संजय संगवई
संजय व्यंकटेश संगवई (२३ डिसेंबर, इ.स. १९५९ देगलूर, नांदेड - २९ मे, इ.स. २००७ कोची, केरळ ) हे मराठी लेखक, पत्रकार, संपादक, माध्यमतज्ज्ञ, माध्यम चिकित्सक होते. ते नर्मदा बचाव आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ता आणि जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे (एन.ए.पी.एम.(NAPM Archived 2015-09-11 at the Wayback Machine.)) समन्वयक होते. मेधा पाटकर यांचे ते निकटवर्ती होते. "अभिव्यक्ती (त्रैमासिक)" या नासिक येथून प्रसिद्ध होणाऱ्या माध्यम विषयक मराठी त्रैमासिकाचे संपादक होते. "माणूस" साप्ताहिकात त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर, तसेच शास्त्रीय संगीतावरही जाणकारीने विपुल लेखन केले.[१]
संजय संगवई अनेक वर्षे हृदयविकाराने आजारी होते. या विकारावर औषधोपचार करण्यासाठी ते केरळमधील कोची येथे एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले.
पर्यायी पत्रकारिता ही विकासाभिमुख पत्रकारितेची संकल्पना संजय संगवई यांनी त्यांच्या लेखनातून रुजविली. त्यांचे सारे लेखन त्यांनी याच हेतूने केले होते. संजय संगवई यांच्या मृत्युनंतर त्यांच्या स्मरणार्थ प्रकाशित केलेल्या अंकात त्यांचा 'संन्यासी माध्यमकर्मी' असा गौरव अभिव्यक्तीच्या संपादकीयात करण्यात आला आहे.[२]
संजय संगवई हे शास्त्रीय संगीताचे आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश आणि रशियन भाषा अवगत होत्या.
कौटुंबिक माहिती
मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या संजय संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. संजय संगवई धाकटे भाऊ रवींद्र व्यंकटेश संगवई मराठी, हिंदी चित्रपटांत काम करणारे चरित्र अभिनेता असून ते रिझर्व बँक ऑफ इंडियात उच्चाधिकारी आहेत.मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री शुभांगी मोहन गोखले ही संजय संगवई यांची धाकटी बहीण आहे.
संजय संगवई यांची शैक्षणिक कारकीर्द
- प्राथमिक शिक्षण - सरस्वती भुवन, जालना
- १९७६ : दहावी – तिसरा क्रमांक – जालना जिल्हा,मराठवाडा विभाग
- १९७८ : बारावी - प्रथम क्रमांक – परभणी जिल्हा, मराठवाडा विभाग
- १९८१ : बी. ए. - राज्यशास्त्र, स. प. महाविद्यालय, पुणे
- १९८३ : बी. ए. – संस्कृत – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
- १९८४ : एम. ए. – राज्यशास्त्र, फर्गसन महाविद्यालय, पुणे
- १९८४ : प्रथम, वृत्तपत्र पदविका, वृत्तपत्र व संज्ञापन (रानडे इन्स्टिट्यूट) विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
- १९८४ : रशियन भाषा आणि चलचित्रपट निर्मिती, प्रमाणपत्र परीक्षा, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ, पुणे
व्यावसायिक कारकीर्द
- १९८२ – ८४ : उपसंपादक, लोकमत, औरंगाबाद
- १९८६ – ८९ : उपसंपादक, सकाळ, पुणे
- १९८६ – ८८ : अधिव्याख्याता (अभ्यागत), वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभाग (रानडे इन्स्टिट्यूट), पुणे विद्यापीठ, पुणे
- १९८९ पासून : नर्मदा बचाओ आंदोलन, समन्वयक : जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय, विविध इंग्लिश मराठी, हिंदी भारतीय आणि परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकात सातत्याने लेखन.
संजय संगवई यांनी लिहिलेली पुस्तके
- २००२ : अस्मिता आणि अस्तित्व (वैचारिक लेखांचा संग्रह)
- कलंदर सुरांच्या स्मृतींची मैफल (संगीतविषयक); प्रकाशक - मैत्रेयी पुस्तकालय, पाने १५२, रु. १५०/-
- २००७ : उद्गार (वैचारिक), पॉप्युलर प्रकाशन, , रु. १४२/-, पाने १९७, ISBN-10: 8171859542, ISBN-13: 978-8171859542
- दर्शन
- नद्या आणि जनजीवन : नर्मदा खोऱ्यातील लोकांच्या संघर्षाचा ऐतिहासिक दस्तावेज; मनोविकास प्रकाशन पुणे, पाने २४६, रु. २३७
- २००२ : Peoples Movement in the Narmada Valley (इंग्रजी)
- माध्यमवेध, अभिव्यक्ती प्रकाशन, नाशिक, रु. १००/-
- १९९९ : River and Life (इंग्रजी)
पुरस्कार
- १९९७ : राम आपटे प्रतिष्ठानचा सामाजिक कृतज्ञता निधी पुरस्कार
- १९९९ : महाराष्ट्र फाउंडेशन, सामाजिक कार्य
- २००१ : महानगर पुरस्कार, पर्यायी पत्रकारिता
- २००३ : श्री.ग. माजगावकर कृतिशीलता पुरस्कार
लेखन पुरस्कार
- २००३: वैचारिक ग्रंथ पुरस्कार, ‘अस्मिता आणि अस्तित्व’ – समाज विज्ञान मंडळ न्यास, मुंबई
संजय संगवई मंच
बलवडी (तालुका खानापूर जिल्हा सांगली ) येथे संजय संगवई यांच्या स्मरणार्थ 'संजय संगवई मंच' हे वैचारिक चर्चापीठ स्थापन करण्यात आले आहे.[३]
बाह्य दुवे
- सरदार सरोवर संकेतस्थळ
- Friends of the river Narmada संकेतस्थळ
- (now defunct) World Commission on Dams (WCD) Archived 2006-01-18 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ लोकसत्ता, पुणे आवृत्ती, पान ३, बुधवार दि.३० मे २००७
- ^ संपादकीय,"अभिव्यक्ती "- माध्यम चर्चेचे मराठी त्रैमासिक, वर्ष ११, अंक ४८-४९, एप्रिल-सप्टेंबर २००७, नासिक
- ^ श्रावण मोडक,प्रवास (१),श्रीगणेश लेखमाला २०१५, मिसळपाव, http://www.misalpav.com/node/3008