Jump to content

सत्यबाला तायब

सत्यबाला तायब
जन्म ७ ऑक्टोबर १९२४
मृत्यू ६ जानेवारी २००२
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी. ए.
पेशा सामाजिक कार्यकर्त्या
कार्यकाळ इ.स.१९५६-इ.स.१९९१


कौटुंबिक माहिती

७ ऑक्टोबर १९२४ रोजी पंजाबमधील हिस्सार गावात बनिया मारवाडी कुटुंबात सत्यबाला तायब यांचा जन्म झाला. आजोबा चंदुलाल आर्यसमाजी जमीनदार व लाला लजपत राय यांचे सहकारी होते. घरातूनच आधुनिक विचारांचे वातावरण आणि सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे त्यांना घरातूनच सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.[]

शिक्षण

हिस्सार येथील मिशनरी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. शालान्त परीक्षेत त्या जिल्ह्यात प्रथम आल्या होत्या. लाहोर येथील महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतले. संपूर्ण पंजाब मध्ये इ.स.१९४४ साली त्या प्रथम क्रमांकाने बी. ए. झाल्या.

कामाचा विषय

हिस्सार मध्ये फाळणीच्या दरम्यान निर्वासितांसाठी काही स्त्रियांना एकत्र जमवून त्यांनी त्यांच्या मदतीने मदत केंद्र उभारले. फाळणीच्या पाठोपाठ पडलेल्या दुष्काळामध्ये दुष्काळ निवारण समितीच्या त्या सचिव झाल्या, त्यांचे काम आणि कीर्ती गांधीजींपर्यंत पोचली होती. साक्षरता प्रसार, प्रौढ शिक्षण प्रसार, कस्तुरबा बालवाडी मोहीम सारख्या स्थानिक पातळीवर त्यांनी उत्साहाने काम केले. भूदान चळवळीचे आकर्षण वाटून त्या त्यातही उतरल्या होत्या. हिस्सार जिल्ह्यात त्यांनी तीस हजार एकर जमीन मिळवली, गाववाले त्यांना भूदान वाली बाई म्हणून ओळखत. इ.स.१९५६ साली सत्यबाला तायब यांनी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघात प्रवेश केला आणि आपले अवघे जीवन कार्यक्षमता, शक्ती संघाच्या कामासाठी खर्च केली. अनेक नवीन उपक्रम त्यांनी संस्थेत चालू केले. इ.स.१९५८ मध्ये समाजकार्य महाविद्यालय सुरू केले. त्यातूनच कौटुंबिक सल्ला केंद्र, दत्तक सेवा प्रकल्प, व्यसनमुक्ती केंद्र, विकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र केंद्र सुरू केले. संस्थेच्या आर्थिक कामात जातीने लक्ष दिले. इ.स.१९७८ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. इ.स.१९७० मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची शाखा त्यांनी आपल्या महाविद्यालयात सुरू केली. वैद्यकीय समाजसेवा केंद्र राष्ट्रीय प्रौढ शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून काम पहिले. पंचवटी ह्या वृद्धाश्रमाचे काम त्या कमलाबाईंबरोबर पाहत होत्या.

पुरस्कार

  • १९५७ मध्ये भूदानकार्यासाठी मानपत्र मिळाले
  • १९७३ कालिकी होम्स पुरस्कार
  • १९९० मध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार
  • १९९५ मध्ये वृद्ध नागरिक संघ व महाराष्ट्र सोशल वर्क असोसिएशनचा सन्मान मिळाला.

संदर्भ

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १३९. ISBN 978-81-7425-310-1.