सप्तलिंगी नदी
सप्तलिंगी नदी ही रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातली नदी आहे. ही नदी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावते व देवरूख शहरातून वाहात वहात वांद्री येथे बाव नदीला मिळते. नदीची एकूण लांबी १८ किलोमीटर आहे.
संगमेश्वरापासून ३२ किलोमीटर अंतरावर एका लहान तोंडाच्या लहानश्या गुहेत मार्लेश्वर नावाचे एक शंकराचे मंदिर आहे. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या निरांजनाचा मंद उजेड सोडला तर अन्य प्रकाशाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गुहेत शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराच्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराजवळ एक धबधबा आहे. तेथे जवळजवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठूनकुठून पर्यटक येतात. दगडांतून, हिरवाईतून वाट काढत पुढे वाहत जाणाऱ्या या पाण्याचे रूपांतर सप्तलिंगी नदीत होते. ही नदी खळखळाट करीत वाहते.
देवरुख गावानजीकच्या आंबवली येथे चंद्रेश्वर नावाचे एक मंदिर आहे. या देवळाजवळून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदीत एक डोह आहे.
मार्लेश्वरला जाण्यासाठी १६ किलोमीटरवर असलेल्या देवरूख गावापासून बस आहे.