Jump to content

सत्यवती

शंतनू व सत्यवती. राजा रवि वर्मा यांचे चित्र.

सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरवपांडवांची पणजी होती. लग्नाआधी ती निषाद[] राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरीरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. ऋषी पराशर यांची स्त्रीसुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरीरास येणारा माशांचा गंध नाहीसा करतात व त्याजागी अद्वितीय असा सुंगध तिच्या शरीरास येईल, असे वरदान देतात. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजनगंधा[] असे संबोधले जाऊ लागते.

शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो. हा मुलगा म्हणजे ऋषी व्यास. त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. परंतु शंतनूने त्याआधीच त्याचा जेष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केले असते. त्यामुळे शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. आजन्म ब्रह्मचारी राहिलेल्या देवव्रताला भीष्म हे नाव मिळाले.

या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह होतो व तिला चित्रांगदविचित्रवीर्य अशी दोन मुले होतात. शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो. सत्यवती त्याचे लग्न अंबिकाअंबालिका या काशीराजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती होते.

संदर्भ यादी

  1. ^ "सत्यवती". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-09-01.
  2. ^ "सत्यवती". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-09-01.