Jump to content

समाजशिक्षण


स्थूलमानाने समाज-शिक्षण म्हणजे प्रौढशिक्षण असे मानले जात असले, तरी समाजशिक्षणाची संकल्पना त्याहून जास्त व्यापक व बहु-आयामी आहे. समाजाच्या सर्वच घटकांना-सर्व स्तरांतील सर्व व्यक्तींना-शिक्षणाच्या संधी व सोयी-सुविधा पुरवून साक्षर व शिक्षित बनविणे, समाजामध्ये योग्य प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने लोकांना नागरिकत्वाचे शिक्षण देणे, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कुटुंबनियोजन आदी समाजोपयोगी बाबींचे पद्धतशीर शिक्षण देणे, नैतिक मूल्यांचा प्रसार करणारे शिक्षण देऊन समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावणे, अशा अनेकविध घटकांचा अंतर्भाव ‘ समाजशिक्षण ’ या व्यापक संज्ञे-खाली केला जातो. आर्थिक दैन्य, सामाजिक विषमता, कौटुंबिक दुरवस्था अशा अनेकविध प्रतिकूल घटकांमुळे औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, समाजातील सर्व वयोगटांतील व्यक्तींना साक्षर व सुशिक्षित बनविण्याचे उद्दिष्ट समाजशिक्षणाच्या कक्षेत येते. त्या दृष्टीने बालपणीच उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणारी झोपडपट्टीतील व कामगारवस्तीतील मुले औपचारिक शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांना त्यांच्या वस्तीनजिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, रात्रशाळांसारखे उपकम त्यांच्या-साठी राबविणे, हा व्यापक समाजशिक्षणाचाच एक भाग होतो. साखर कारखान्यांतील कामगारांच्या मुलांसाठी ‘ साखरशाळा ’ चालविल्या जातात, त्यांचाही अंतर्भाव समाजशिक्षणात करता येईल. सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने समाजविकास व समाजकल्याण साधण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रकारचे अनौपचारिक शिक्षण म्हणजेही एका अर्थाने समाजशिक्षणच होय. त्यात व्यक्तिविकासाबरोबरच सामाजिक विकासही साधला जातो. समाजशिक्षण हे समाजाला उन्नतीच्या, विकासाच्या विविध दिशा दाखवून सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ करणारे प्रभावी माध्यम आहे. समाजशिक्षणाच्या क्षेत्रात जशा अनेकविध शासकीय योजना व उपकम कार्यान्वित केले जातात, तसेच अनेक खाजगी सेवाभावी संस्था व स्वयं-सेवक कार्यकर्ते हेही आपापल्या परीने समाजशिक्षण-प्रकियेत सकिय सहभागी होत असतात. अशा कार्यकर्त्यांना समाजसेवेचे रीतसर व योग्य प्रशिक्षण देण्यासाठी शासकीय व खाजगी प्रशिक्षण संस्था असतात. थोडक्यात, व्यक्तिगत विकास व सामाजिक उन्नती ही शिक्षणाची सर्वसामान्य उद्दिष्टे विचारात घेऊन समाजातील सर्व घटकांना, जे औपचारिक शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा सर्व व्यक्तींना, शिक्षण देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व उपकम ह्यांचा समावेश समाजशिक्षणात होतो. उदा., प्रौढशिक्षण, स्त्रीशिक्षण, निरंतर शिक्षण, पत्रद्वारा शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, मुक्त विदयापीठे, सर्व साक्षरता अभियान वा सर्व शिक्षा अभियान अशा अनेकविध योजना व उपक्रम म्हणजे समाजशिक्षणाचेच विविध पैलू होत. अर्थात समाजशिक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट व कार्यकमाचा मुख्य भर साक्षरता प्रसारा वर असणार, हे साहजिकच आहे.

पाश्र्चात्त्य देशांत एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणास सुरुवात झाली. लवकरच निरक्षर प्रौढांची समस्या समाजास जाणवू लागली व त्या समस्येवर उपाय म्हणून प्रौढशिक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात प्रारंभी प्रौढ साक्षरतेवर भर होता. दोन पिढयांतच किमान साक्षरतेचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाल्याने प्रौढशिक्षणास वेगळे वळण मिळाले व त्यात व्यवसायशिक्षण, कला-वाङ्मयाचे शिक्षण इ. उपकमांचा समावेश होऊ लागला. अशा रीतीने हळूहळू प्रौढशिक्षणाची कल्पना विस्तारत व विकसित होत जाऊन, त्यातून समाजशिक्षणाची संकल्पना दृढमूल व व्यापक झाली. तिचा भर संस्कृतिसंवर्धन व सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासणे यांवर होता. नव्यानेच स्वतंत्र झालेल्या अविकसित देशांत समाजशिक्षणाचा हेतू राष्ट्रनिष्ठेची व स्वप्रयत्नांनी समाजोद्धार करण्याच्या प्रवृत्तीची जोपासना करणे हा बनला. समाजोन्मुखता वाढविणे, सामाजिक जबाबदाऱ्याचे भान जागृत करणे, सामाजिक सदसद्विवेक जोपासणे तसेच, राष्ट्रभक्ती, देशाभिमान ह्यांचे जागरूक भान नागरिकांत निर्माण करणे, अशी अनेक उद्दिष्टे समाजशिक्षणाद्वारा साध्य करण्यावर भर देण्यात आला. डेन्मार्कमध्ये डॅनिश शिक्षणतज्ञ व धर्म-शास्त्रवेत्ता ⇨ नीकोलाय फीद्रिक सेव्हेरीन गुंटव्हीग (१७८३-१८७२) याने पहिली ⇨ लोकशाळा (फोक स्कूल) १८४४ मध्ये स्थापन केली. लोकांनी लोकांकरिता चालविलेल्या प्रौढांच्या निवासी शाळा, असे लोक-शाळांचे स्वरूप होते. त्यांचा मुख्य हेतू वाढत्या जर्मन आकमणाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय वृत्तीची जोपासना करणे हा होता. लवकरच ह्या शाळा डेन्मार्कमध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या. तेथे सु. ७० लोकशाळा असून, त्या राष्ट्रीय जीवनाचा कणा मानल्या जातात. या शाळांतून शिक्षण घेतलेले सु. दोन लाख लोक वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतात (१९८६). या शाळांमध्ये राष्ट्रीय इतिहास, वाङ्मय, समाजशास्त्रे हे विषय शिकविण्यावर जास्त भर दिला जातो. सामान्य जनतेत समाजोद्धाराची व सहकाराची भावना वाढीस लावून राष्ट्नाची आर्थिक व सांस्कृतिक उन्नती घडवून आणण्याचे महत्कार्य या लोकशाळांनी केले. समाजशिक्षण देणारी आदर्श संस्था, असा लोकशाळेचा उल्लेख केला जातो. आता ह्या लोकशाळा बहुतेक सर्व उत्तर यूरोपीय देशांमध्ये आढळतात. या शाळा निवासी स्वरूपाच्या असून ज्या तरुणांनी औपचारिक शिक्षण पुरे केले आहे आणि ज्यांनी व्यावसायिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांच्या नैतिक व बौद्धिक विकासासाठी त्या चालविल्या जातात. या शाळांतून स्थानिक व राष्ट्रीय चालीरीतींचेही शिक्षण दिले जाते. अशा रीतीने समाजशिक्षणाच्या संकल्पनेत अनुस्यूत असलेल्या सर्व उद्दिष्टांची व ध्येयधोरणांची परिपूर्ती करणाऱ्या ह्या आदर्श लोकशाळा होत.


भारतात स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत प्रौढशिक्षणाचे कार्य अल्प प्रमाणावर चालू होते. त्याचा मुख्य हेतू प्रौढांना साक्षर करणे हा होता. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र प्रौढशिक्षणाची उद्दिष्टे व ध्येयधोरणे यांत आमूलाग बदल झाला. लोकशाही तत्त्वावर अधिष्ठित असलेल्या राष्ट्रीय सरकारची स्थापना होताच, केवळ साक्षरतेचे उद्दिष्ट कोते भासू लागले. राष्ट्रीय पुनरूज्जीवनाला चालना देणारी सामाजिक आकांक्षा लोकांमध्ये जागृत करण्याची गरज भासू लागली. प्रौढशिक्षणाच्या लक्ष्याची परिणती समाजशिक्षणाच्या लक्ष्यात झाली. साक्षरताप्रसाराबरोबरच इतरही अनेक उद्दिष्टांचा समावेश समाजशिक्षणात करण्यात आला. व्यक्तींमध्ये आदर्श नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे, त्यांना जीवनोपयोगी विज्ञानाचा परिचय घडविणे, स्वच्छता व आरोग्य यांची महती पटविणे, त्यांची व्यावसायिक कार्यक्षमता वाढविणे, त्यांच्या छंदांची जोपासना करणे, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यकमांविषयी लोकांमध्ये दर्जेदार अभिरूची निर्माण करणे, असे विविध पैलू समाजशिक्षणाला आज प्राप्त झाले आहेत.

समाजशिक्षणाचा हा व्यापक आशय लक्षात घेऊन भारतात स्वातंत्र्योत्तर काळात प्रौढशिक्षणाचे व साक्षरताप्रसाराचे अनेक कार्यकम मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. सामान्यत: औपचारिक शिक्षणाचा काळ संपल्यावर, नोकरी वा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना स्वेच्छेने शिक्षण घेण्यासाठी प्रौढ शिक्षणाची योजना असल्याने, ती कार्यवाहीत आणण्यासाठी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. या शिक्षणाची वेळ साधारणत: सायंकाळी, रात्री वा सुटीच्या दिवशी ठेवतात. हा शिक्षणक्रम शक्य तितका जीवनस्पर्शी, लवचिक, ऐच्छिक व उपयुक्त ठेवला जातो. रात्रशाळा, अर्धवेळ वर्ग, सुटीतील अभ्यासक्रम, पत्रद्वारा शिक्षण, निरंतर शिक्षण अभ्यासक्रम, विदयावेतन देऊन उमेदवारीची सोय, विदयापीठांचे बहिःशाल अभ्यासक्रम तसेच बहिस्थ परीक्षा देण्याची सोय, मुक्त विदयापीठे अशा नानाविध माध्यमांद्वारे प्रौढशिक्षणाच्या प्राथमिक व उच्च् स्तरांवरील (पदविका, पदवी, दुहेरी पदवी, एम्.फिल्., पीएच्.डी. इ.) योजना राबविल्या जातात. वृत्तपत्रे, दूरदर्शन, वार्तापट, अनुबोधपट, ध्वनि-चित्रफिती, संगणक इ. आधुनिक साधनांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये ज्ञानदानाचे व शिक्षणप्रसाराचे कार्य केले जाते. भारतात केंद्र शासनाने १९७८ पासून राष्ट्रीय प्रौढ-शिक्षण कार्यकम सुरू केला. अनेक व्यक्तींना प्रतिकूल परिस्थितीमुळे उच्च् शिक्षण घेता येत नाही. आधुनिक तंत्रशिक्षणापासून वंचित रहावे लागते. विविध कारणांमुळे तरुणांना औपचारिक शिक्षण अर्धवट सोडून दयावे लागते. गामीण भागांतील लोकांना, विशेषतः स्त्रियांना, इच्छा असूनही उच्च् शिक्षण घेता येत नाही. प्रौढपणी शिकावे असे वाटले, तरी औपचारिक शिक्षणव्यवस्था उपलब्ध असतेच असे नाही. अशा सर्व व्यक्तींना निरंतर शिक्षणयोजनेखाली कोणत्याही वयात शिक्षण घेता येते. गतिमान सामाजिक परिसराशी व्यक्तीला जे समायोजन साधावे लागते, त्यासाठी असे शिक्षण गरजेचे व उपयुक्त ठरते. निरंतर शिक्षणाचे कार्यक्रम आपल्या देशातील व परदेशांतील अनेक विदयापीठांतून राबविले जातात. हे कार्यक्रम व्यक्तीच्या व समाजाच्या विशिष्ट गरजांवर आधारित असतात. पदवीप्रमाणपत्रे मिळविण्यापेक्षा ज्ञानसंपादन व कौशल्यप्राप्ती ही या शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे असतात. निरंतर शिक्षणयोजनेत अभ्यासक्रमांची व माध्यमांची खूपच विविधता असते. कोणताही विषय त्यात समाविष्ट होऊ शकतो. तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांवर आधारित असे विषयही त्यात शिकविले जातात. भारतात निरंतर शिक्षणाची योजना प्रथमत: १९६० च्या सुमारास राजस्थान विदयापीठात सुरू झाली. आधुनिक काळातील मुक्त विदयापीठांची संकल्पना उच्च्स्तरीय समाजशिक्षणाच्या संदर्भात खूपच उपयुक्त व महत्त्वपूर्ण मानली जाते. आपल्या समाजाच्या प्रश्नांशी निगडित असलेल्या परंतु पारंपरिक विदयापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या बाबी व प्रश्न यांसंबंधी चर्चा करणे, त्यांचा अभ्यास करणे व त्या व्यवहारात आणणे हेच मुक्त विदयापीठाचे प्रमुख ध्येय होय. ⇨ बहिःशाल शिक्षणाच्या आधुनिक प्रकारात मानव्यविदया, कायदा, वाणिज्य, वैदयक अशा बहुतेक सर्व विषयांचा अंतर्भाव होतो. शैक्षणिक संस्थांत रीतसर प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विदयार्थ्यांना, विशेषतः प्रौढ नागरिकांना, या योजनेचा लाभ घेता येतो. अनेक देशांतील तसेच भारतातील अनेक विदयापीठांतून बहिःशाल शिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष शाळेत वा महाविदयालयात नियमित जाऊ न शकणाऱ्या व्यक्तीस एकदम परीक्षेस बसण्याची व पदवी-प्रमाणपत्र मिळविण्याच ⇨ बहिःस्थ शिक्षणाची योजना हा अनौपचारिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. भारतातील बहुतेक विदयापीठांतून ही सोय आहे. पत्रद्वारा शिक्षणपद्धतीचा उपयोग प्रौढ व्यक्ती, महिला, कामगार इ. व्यक्तींना होतो. शाळा, विदयापीठे तसेच अन्य शैक्षणिक संस्था पत्रद्वारा शिक्षण देण्याची व्यवस्था करतात.

समाजामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींना नीतिमूल्यांचे शिक्षण देऊन एकूण समाजाचा सांस्कृतिक स्तर उंचावणे, हा समाजशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ह्या संदर्भात आरॉनफीड, मीशेल प्रभृतींनी ‘सामाजिक अध्ययन सिद्धांत’ (सोशल लर्निंग थिअरी) मांडून एक प्रतिमान (मॉडेल) सादर केले. समाजाला नैतिक शिक्षण देण्यावर त्यात भर होता. त्यात प्रत्यक्ष शिक्षणाबरोबरच नमुनादर्शांद्वारे (रोल मॉडेल्स) प्रेरणा निर्माण करण्यावर भर दिलेला होता. सामाजिक अध्ययन सिद्धांतावर जॉन लॉकचा ⇨ अनुभववाद आणि जॉन वॉटसन व बी. एफ्. स्किनर प्रभृतींचा ⇨ वर्तनवाद यांचा प्रभाव होता. मानवी प्रकृती मूलत: एखादया कोऱ्या पाटीसारखी असते, तिच्यावर समाज व्यक्तीचे अनुभव लिहितो, ही वर्तनवादयांची धारणा होती. या सिद्धांतांना अनुसरून हे प्रतिमान तयार करण्यात आले. त्यानुसार नैतिक मूल्ये ही मुलांच्या मनावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मार्गांनी ठसविली जातात. उदा., सद्वर्तनाबद्दल मुलांना प्रोत्साहन व बक्षीस मिळते याउलट दुर्वर्तनाबद्दल शिक्षा व निषेध त्यांच्या वाटयला येतो. आईवडील हे मुलांचे आद्य नमुनादर्श होत. त्यांच्या चांगल्या वर्तनाचे अनुकरण मुले करतात, त्यातून त्यांच्यात नैतिक मूल्यांची जडणघडण होते. अशा प्रकारे मूल प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गांनी नीतिमूल्ये शिकत जाते. पुढे समाजात वावरतानाही प्रत्यक्ष कृतींतून व नमुनादर्शांच्या प्रेरणांतून व्यक्तींना नैतिक मूल्यांचे धडे मिळत असतात. शाळांतूनही औपचारिक पातळीवर मूल्य-शिक्षणासारखे विषय शिकविले जातात. समाजाच्या नैतिक शिक्षणाच्या संदर्भात ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

समाजशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना उच्च-स्तरीय प्रशिक्षण देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘नॅशनल सेंटर फॉर फंडामेंटल एज्युकेशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. इंदूर येथील ‘सोशल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ ही संस्थाही कार्यकर्त्यांना समाजशिक्षणाचे प्रशिक्षण देते. जनता महाविदयालये व विदयापीठे गामीण परिसरात प्रौढशिक्षण योजनां-साठी शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे कार्य करतात. बहुजन शिक्षणाच्या (मास एज्युकेशन) संदर्भात स्थिर व फिरत्या ग्रंथालयाचे योगदानही फार महत्त्वाचे आहे. दिल्ली विदयापीठात उभारलेली ‘लायब्ररी इन्स्टिट्यूट’ ही संस्था गंथालयीन क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे कार्य करते. ‘दिल्ली पब्लिक लायब्ररी ’ ही भारत सरकारने स्थापन केलेली संस्था सार्वजनिक गंथालय क्षेत्रात मार्गदर्शी स्वरूपाचे कार्य करते. कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालयाचा विस्तार व विकास करण्यात आला आहे. केंद्र शासनाने नव-साक्षरांसाठी वाचनसाहित्य-निर्मितीच्या खास योजना आखल्या आहेत. त्यांत नवसाक्षरांसाठी पुस्तिकांचे लेखन व प्रकाशन, उत्तेजनार्थ गंथ-पारितोषिके, लेखकांसाठी प्रशिक्षण-शिबिरे, यूनेस्कोचा नवसाक्षरांसाठी वाङ्मयनिर्मितीच्या योजनेत सहभाग व उपयुक्त ज्ञानकोशांचे प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचा समावेश होतो. समाजशिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या खाजगी संस्थांना केंद्र शासन आर्थिक साहाय्य देते.