विभागातील महसुली कागदपत्रे संकलित करणारा-तयार करणारा, लेखापाल यांचा प्रमुख होय. सरदेशपांडे हे पदनाम (Title) असल्याने ते आडनाव असण्यासाठी व्यक्तीला विशिष्ट जात असणे आवश्यक नसते.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील साखरपेकर सरदेशपांडे घराणे

रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कोंडगाव (साखरपा) आणि कनकाडी या गावांत सरदेशपांडे कुटुंबाची वस्ती आहे. या घराण्यातील एक शाखा उत्तर प्रदेशात जाळवन येथे स्थाईक आहे. यांचे मूळ आडनाव पंडित असून नंतर ते सरदेशकुलकर्णी असे रूपांतरि झाले. त्यांनतर ते सरदेशपांडे असे झाले. यांचे कुलदैवत लक्ष्मी रवळनाथ अर्थात कोल्हापूरजवळचा ज्योतिबा असून कुलदेवी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई होय. सरदेशपांडे घराण्याचे गोत्र काश्यप आहे.

सरदेशपांडे यांचे ज्ञात मूळपुरुष अंताजी नागोजी हे होते. ते गुलबर्ग्यात बहामनी बादशाहांच्या दरबारात होते. त्यांना बादशाहने पंडित ही पदवी दिली होती. तेव्हापासून ते पंडित हे आडनाव वापरायला लागले. त्यांचे पद्मनाभ, नागोजी, शिवाजी, पद्माकर, श्रीधर, हरी, कोंडो आणि बापुजी असे एकूण आठ पुत्र होते.

यापैकी बापुजी अनंत हे गुलबर्ग्यातच राहिले.

पद्माकर अनंत यांनी आपल्या वाटणीचा हिस्सा घेतला व ते वेगळे झाले. त्यांचे वंशज विष्णू नरहरी हे सातारा येथे राणीचे दिवाण होते तसेच बडोदे येथे गायकवाड महाराजांचे फडणीस होते. त्यांचे वंशज म्हणजेच की जे आज जमेनीस म्हणून ओळखले जातात ते मलकापूर आणि सालपे-केळवली, तालुके लांजा येथे राहतात.

कोंडो अनंत यांना आंबे घाटाचे पत्कीपणाचे वतन मिळाले.

शालिवाहन शके १३४७ अर्थात इ.स.१४२५ मध्ये उर्वरित बंधू पद्मनाभ, श्रीधर, नागोजी, शिवाजी व हरी हे अनुक्रमे किल्ले विशाळगडच्या (खिलणा) अंमलाखालील कोकणातील लांजे, देवळे, हरचिरी, हातखंबे व पावस या पाच महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा मिळाल्या. तेव्हा ते पाच बंधू या पाच महालांत आले. आज ते पंडित, सरदेशपांडे, सरदेशकुलकर्णी, कुलकर्णी इ. नावाने ओळखले जातात. यांपैकी देवळे महालाचे कुलकर्णीपणाचे वतन श्रीधर यांच्याकडे होते. त्यांचेच वंशज म्हणजे हे आजचे कोंडगाव(साखरपा) व कनकाडी येथील सरदेशपांडे होत.

उपलब्ध दस्तऐवज पहाता, १६ व्या शतकात, कनकाडी व कोंडगाव (साखरपा) येथील सरदेशपांडे यांचे ज्ञात मूळपुरुष भास्कर कृष्णाजी हे संपूर्ण खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी होते. तसेच ते देवळे महालाचे देशकुलकर्णी होते. ते प्रारंभीच्या काळात कसबा देवळे येथे राहत असत.

भास्कर कृष्णाजी यांना दोन पुत्र होते - १) कान्होजी भास्कर व २) नरसिंह भास्कर.

कान्हो भास्कर हे कनकाडी येथे राहत असत. त्यांचे वंशज देखील कनकाडी येथेच राहतात. ते कनकाडकर सरदेशपांडे म्हणून ओळखले जातात. ते आज सरदेशपांडे आणि पंडित असे आडनाव लावतात.

नरसो भास्कर हे कोंडगाव - साखरपा येथील पेठ इब्राहिमपूर येथील त्यांच्या चौसोपी वाड्यात राहत असत. त्यांचे वंशज हे साखरपेकर सरदेशपांडे म्हणून ओळखले जातात.

१८ व्या शतकात, कोंडगाव (साखरपा) येथील अनंत राम तथा अंताजीपंत सरदेशपांडे हे खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी, देवळे महालाचे देशकुलकर्णी, साखरपा येथील पेठ इब्राहिमपूर तर्फे देवळेचे व हरचेरी गावाजवळच्या बंदर इब्राहीमपट्टणचे कुलकर्णी होते. तसेच कोंडगाव व साखरपा गावाचे खोत होते. सरदेशपांडे हे संपूर्ण खिळणा तालुक्याचे महसुली हिशेब तपासणीचे मुख्य अधिकारी होते. सरदेशपांडे यांना विशालगडच्या प्रमुखांकडून काही इनाम देखील मिळाले होते.

ब्रिटिश काळात साखरपेकर सरदेशपांडे हे कोंडगाव, साखरपा, दखिन. निनावे, मेढे, कनकाडी व करंबेळे तर्फे देवळे या गावांचे खोत होते.

आधुनिक काळातील सरदेशपांडे घराण्यातील काही उल्लेखनीय नावे -

  • राजापूर हायस्कूलचे संस्थापक व माजी मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते गुरुवर्य श्री. दत्तात्रय जगन्नाथ उर्फ दादासाहेब सरदेशपांडे
  • ब्रिटिश सम्राटाकडून दिला जाणारा कैसर इ हिंद पुरस्कार विजेते कै. श्रीपाद शिवराम तथा बाबासाहेब सरदेशपांडे
  • कोंडगाव (साखरपा) येथील दानशूर व्यक्तिमत्त्व कै. सदाशिव केशव तथा भाऊसाहेब सरदेशपांडे
  • पुणे विद्यापीठाचे माजी माजी कुलसचिव कै. रंगनाथ श्रीपाद सरदेशपांडे
  • रत्‍नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघ (मर्यादित) या संस्थेचे माजी अध्यक्ष कै.पर्शराम केशव सरदेशपांडे


अशाप्रकारे सर हा उपसर्ग असलेली अन्य आडनावे : सरदेशमुख, सरदेसाई, सरनाईक, सरपोतदार, सरमुकादम, वगैरे. सरदार या आडनावातला सर हा उपसर्ग नाही.