Jump to content

श्रुती ओझा

श्रुती ओझा
मराठवाडा कृषी महोत्सव, बीड मध्ये श्रुती ओझा
जन्म श्रुती अरुण ओझा
१२ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-12) (वय: २६)
बीड, महाराष्ट्र
निवासस्थान विप्र नगर, बीड
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे बीज कन्या[][]
नागरिकत्वभारत भारतीय
शिक्षण संगणक विज्ञान पदवीधर
मालक एस.व्ही.एस. सीड बँक
ख्याती बीज संकलन आणि मोफत बीज वाटप
कार्यकाळ २०१९ ते आजतागायत
धर्महिंदू
वडील अरुण ओझा
आई सुरेखा ओझा
नातेवाईक १ भाऊ व १ बहीण

श्रुती अरुण ओझा ह्या महाराष्ट्रातील बीड शहरात राहणाऱ्या एक मराठी समाजसेविका आहेत. ओझा यांना विविध प्रकारच्या देशी विदेशी घरगुती आणि शेतीउपयुक्त बीया व कंद जमा करण्याचा छंद आहे. तसेच त्या आपल्याकडे जमा केलेल्या बिया मागेल त्या व्यक्तीला मोफत देत असतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या छंदामुळे आणि त्याद्वारे चालणाऱ्या समाजकार्यामुळे त्या 'बीज कन्या' म्हणून ओळखल्या जातात.[][][]

ओझा यांनी या बीज बँकेचे नाव एस.व्ही.एस. सीड बँक असे ठेवले आहे. या बीज बँकेमार्फत ओझा यांनी आजपर्यंत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना टपाल द्वारे विविध प्रकारचे बियाणे मोफत वितरित केले आहे.[]

वैयक्तिक आयुष्य

श्रुती ओझा यांचा जन्म बीड येथे अरुण व सुरेखा ओझा या मध्यमवर्गीय जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील अरुण ओझा हे बीड येथे कुरिअरचा व्यवसाय करतात तर आई सुरेखा ह्या एक घरगृहिणी आहेत. एक मोठी बहिण मयुरी पांडे(राजस्थान) तसेच त्यांना युवराज नावाचा एक भाऊ देखील आहे.[] ओझा यांनी विज्ञान शाखेतुन 'संगणक विज्ञान' मध्ये पदवी प्राप्त केली आहे. लहानपणापासून फुलझाडे व वनस्पतींबद्दल आकर्षण असल्याने त्यांनी आपल्या अंगणात फुलझाडे लावण्यास सुरुवात केली. वडिलांकडे एक गुंठा देखील जमीन नसून ओझा यांनी आपल्या परसबागेत जमेल तशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वाढवल्या. यात देशी-विदेशी फुलझाडे, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती तसेच धान्याच्या बिया देखील जोपासल्या जातात.[]

कार्य

श्रुती ओझा यांच्या घरी शेती नव्हती तसेच त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शेतीकामाचे ज्ञान देखील नव्हते. परंतु त्यांच्या मनात झाड आणि फळेफुले याबद्दल एक वेगळे आकर्षण होते.[] एक दिवस ओझा यांनी काही बिया एका इलेक्ट्रॉनिक वाणिज्य स्थळावरून मागवल्या होत्या. त्यातील केवळ चार बिया वापरून उर्वरित बिया त्यांनी जवळच्या व्यक्तीला मोफत दिल्या. यातून त्यांना एक नवीन कल्पना सुचली, त्यानुसार त्यांनी आपल्याजवळ असलेल्या बिया इतर बियांच्या बदल्यात लोकांना वितरित करण्यास सुरुवात केली. यासाठी त्या फक्त टपाल खर्च आकारत असत.[]

इ.स. २०१९

इ.स. २०१९ मध्ये फेसबुक सारख्या समाज माध्यमातून ओझा यांची विवेक पाथ्रुडकर आणि संजय नरोटे यांच्याशी ओळख झाली. या तिन्ही समविचारी मित्रांनी ५ फेब्रुवारी २०१९ रोजी सीड बँकेची स्थापना केली. या तिघांच्या अद्याक्षरांना मिळवून सीड बँकेचे नाव 'एस.व्ही.एस. सीड बँक' असे ठेवण्यात आले.[][] हे तिघेही गरजू व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या बिया मोफत देत असत. तसेच फेसबुकवरील सीड बँकेच्या गृप द्वारे परसबागेशी संबंधित विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. याच वेळी फेसबुकच्या माध्यमातून या बँकेला सहा हजार नवीन सदस्य जोडले गेले.[]

इ.स. २०२०

वर्षाच्या मध्यापर्यंत ओझा यांच्याकडे २०० च्या आसपास वेगवेगळ्या प्रकारच्या बिया जमा झाल्या होत्या तर बँकेद्वारे त्यांनी जवळपास १८,००० व्यक्तींना फेसबुक गृप द्वारे जोडले. दरम्यान त्यांना मयूरी पांडे (राजस्थान),स्वाती कांबळी (रत्‍नागिरी), केतकी देवधर (मुंबई), शिल्पा तांबेकर (मुंबई), कावेरी उघाडे (औरंगाबाद) तसेच डॉ. चैतन्य पाटील (सांगली) हे नवीन साथीदार मिळाले.[]

इ.स. २०२२

इ.स. २०२२ च्या सुरुवाती पर्यंत ओझा यांनी फेसबुकच्या माध्यमातून ४०,००० नवीन सदस्य जोडले यात भारताबाहेरील ५४ देशांचा समावेश आहे. तर ब्राझील, कुवैत, इंडोनेशिया,अमेरिका, भूतान जपान व अफ्रिका या देशात देखील बिया पाठवण्यात आल्या.[] ओझा या स्वतः कमावत्या नसून केवळ आपल्या छंदापोटी वेगवेगळ्या अडचणीना तोंड देत मागेल त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बिया किंवा कंद देत असतात. यासाठी त्या फक्त पोस्टल चार्जेस घेत असतात, तसेच परतावा म्हणून संबंधित व्यक्ती कडून दुप्पट बिया घेतात. अशा प्रकारे मोफत मिळणाऱ्या बियांच्या बदल्यात लोकांनी पाठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा संग्रह त्यांच्याकडे जमा झाला. अशा प्रकारे सीड बँकेत बियांचे जतन व संवर्धन होत राहाते.[][]

संदर्भ

  1. ^ a b c "बीजकन्या". दैनिक सामना. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ a b c "बीजकन्या श्रुती ओझाने जपलाय अनोखा ठेवा". 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "बीडच्या श्रुतीच्या सीड बँकेचे 40 हजार ट्री फ्रेंड ..." दैनिक लोकमत. 2022-03-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "'छंद माझा वेगळा'". zunjarneta.com. 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "'छंद माझा वेगळा' पान २". zunjarneta.com. 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "This Maharashtra girl preserved over 250 varieties of rare seeds". etvbharat.com (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंक". ऍग्रोवन. 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "चिखलठाणच्या शिक्षकाची सिडबॅंक देशविदेशात फेमस्". दैनिक सकाळ. 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "बीडच्या तरुणीने छंदातून उभारली अनोखी बीजबँक; फेसबुकवरून दीड हजार जणांना दिल्या घरपोच बिया". Divya Marathi. 2022-03-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

SVS बीज बँक - फेसबुक