संगमनेर
संगमनेर | |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | ७ लाख २०१९ |
दूरध्वनी संकेतांक | ०२४२५ |
टपाल संकेतांक | ४२२६०५ |
वाहन संकेतांक | महा १७ |
निर्वाचित प्रमुख | सौ दुर्गाताई सुधीर तांबे (नगराध्यक्ष) |
प्रशासकीय प्रमुख | मुख्याधिकारी () |
संकेतस्थळ | http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Ahmadnagar/places_s.html |
संगमनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे. ते प्रवरा व म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो.अहमदनगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ (कापड, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने) तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. संगमनेर हे जिल्ह्याचे "हॉस्पिटल हब" म्हणूनही ओळखले जाते. शहर मध्यवर्ती ठिकाणी (मुंबई, पुणे आणि औरंगाबादच्या मध्यभागी आहे) आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकपासून फक्त दोन तासावर आहे. ऊस लागवडीसाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या संगमनेरला आता टोमॅटो तसेच डाळिंबाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. संगमनेरची 'कृषी उत्पन्ना बाजर समिती' ही देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते. संगमनेर हे जिल्ह्यातील बहुतेक रहदारीचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आता नासिक पुणे रेल्वेमार्गाचे संगमनेर शहर येथे टर्मिनल प्रस्तावित आहे. मध्यवर्ती स्थानामुळे, शहरातील बसस्थानक 24 तास उच्च पातळीवर सार्वजनिक वाहतुकीसह खुले आहे. संगमनेर येथील एमएसआरटीसी टर्मिनल हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात हायटेक बसस्थानक आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या बसेसही दररोज येथे येतात.येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक उभारावे अशी मागणी आहे.संगमनेर शहराला खुप वैभवशाली कारकीर्द लाभलेली आहे.
शिक्षणसंस्था
संगमनेरात पहिली शाळा १८३४ला सुरू झाली.[१] पहिली उर्दू शाळा १८६९मध्ये स्थापन झाली. पहिले महाविद्यालय १९६१ या वर्षी सुरू झाले. संगमनेरात वैदिक शिक्षण देणाऱ्या दोन पाठशाळाही होत्या.[२]
शाळा
संगमनेरातील स्वातंत्र्यपूर्वकाळातील शाळांची माहिती पुढीलप्रमाणे :[३]
- जीवन शिक्षण मंदिर क्रमांक १ (मराठी शाळा नं. १) : स्थापना ०१-०१-१८३४
- जीवन शिक्षण मंदिर क्रमांक २ (मराठी शाळा नं. २) : स्थापना ०१-०८-१९१५
- जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ३ (मराठी मुलींची शाळा नं. ३) : स्थापना ०१-०४-१८६५
- जीवन शिक्षण मंदिर क्रमांक ४ (उर्दू शाळा) : स्थापना ०१-०४-१८६५
- पेटिट विद्यालय : स्थापना १८९६
महाविद्यालये
संगमनेर शहर हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत शहर असून जिल्ह्यातील शिक्षणाचे अग्रगण्य केंद्र मानले जाते. येथे कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील सुमारे सोळा शिक्षणसंस्था आहेत.
'संगमनेर महाविद्यालय' हे येथील सर्वात जुने व मुख्य महाविद्यालय आहे. तसेच 'सह्याद्री महाविद्यालय' अणि 'सराफ महाविद्यालय' ही इतर महाविद्यालये आहेत. येथे एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, दोन होमियोपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये, दोन आयुर्वेदिक महाविद्यालये, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये व दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयेही आहेत. हे शहर विकसनशील शहर म्हणून ओळखले जाते. आताच गर्दीने वेढून गेले आहे.
इतिहास
संगमनेर गावाला सुमारे २३०० वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजवटीपासून संगमनेर गाव अस्तित्वात असल्याचे मानले जाते. सातवाहन राजवट ते आधुनिक संगमनेर हा सुमारे २३०० वर्षांचा प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात मांडला आहे. सन २०११ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. संगमनेरचे वेगवेगळ्या काळातील राज्यकर्ते, इथे घडलेल्या घटना घडामोडी, स्वातंत्र्य संग्राम, तत्कालीन थोर व्यक्तिमत्त्वांच्या संगमनेर भेटीचा वृतान्त, नगरपालिकेची स्थापना, संगमनेर गावाला आधुनिक स्वरूप येतानाच्या काळातील घडामोडी, इथे आलेले महापूर आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा परामर्श ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. संगमनेर Archived 2020-06-28 at the Wayback Machine. तालुक्याच्या सीमेला अकोले व राहता तालुके आहेत.
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ते ११ परगणे खालीलप्रमाणे
- संगमनेर - ८,१६,६३७ रु
- अहमदाबाद व पतवद - ८,८३,३७३रु
- अकोला - ६३,४४६रु
- बेळवा - ३५,९५५रु
- त्र्यंबक - ८४८२रु
- जाफराबाद व चांदोरी - २,५२,८६६रु
- दिंडोरी - ३७,६८४रु
- धांदरफळ - १२,८१५रु
- सिन्नर - २८,८९०रु
- नाशिक - १,६७,७६६रु
- वरिया- १,१७,१०३रु
ब्रिटिश सरकारने देशातील नागरिकांना स्थानिक स्तरावर सत्तेत सहभागी करून घेण्याचे ठरवले होते, व त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील काही शहरांच्या विकासासाठी नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात संगमनेरचा समावेश होता.
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५० च्या अॅक्ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट (??) यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून संगमनेरचे मामलेदार, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.
संगमनेरमधील कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
इतर इतिहास
कला आणि साहित्यिक वारसा लाभलेले संगमनेर - कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार अशी काही वैशिष्ट्ये असलेल्या संगमनेर शहराला मोठा साहित्यिक वारसा
लाभलेला आहे. कवी अनंत फंदी हे संगमनेरचे पहिले ज्ञात साहित्यिक. त्यांनी लावण्या, विविध कवने लिहिली, पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला ' फटका ' या काव्यप्रकाराची ओळख करून दिली. समाजातील अपप्रवृत्ती, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आपल्या फटका या काव्यप्रकारातून शाब्दिक प्रहार केले. बिकट वाट वहिवाट नसावी हा त्यांचा अक्षरफटका म्हणजे मराठी काव्यक्षेत्रातील अनमोल रत्न आहे. त्यांनी श्री माधवग्रंथ नावाचा ओवीबद्ध ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्याच नावाने येथील संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ' कवी अनंत फंदी साहित्य ' पुरस्कार दिला जातो. अतिशय पारदर्शकपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा राज्यात मोठा लौकिक आहे. महत्त्वाचे म्हणजे कुणाही एका व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक प्रायोजकत्व न घेता लोकसहभागातून दिला जाणारा हा राज्यातील एकमेव साहित्य पुरस्कार आहे.
कवी नरहरसा संगमनेरकर यांनी अवघ्या मराठी मुलखात आपल्या शीघ्र कवित्वाने अधिराज्य गाजवले. यांचा जन्म किंवा मृत्यू याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या काव्य रचनेवर खुश होऊन लोकमान्य टिळक, बालगंधर्व, शि. म. परांजपे, संगीतसूर्य केशवराव भोसले आदी मान्यवरांनी दिलेली पत्रे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहेत.
याखेरीज नारायण गंधे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, मा. रा. लामखडे, पोपट सातपुते, डॉ. संतोष खेडलेकर, नीलिमा क्षत्रिय, डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरच्या साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे.
नेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. निजामशाहीत (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संग्रामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
पेशवाईतील प्रसिद्ध साडेतीन शहाण्यांपैकी विठ्ठल सुंदर परशरामी, याशिवाय शाहीर अनंत फंदी (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
संगमनेर ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून कापड, तयार कपडे, दागिने, धान्य इत्यादींचे हे मोठे व्यापारकेंद्र आहे. नासिक, शिर्डी, दत्त मंदिर श्री क्षेत्र अकलापूर, शनी शिंगणापूर, भंडारदरा धरण, प्रवरानगर-लोणी, कळसूबाई शिखर इ. शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन स्थळे येथून जवळ असल्याने या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे १८६१ साली नगरपालिकेची स्थापना झाली असून तिच्या द्वारे सर्व नागरी सुविधा पुरविण्यात येतात. अकोला व संगमनेर तालुक्यांची एक संयुक्त कृषी बाजार समिती १९६९ साली येथे स्थापन करण्यात आली आहे. शहरात पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये आहेत. ग्रंथालये, बालभवन या सुविधांबरोबरच विधी, वैद्यक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी शहरात आहेत. संगमनेर शहरात प्रसिद्ध अशा वृत्त संपादन ऑनलाईन पोर्टल आहेत. त्यात संगमनेर अकोले शहरातील संगमनेर अकोले न्यूझ हे असे नावलौकिकप्राप्त वेब पोर्टल आहे की ज्याच्याद्वारे संगमनेर अकोले शहरांतील बातमी जगभरात पोहोचवली जाते.
संगमनेर शहराचा वसंत बंदावणे लिखित नाट्य-चित्रपट इतिहास
संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यां नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत. विद्युत मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर, डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू, थेंब थेंब आभाळ, संध्या छाया, अशी पाखरे येती इत्यादी नाटके बसवून घेतली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. विद्युत मंडळाच्या या नाट्यसंघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. या स्पर्धांपासूनच बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने पुढेही कायम राखली.
मंडळाच्या ‘थेंब थेंब आभाळ’ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. ‘अशी पाखरे येती’ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा ‘युवा महेश’ नावाचा नाट्य ग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत. पुढे ही परंपरा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्यांचेही निधन झाले. मोहन जोशी हेही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके येणे बंद झाले. दूरदर्शनचाही या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंचच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होऊनही त्यात अनेक उणिवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक अस्तात.
नाटकांप्रमणेच चित्रपट, चित्रवाणी मालिका या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निंबाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडिओ टाकला. संगमनेरचा कलावंत राजन झांबरे यांनी माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमांत छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका, सिनेमांत ते आजही काम करीत आहेत.
संगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, .डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहीत नसल्याने प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.
संगमनेरमध्ये बनलेली पहिल्या दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वतः लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
संगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान?’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.
कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शॉर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तोही दिग्दर्शन क्षेत्रात उतरला..त्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेऊन “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवले आहे. ॲड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे. केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्सच्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे, अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे, अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रतच्या काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
ई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.
बंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरू केलेले अंतून घोडके यांनी पुढे थँक्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमांत काम केले. जाकीर खान या कलावंताने रायरंद (?) व इतर काही सिनेमांतून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने ‘संगमनेरी घोडा’ या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका केली आहे.
वसंत बंदावणे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांत संगमनेरच्या संस्कृतीवर आधारित ‘इथं नांदते एकात्मता’ हा विशेष कार्यक्रम होता. याशिवाय संगमनेरातील भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांचेसह अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी टी.व्ही.वर घेतल्या आहेत. बंदावणे यांनी संगमनेरचे सर्वाधिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सदर केले आहेत. गाजलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेतील कलावंत मुकेश खन्ना यांना २००० साली संगमनेरात आणून बंदावणे यांनी गर्दीचा उच्चांक मोडला होता. पंडित नेहरू जयंती शताब्दी निमित्त बालनाट्य महोत्सव घेऊन त्याच्या उद्घाटनाला महाभारत या मालिकेतील बाळकृष्णाची भूमिका करणारा केवल शहा याला आणले होते. भाऊसाहेब थोरात या महोत्सवाचे उद्घाटक होते. शालेय अभ्यासक्रमावर मनोरंजक फिल्म तयार करून ती सर्व शाळांमध्ये मुलांना दाखवण्यात आली होती. तिचे प्रकाशन १९८८ साली नानासाहेब गोरे यांनी केले होते.
वसंत बंदावणे यांनी आपल्या लिनियर फिल्म या संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलांसाठी अभिनय वर्गाचे सातत्याने आयोजन केले आहे. यातील बऱ्याच बालकलाकारांना मालिका व लघु चित्रपटातून संधी दिली आहे.
काही वर्षांपूर्वी मालपाणी उद्योग समूह व माहेश्वरी मंडळाने सुरू केलेल्या ‘संगमनेर फेस्टिव्हल’ने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात भर घातली आहे. गणेशोत्सव काळातला हा फेस्टिव्हल म्हणजे संगमनेरकरांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. त्यात दर्जेदार नाटके, नृत्ये, धार्मिक कार्यक्रम यांचा मनोहारी संगमच असतो. डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीष मालपाणी, सचिन पलोड, व संगमानेरातील सर्व गणेश मंडळांचा सहभाग यात असतो.
नृत्य क्षेत्रात कुलदीप व विनोद कागडे बंधू चांगली कामगिरी करीत आहेत. नृत्य प्रशिक्षण वर्ग चालवून ते संगमनेरच्या कलाकारांना टी.व्ही. वर संधी उपलब्ध करून देत आहेत.
संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर या तमाशा मंडळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर नेले आहे. कांताबाई सातारकर या हाडाच्या कलावंत आहेत तर चिरंजीव रघुवीर उत्तम विनोदी अभिनेता आहे. दोघांनीही कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे. मंदाराणी, अलका या नृत्य निपुण कलावंत आहेत. चित्रपटात अनेक संधी चालून आल्या असतानाही त्यांनी रंगमंचाची सेवा सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पारंपरिक तमाशाची कला टिकवून ठेवली आहे.
संगीत, चित्रकला, शिल्प या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रेसर होते. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर काम करून आपला ठसा उमटवला आहे. त्या काळात उमाजी पेंटर यांनी प्रभातच्या गोकुळचा चोर या सिनेमासाठी सेटचे काम केल्याचा उल्लेख सापडतो. या परंपरेचा आजचा दुवा म्हणजे कांचनकुमार बंदावणे व रुपाली बंदावणे. हे दोघेही संगमनेरचे कलावंत आजमितीला हिंदी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. अनेक नावाजलेले सिनेमा व लाईव्ह शो त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम (सौमित्र) हे संगमनेर तालुक्यातील तळेगावचे. तर जवळेकडलगचा नृत्यकार संतोष कडलग हा झी मराठीच्या ‘एकापेक्षा एक’ या नृत्य स्पर्धेत सेकंड विनर होता. ई टी.व्ही.च्या ‘हल्ला बोल’मधेही तो सहभागी होता. गौरव गुंजाळ या कलावंतानेही ई.टी. व्ही.च्या डब्बा गोल, व झी टोकीजच्या कॉमेडी ॲवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. आजही २०१७ साली संगमनेरचे अनेक कलावंत दृशव्य माध्यमाच्या मायावी दुनियेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.
संदर्भ
- ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
- ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
- ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), प्रकरण ९ : संगमनेर नगरपालिका - शिक्षण, पान ४२-५०, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर