Jump to content

सत्तांतर

सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची एक कादंबरी आहे.

'सत्तांतर' मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळयांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळयांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी, नरांनरांतले, माद्यामाद्यांतले संघर्ष, सर्व वानरांची जंगलातील हिस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्याचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत आहे.

सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते, हे ह्या कादंबरीचे कथानक होय. तथापि वानराच्या ह्या कथेतून मानवी जगातील वृत्ति-प्रवृत्तींचाही प्रतीकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. 'काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो... जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कुणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो.... संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.' ही ह्या कादंबरीतली काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत.