संतोबा पवार
संत संताजी पवार हे रांजणगावचे म्हणून मानले जात. हे रांजणगाव सेन्ट्रल रेल्वेच्या ( पुणे - दौंड विभाग ) केडगाव - घोडनदी रत्याने सहा मैंलावर सालो - मालोचे पारगाव लागते, तेथून भीमा नदी ओलांडून दोन मैल पश्चिमेकडे गेले की, रांजणगाव - सांडस लागते. रांजणगावाच्या नैरृत्येस दोन - अडीच फर्लांगावर वाळकी गाव लागते. रांजणगाव आज शिरूर तालुक्यत आहे. पद्म पुराणाच्या उत्तरसंहितेतील ‘ भीमामहात्म्यांतील २५ व्या अध्यायात मुळा, मुठा, भीमा यांच्या संगमाने पवित्र झालेल्या रांजणगावचे महात्म्य सांगितले आहे. संताजी या रांजणगावच्या पवार या क्षत्रिय घराण्यातील होते असे सांगतात. अर्थात हे घराणे सतराव्या शतकानंतर रांजणगावी आले असावे असे बा. सी. बेन्द्रे सांगतात.
( तुका. संतसांगाती, पृ. २०१. ). सतराव्या शतकानंतर त्यांचे वंशज नागरगाळी स्थायिक झाले असे बेन्द्रे म्हणतात. दोन्ही गावी संतोबांची पुण्यतिथी साजरी केली जते. या घराण्याचा संबंध राजे - सरदारांशी मोहिमेत आला असावा. घराणे खूपच समृद्ध, ऐश्वर्य शाली होते. संताजी प्रापंचिक होते. यशोदा ही त्यांची पत्नी. दोघेजण आल्या - गेल्याचे स्वागत मनापासून करीत. संतोबा विठ्ठलाचे परमभक्त होते. संपत्तीचा गर्व त्यांना कधीच झाला नाही. ते मनाने विरक्त होते. अंतःकरणातील भक्ती जसजशी वाढत गेली तसतसे ते विरक्त बनत गेले. एके दिवशी संतोबा घर -दार, आप्त - गणगोत सोडून निघून गेले. ते खरे म्हणजे मूळचे शिवभक्त. भीमा - मुळा - मुठा संगम व त्यावरील संगमेश्वराचे देवालय, याशिवाय त्यांच्या भावविश्वात दुसऱ्या कशालाच स्थान राहिले नाही. पुढे पतिपरायण त्यांची पत्नीही घर - दार सोडून त्यांच्यासमवेत गेली. सर्वसंग परित्याग करणाऱ्य़ा विरक्ताला विश्वाचे अधिराज्य भोगता येते ते एका भिक्षावृत्तीने. हे पतिपत्नी असे राज्य भोगत होते.
एकदा संतोबांच्या सांगण्यावरून यशोदा सालोमालोच्या गावी भीक्षा मागायला गेली. तेथे राहणाऱ्या संतोबाच्या गह्री भिक्षा मागायला ती आली असता तिला पाहून तिची वहिनी रडू लागली. तिनं स्फुंदत स्फुंदत विचारले, ‘ वहिनी, प्रपंचात राहून देव नाही का जोडता येत ? ’ त्यावर यशोदा म्हणाली, ‘ वन्सं, त्यांना अस्मानाला कवटाळायचं आहे, मग अस्मानाखाली राहायला नको का ? तुकोबांनी नाही का असंच कवटाळलं ? ’ यशोदा तशीच उंबरठ्यावर उभी राहिली, ज्या ऊंबरठ्यावर कोणाचाही अधिकार नसतो त्यावर अधिकार असतो विरक्ताचा. यशोदा भिक्षा घेऊन निर्विकार मनानं परतली. संतोबांना भिक्षा दाखवली. त्यातील भावरीवर त्यांना तूप दिसले. ते त्यांना विषासारखं वाटलं. त्यांनी विचारलं, ‘ कुठनं आणलंस ? ’ ती म्हणली, ‘ नको नको म्हणता वन्संनी वाढलं ? संतोबांनी परगावाला जाऊन ते परत करायला सांगितलं. यशोदा परगावाला गेली, वन्संना भेटून म्हणाली, ‘ वन्स, देवाला नैवेद्य दाखवला. हा घ्या प्रसाद ’ असे म्हणून तिनं ती तुपाची भाकरी परत केली.
तिला यायला उशीर झाला. दिवस मावळला. भीमा ओलांडायची होती. पावसाळ्याला तोंड फुटलेलं. चक्रीवादळ. धुवाधार पाऊस पडू लागला. नदीला पाणीच पाणी. घोंगावणारा वारा. नदी कशी पार करायची ? ती घाबरून गेली. विठोबाचा धावा केला. उतक्यात एक पुरुष आला. त्याला तिनं सारी हकीगत सांगितली आणि पती वाट बघत असतील, काळजी करीत असतील म्हणून सांगितले. तो माणूस म्हणाला, ‘ बाई, ते वाट बघणं शक्य नाही. कारण ते ध्यानस्थ बसले आहेत. मी त्यांना ओळखतो. बसा माझ्या खांद्यावर. ’ अंधार होता. त्याचा चेहरा विजेच्या लखलखाटात निमिषार्ध दिसला. तो तेजस्वी पुरुष वाटला. यशोदा त्यांच्या खांद्यावर बसली. थोड्याच वेळात झेपावत वाहणारी नदी पार केली. बाई खाली उतरल्या पाहतात तो तो माणूस दिसेना. तिला कळून चुकलं, भव नदी पार करून देणारा हा पैलपारू तर नव्हता ? तो भोयी मुळीच नव्हता. तिने ही सारी हकीगत नवऱ्याला सांगितली. तिला चिंता, वेदना, जाणीवा राहिल्याच नव्हत्या. तिला परिसस्पर्श झाला होता. संतोबा म्हणाले, ‘ यशोदे, माणसाला मोह सोडता येतो, बाईला नाही. ती प्रकृती आहे. पण तू सारे मोह सोडून माझ्या मागं बैरागीण होऊन आलीस; म्हणून माझ्या आधी तुला देवानं दर्शन दिलं भाग्यवान आहेस. ’ एक दिवस संतोबानं प्रतिज्ञा केली, ‘ देवानं मला दर्शन दिल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. ’
संतोबांनी अन्न - पाणी यांचा त्याग केला. अखंड नामस्मरण. यशोदा तरी पती उपाशी असताना कशी भोजन करणार ? दोघंही प्रायोपवेशन करू लागले. एका नैष्टिक वाण्याच्या स्वप्नात देव गेले व त्या वाण्याला सांगितले की, संतोबांना पंचपक्कान्ने करून भोजन घाल, तुला संतसंग प्राप्त होईल, तू उद्धरशील. त्याप्रमाणे वाण्याने केले. संतोबांनी अन्नाचा कणदेखील घेतला नाही. वाण्यानं स्वप्नदृष्टान्त सांगितला; तरीही संतोबा ऐकेनात. शेवटी वाणी निघून गेला. एक दिवस मात्र संतोबांच्या अंधकारमय जीवनात पहाट उजाडली. पहाटेच त्यांना सर्वत्र प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशात पीतांबरधारी, चतुर्भुज हाती शंख - चक्र - गदा - पद्म असलेली मूर्ती प्रकट झाली. संतोबांनी व यशोदेने त्याचे पाय धरले व घळाघळा अश्रू ढाळले. समचरण विठ्ठलाचे पाय प्रक्षाळून निघाले. देवाने त्यांना आशिर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. सगुणमूर्तीच्या दर्शनानंतर त्यांना पुढे ‘ आत्मारामा ’च्या साक्षात्काराचा ध्यास लागला. त्यासाठी त्यांनी तुकोबांना गुरू केले. त्यांनी तुकोबांचा ध्यास घेतला. तुकोबा त्यांचे समकालीन. पण तुकोबांनी प्रत्यक्ष अनुग्रह कुणालाच दिला नाही. दिला तो स्वप्नदृष्टान्त. त्यानुसार एक दिवस तुकोबा संतोबांच्या स्वप्नात आले व गुरुमंत्र देऊन त्यांना बहिणाबाईप्रमाणेच ‘ मंत्रगीता ’ दिली. संतोबांच्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. भक्ती हीच त्यांची जीवननिष्ठा बनली व ‘ हरिहरैक्यरूप ’ विठोबा हे त्यांचे उपास्य दैवत बनले. पंढरी हे वैकुंठ पंढरी म्हणून त्यांच्या भावविश्वात साकार झाले. भक्ति हीच मुक्ती मानून संतोबा पूर्ण प्रज्ञ झले. देवदास ‘ संतमालिके ’त संतोबांविषयी म्हणतात, ‘ संतोबासी दिधली गीता । अद्वय नामा केला सरता ! तत्कालीन लोकमानसात संतोबांविषयी परम आदराचे स्थान प्राप्त झालेच, पण साक्षत्कारी संत निळोवाही त्यांच्याविषयी गौरवाने म्हणतात, ‘ संतोबासी वैराग्ये म्हणिलें । निजस्थान पालखीं निजविले । निजभुवनीं आपुलिया ’ ( तु. ता. अ. क्र. ५०१ ). ‘ संतोबा पवार हरिभक्त अपार । हे परम प्रीतिकर विठोबाचे ( तु. ता. अ. क्र. १४७७ ). एकदा पंढरपूरची वारी करीत असताना नदीला पूर आला. पण संतोबांच्या कृपेने सर्व वारकरी त्या पुरातून पैलतीरी आले. एकदा सतत भांडणाऱ्या ब्राह्मण दांपत्याला त्यानी वठणीवर आणले. ‘ मी संतोबांसारखा बैरागी होतो ’ असं सतत म्हणणाऱ्या पत्नीला सांगायला लावलं की ‘ व्हा बैरागी ’. तो संतोबांकडून वैराग्य घेऊन बसला. पण बैराग्याचे जीवन त्याला साहवेना व परत पत्नीशी भांडणार नाही या शपथेवर संसाराला लागला. तुकोबापुत्र नारायणबाबा वैभवसंपन्न व त्याचा अभिमान करणारे होते. संतोबा त्यांच्या भेटीस आले असता त्यांना तेच दृश्य दिसलं. त्यांनी आपल्या अंगच्या निर्भयपणानं व अधिकारानं त्यांना खडसावलं, ‘ नारायणबाबा, विदेहत्वाला गेलेल्या तुकोबा महाराजांचे आपण थोर पुत्र, आणि हे वैभव अंगाखांद्यावर वागवून त्याचा अहंकार बाळगता ? ’ असं खडसावून गुरूपुत्र म्हणून त्यांना नमस्कार केला व तडक निघून गेले. संतोबांचा अधिकार मोठा होता. तुकोबांइतकेच लोक त्यांना मानीत. त्यांनी अभंगरचना केली नसेलही, पण तुकोबांची अभंग गंगा त्यांच्या नसानसातून वाहत होती. त्यांच्या बोलाचा परिणाम होऊन नारायणबाबा विरक्त वृत्तीनं राहू लागले. रांजणगाव - वाळकी बेटावरील त्यांची समाधी अजूनही सर्वांना अंतरीच्या वैराग्याचे महत्त्व सांगत आहे