संप्राप्ति
संप्राप्ति हे रोगाची सम्यक् प्राप्ती होय. रोगाचे जे कारण दोष ते कसे दुष्ट झाले, ते ज्या स्थानात दुष्ट झालेले असतात तेथून कसे शरीरात पसरतात व ज्या स्थानात रोग उत्पन्न झाला त्या स्थानात उत्पत्ती कशी झाली याचे ज्ञान म्हणजे संप्राप्ती होय. पहिल्या प्रश्नाने संचय व प्रकोप, दुसऱ्याने प्रसर व तिसऱ्याने स्थानसंश्रय व व्यक्ती या दृष्टीने पहावे लागते. तेथे तेथे होणाऱ्या व्यापारांना ह्या संज्ञा दिल्या आहेत.
संचय
कफकर पदार्थांच्या अतिसेवनाने आमाशयात, पित्तकारकांनी पित्ताशयात, वातवर्धकांनी वाताशयात दोष संचित होतात, यावेळी त्या त्या स्थानात जडपणा इत्यादींनी त्या अवयवाच्या अस्तित्वाची थोडी जाणीव होत असते व ते ते दोष संचय करणाऱ्या पदार्थाचा व्देष उत्पन्न होतो.
प्रकोप
या वेळी त्याचा नाश केला नाही व त्या जातीच्या पदार्थाचे सेवन अधिकच केले तर त्या स्थानात तो दोष अधिकच साठतो. संचयाची मर्यादा गाठतो. तेव्हा त्या अवयवाचे जडपणा, टोचणी इ. अधिक झाल्याने त्यांचे अस्तित्व-दुखःद स्पष्ट जाणवते, पण चयकारणविव्देष या चिन्हाच्या जोडीला ‘कारणविपरीत गुणेच्छा’ उत्पन्न होते.
मोह अनावर होऊन जिव्हादी इंद्रियांना चटक लागल्याने शरीराला नको ते पदार्थ घेतले जातात. आत्म्याला दुःख होते म्हणून संचयाचे वेळी ‘चयकारणविव्देष’ व्यक्त करतो, पण मन इंद्रियाचेच ऐकते व कर्मेंद्रियाकडून नको तेच करून घेते व नको तेच पदार्थ सेवन करविते. आत्मा पुन्हा पुढचे पाऊल टाकतो व वरच्या चिन्हाच्या जोडीला ‘कारणविपरीत गुणेच्छा’ निर्माण करतो.
प्रसर
मन, इंद्रिये आत्म्याच्या वरील आदेशांना न मानता अनिष्ट तद्गुणी आहाराचे सेवन चालूच ठेवतात तेव्हा संचय स्थानात दोष अधिकाधिक साचू लागतात. मर्यादा संपल्यानंतर दोष अन्यत्र पसरतात. अरूची, अंग गळणे इ. दुःखद चिन्हे वरील चिन्हांच्या जोडीला निर्माण करतो.
स्थानसंश्रय
मनादी अजूनही आत्म्याला न जुमानता तेच करू लागले, तर दोषांची रसद वाढते व ते शरीरातील अन्य विशिष्ट स्थानी संचित होऊ लागतात. ज्या अवयवाची स्रोतसे व घटक अव्वल असतील तेथे जाऊन संचित होऊ लागतात किंवा त्या दोषाचे जे वैशिष्टय असेल त्याला अनुकूल अशा अवयवात जाऊन संचित होतात. दोष अहृद्य आहारजन्य असले तर हृदयात, अचक्षुष्य असले तर डोळ्यात असे त्या त्या अवयवावर आक्रमण करून तेथे साठतात. या वेळी वरील सर्व चिन्हांबरोबर ह्या स्थानाची विकृतिदर्शक चिन्हे व्यक्त होऊ लागतात. या अवस्थेला स्थानसंश्रय किंवा व्यक्त होणाऱ्या चिन्हांवरून पूर्वरूपे म्हणतात.
व्यक्ती
वरील मिथ्याहारादी कार्यक्रम तसाच चालू झाला तर दोष ज्या स्थानाच्या आश्रयास गेले त्या स्थानावर आक्रमण करतात व तो अवयव विकृत करतात व तद्दर्शक चिन्हे व्यक्त होतात. या अवस्थेला व्यक्ती (रोगाची) किंवा रोग म्हणतात.
वरील सर्व अवस्था रोगनिर्मितीच्या आहेत. यांनाच संप्राप्ती म्हणतात. यानंतर बहुधा रोगी वैदयाच्या नियंत्रणात येतो. त्यामुळे दोष नष्ट होऊन रोग नाहीसा होतो पण हे असेच चालले तर स्थानिक रोग फुटता (भेद) पुन्हा अन्य स्थानांत दोष जाऊन दुसऱ्या रोगांची उत्पत्ती (उपद्रव) होतो.