Jump to content

सत्यसंध विनायक बर्वे

प्रा. सत्यसंध विनायक बर्वे हे १९७० ते १९८६ याकाळात उल्हासनगरच्या आर.के. तलरेजा महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. ते राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत होते. १९४२ च्या चले जावच्या चळवळीपासून ते काँग्रेस पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते होते. पक्षाची विविध पदेही त्यांनी भूषविली होती. ते आध्यात्मिक स्वभावाचे होते

१९८७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर मे महिन्यात त्यांच्या गुरूपत्नीने त्यांना श्रीमद्भागवताची प्रत दिली. त्यांनी वेळ मिळेल तेव्हा वाचत जाईन असे आश्वासन दिले. २० मे १९८७ पासून ते रोज एकेक अध्याय वाचू लागले. सुरुवातीला त्यांनी फक्त कथा वाचल्या. दहा वर्षे अखंडपणे वाचन केल्यानंतर १९९८ च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातील चौथ्या ओळीची समश्लोकी केली. ती समश्लोकी आणि त्यानंतरचे हे सारे पुराण आपल्या हातून लिहून घेण्यात आले, हा श्री गणेशाने आपल्याला दिलेला प्रसाद आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यानंतर सलग आठ वर्षे त्यांनी श्रीमद्भागवत ग्रंथाचा अभ्यास केला आणि ३५० अध्याय, १२ स्कंध आणि तब्बल १८ हजार ओव्या त्यांनी समश्लोकी स्वरूपात संस्कृत भाषेतून मराठीत रूपांतरित केल्या.

संत एकनाथांची या ग्रंथाच्या अकराव्या स्कंधावर टीका एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय १३ व्या शतकात श्रीधरस्वामींनी या ग्रंथावर टीका लिहिली आहे. मात्र संपूर्ण श्रीमद्भागवत मराठीत आणण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी सत्यसंध बर्वे यांनी हे काम सुरू केले आणि ८४ व्या वर्षी हा ग्रंथ सिद्ध झाला. ‘ग्रंथाली' प्रकाशनाने पाच खंडांमध्ये ही मराठी समश्लोकी प्रकाशित केली असून महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरांमध्ये समारंभपूर्वक हा ग्रंथ प्रसिद्ध केला गेला.

ग्रंथाचे पूर्ण नाव - श्रीमद् भागवत महापुराण मराठी समश्लोकी (खंड १ ते ५)