संग्रहालय
एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वास्तु, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा 'वस्तू संग्रहालय' म्हणतात.[१]
संग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणाऱ्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.[२]
इतिहास
असा संग्रह करण्याची कल्पना प्राचीन काळी ग्रीस देशात उदय पावली. इसवी सनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले. त्यात ग्रीक पंडितांचे पुतळे, शूर पुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे, विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला होता. पुढे युरोपात अशी अनेक खाजगी संग्रहालये निर्माण झाली. कालांतराने अशी वस्तू संग्रहालये ही मनोरंजनाची व ज्ञान साधनेची केंद्रे मानली जाऊ लागली, त्यामुळे सार्वजनिक संग्रहालये स्थापण्याची कल्पनाही उगम पावली. भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झाले. त्यानंतर इ.स. १८५०च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्रहालय झाले. इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव झाला. त्या निमित्ताने भारतातही अनेक ठिकाणी संग्रहालये सुरू करण्यात आली.[३]
प्रकार
१. इतिहास संग्रहालय - ऐतिहासिक व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांचा परिचय करून घेत इतिहास संग्रहालयाला भेट देणाऱ्याला इतिहासकालीन घटनांचा विशेष अभ्यास करणे शक्य होते. वस्तू, हत्यारे, कागदपत्रे पाहात असतान मानवी संस्कृती, राजेरजवाडे यांचा भूतकाळातील प्रवास यांची माहिती होते.
२. उत्क्रांती इतिहास संग्रहालय - खडक, स्फटिक, मासे, पक्षी, सरीसृप प्राणी व जीवाश्म नमुने आदी पाहताना पृथ्वीची निर्मितीपासून ते मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतच्य पुरातन इतिहासाची आणि जैवविविधतेची ओळख होते.
३. सजीव संग्रहालय - वनस्पती उद्यान, प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान, मत्स्यालय यांसारखी ठिकाणे जिवंत जीवसृष्टीचा परिचय करून देण्यासाठीची महत्त्वाची ठिकाणे आहेत. वनस्पती, प्राणी यांची शरीररचना, हालचाली, त्यांचे सहसंबंध अशा अनेक गोष्टींचे दर्शन घडविण्यासाठी ही संग्रहालये अभ्यासकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.
४. विशेष संग्रहालय - दल, रेल्वे, संरक्षण विभाग इत्यादींसारख्या विशेष खात्यांची संग्रहालये, तसेच विशेष वेगळ्या वस्तूंची मांडणी असलेली विशेष संग्रहालये (उदा. बाहुली संग्रहालय, विज्ञान केंद्र इ.)
५.आंतरजालावरील संग्रहालये - वेळ, अंतर, आदीचा विचार करता जगभरातील संग्रहालये घरबसल्या पाहता यावीत यासाठी आंतरजालावर अनेक व्हर्च्युअल संग्रहालये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.[४]
भारतातील काही प्रमुख संग्रहालये
- आगाखान राजवाडा संग्रहालय, पुणे
- आदिवासी वस्तु संग्रहालय, पुणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे
- रिझर्व बँकेचे चलन संग्रहालय, मुंबई
- जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर
- डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, पुणे
- रामलिंगप्पा लामतुरे वस्तूसंग्रहालय ,तेर , उस्मानाबाद
- नॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई
- नाणी संग्रहालय, त्र्यंबकेश्वर
- पोथी संग्रहालय, नाशिक
- प्राज्ञ पाठशाळा, वाई-हस्तलिखिते संग्रहालय
- महात्मा फुले वस्तु संग्रहालय (लॉर्ड रे म्युझियम), पुणे
- दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संग्रहालय, मुंबई
- श्री भवानी संग्रहालय, औंध, सातारा
- डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय (व्हिक्टोरिया ॲन्ड अलबर्ट म्युझियम), मुंबई
- भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय पुणे
- भारतीय संग्रहालय दिल्ली
- भूमी अभिलेख संग्रहालय, पुणे.
- मानव संग्रहालय (भोपाळ)
- राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय पुणे
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय, पुणे.
- रेल्वे संग्रहालय, पुणे
- लोकमान्य टिळक संग्रहालय पुणे
- वैदिक संशोधन मंडळ-यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय, पुणे
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), मुंबई
- सिद्धगिरी ग्रामीण जीवन संग्रहालय, कोल्हापूर
- मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर
- शस्त्रास्त्र संग्रहालय, न्यू पॅलेस ,अक्कलकोट
चित्रदालन
- गारगोटी येथील संग्रहालय
- वायनाड (केरळ) येथील संग्रहालय
- दिल्ली येथील संग्रहालय-हडप्पा संस्कृतिची झलक
- राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
- राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे येथील ऐतिहासिक तोफ