Jump to content

श्रीवर्धन

श्रीवर्धन
जिल्हारायगड
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या१५,१८७
(२००१)
दूरध्वनी संकेतांक०२१२७
टपाल संकेतांक४०२११०
वाहन संकेतांकMH ०६


श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोंकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[]

इतिहास

श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापाराचे ठिकाण होते. तसेच ते कोकणातील महत्त्वाचे बंदर होते. सोळाव्या-सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर हे विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्दीकडे होते.

बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. ते श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे ते मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवा होते.

या परिसरात आढळून येणाऱ्या विष्णूमूर्तींमुळे हा परिसर शिलाहार राजवटीच्या आधिपत्याखाली असावा असे वाटते. कारण विष्णूच्या अशा केशव स्वरूपातील मूर्ती शिलाहार राजवटी जेथे होत्या, तेथे दिसून येतात. त्यांच्यावर थोडी दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. सोळाव्या शतकात श्रीवर्धन निजामाच्या ताब्यात होते. नंतर ते विजापूरच्या आदिलशहाकडे होते. त्यानंतर हे नगर जंजिऱ्याच्या सिद्दीकडे होते.

श्रीवर्धनचा तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो.सूर्यास्त बघण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे.दांडा येथुन हरिहरेश्वरला होडिने जाणे एक सुखद अनुभव आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर प्रसिद्ध आहे.सोमजाई मंदिराजवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मठिकाण आहे.

जीवना बंदराच्या बाजूला जीवनेश्वर मंदिर असून, येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीव काम खूपच सुंदर आहे. कोळीवाड्यातील राम मंदिर हेही श्रीवर्धनचे आकर्षण आहे. विविध प्रकारच्या विष्णूमूर्ती हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. अशीच आणखी एक विष्णूमूर्ती बोर्लीपंचतन गावाकडे जाताना देवखोल येथे आहे. येथे कुसुमेश्वर मंदिर आहे. येथील मूर्ती भग्नावस्थेत असूनही, तिचे सौंदर्य पाहिले, की मूळ मूर्ती किती सुंदर असेल, असे वाटते. कुसुमेश्वराचा हरिहरेश्वर पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर पुरातन असावे याची खात्री पटते.

वैशिष्ट्ये

श्रीवर्धनची रोठा सुपारी खुप प्रसिद्ध आहे.संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ पोफळिच्या बागा हे श्रीवर्धनचे वैशिष्ट्य होय.सुरक्षित व लांब समुद्रकिनारा,सुरूची बने,निरव शांतता यामुळे आते प्रसन्न वाटते. शहरातील बाजारपेठ मोठी असुन, मुख्यत: मासळी व नारळ,फणस,काजु यांसाठी प्रसिद्ध आहे.

धार्मिक स्थळे

सोमजाई माता मंदिर:

हे प्रसिद्ध मंदिर म्हणजे श्रीवर्धनचे मुख्य मंदिर असुन श्रीवर्धनची ग्रामदेवता देवी सोमजाई हिचे मंदिर होय. मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व तांबडी या टेकडिच्या पायथ्याशी वसलेले आहे.मुळ मंदिर प्राचीन असुन अगस्ती मुनीनी याची स्थापना केल्याची आख्यायिका आहे.सध्याचे मंदिर हे साधारण २५० वर्षांपुर्वी पेशव्यानी या मंदिराचा जिर्णोद्धार करून बांधले आहे.येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या असुन देवीची सुंदर मुर्ती ही प्राचीन कलाकुसरेचे उत्तम उदाहरण आहे.देवीचे मुख्य मंदिर,मोठी ओसरी व मंदिरा बाहेरचे पटांगण असा विस्तार आहे.श्रीवर्धन मधील सर्व मुख्य सण,रथसप्तमीची रथयात्रा,दहिहंडी, नवरात्र,होळी हे या मंदिर परिसरात उत्साहाने साजरे केले जातात.इथले वैशिष्ट्य असे कि मोरपिसांच्या गुच्छाने भाविकांना देवीच्या अंगारा भाविकांच्या अंगावर लावला जातो,त्यामुळे वाईट शक्ती निघुन जातात अशी श्रद्धा आहे.बाजुलाच असलेल्या तांबडी टेकडी वरून संपूर्ण शहराचे नयनरम्य दृश्य दिसते.

श्री. लक्ष्मीनारायण मंदिर :

श्रीवर्धनमधील श्री लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णूमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी. दगडाच्या झिलईमुळे ती चकचकीत दिसते. अतिशय रेखीव प्रमाणबद्ध असलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णूवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूंस उभे आहेत. प्रभावळीवर कीर्तिमुखाच्या दोन्ही बाजूंस दशावतार कोरलेले आहेत. विष्णूमूर्तीच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्म, चक्र, गदा, शंख) ही मूर्ती श्रीधराची ठरते. परंतु सोबत लक्ष्मी असल्यामुळे कदाचित लक्ष्मीनारायण संबोधले जात असावे. गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम, मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम, आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराकडून दुसऱ्या चौकोनी वाश्यावर एक काष्ठलेख नजरेस पडतो. देवनागरी लिपीतील हा मजकूर आपल्याला सहज वाचता येतो. यावरून २९ मार्च १७७५ या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे समजते. मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर आजही पेशवे घराण्यातील रोजच्या प्रार्थनेत म्हटला जाणारा श्र्लोक आहे. मंदिराच्यासमोरच छोट्या घुमटीत गरुडमूर्ती आहे तर शेजारी मारुती मंदिर आहे.

कसे जाल श्रीवर्धन परिसरात?

हरिहरेश्वर ते पुणे १७५ किलोमीटर (ताम्हिणी घाटातून). हरिहरेश्वर ते मुंबई हे अंतर २०० किलोमीटर आहे. पुणे व मुंबई येथे विमानतळ आहेत. जवळचे रेल्वे स्थानक माणगाव. माणगाव व महाड ही दोन्ही ठिकाणे मुंबई-गोवा महामार्गावर आहेत. हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. सागरकिनाऱ्यावर बहुतेक ठिकाणी हॉटेल्स, रिसॉर्ट्‌स आहेत. अतिपावसाचा जुलै महिना सोडला, तर वर्षभर केव्हाही जावे.

दिवेआगर समुद्रकिनारा
कोंडिवली समुद्रकिनारा
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,०४ एप्रिल २०२२