Jump to content

संक्रांतवेल

संक्रांतवेल

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पायरोस्टेजिया
जात: पी. व्हेनुस्टा
वर्ग: युडीकॉटस
कुळ: बिग्नोनिएसी
शास्त्रीय नाव
पायरोस्टेजिया व्हेनुस्टा

संक्रांतवेल ही केशरी रंगाची फुले येणारी एक वेल आहे. मुळचा दक्षिण अमेरिकन असलेला हा वेल आता भारतातही सर्वत्र दिसतो. हिवाळ्यात गडद झळाळत्या केशरी कळ्यांनी आणि फुलांनी लक्ष वेधून घेणारा हा वेल बहुवार्षिक असून महावेल (Liana) ह्या प्रकारात गणला जातो.[] त्याच्या बहरण्याच्या काळातच महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण येत असल्यामुळे ह्या वेलाला संक्रांतवेल हे नाव मिळाले आहे.

संक्रांतवेलाची पाने गडद हिरव्या रंगाची, तुकतुकीत असतात. पाने संयुक्त प्रकारची असून २ ते ८ पर्णिका असतात. पर्णिकांचा आकार अंडाकृती (ovate) ते लांबट अंडाकृती (ovate oblong) असतो आणि लांबी साधारण एक ते दीड इंच असते. मधल्या पर्णिकेचे तणाव्यात रूपांतर होते आणि वाढताना आधारासाठी त्याचा उपयोग होऊन वेल लांबवर आणि उंचउंच विस्तारतो. कळ्या साधारण बोटभर लांबीच्या काहीशा फुगीर असतात. कळ्या उमलल्यावर त्यातून पाच पाकळ्यांचे फुल बाहेर येते. त्यातील दोन पाकळ्या एकमेकांना जवळ जवळ जोडून असल्यामुळे चारच पाकळ्या असाव्यात असा भास होतो. पाकळ्या साधारण एक ते दीड इंच लांबीच्या आणि नलिकाकृती असतात. फुले गडद केशरी रंगाची दीड ते २ इंच अकारमानाची असून त्यांना वास मात्र अजिबात नसतो.

संक्रांतवेलाला भरपूर सूर्यप्रकाश चांगला मानवतो. उष्ण व दमट हवेपेक्षा कडक हिवाळा असलेल्या हवामानात संक्रांतवेल चांगला बहरलेला आढळतो. कुंपण, मांडव, आसपासची उंच झाडे, घराचे छप्पर अशा कोणत्याही आधारावर हा वेल १० ते १२ मीटरपर्यंत उंच गेलेला आढळतो. चांगला दाट पर्णसंभार असल्याने हा वेल पक्षांना घरटी करण्यासाठी चांगला उपयोगी पडतो. महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे येत नाहीत.[] त्यामुळे त्याचे संवर्धन छाट कलमाद्वारे करतात.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b निसर्गसेवक (जानेवारी २०१९). "शिशिरातील बहर संक्रांतवेल". निसर्गसेवक: १३.