Jump to content

श्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)

श्रीरामवरदायिनी ही सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील मौजे पारसोंड या गावाची ग्रामदेवता आहे.[]

श्रीरामवरदायिनी देवी,पारसोंड
श्रीरामवरदायिनी देवी मंदिर,पारसोंड

स्थलविषयक

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. गाव प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. महाबळेश्वर - पार या रस्त्याने ते महबळेश्वरपासून २० मैलावर येते. छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळा पूर्वी पासून आहे. चंद्रराव मोरे घराण्याने पहिले मंदिर बांधले.

पार्वतीपूर (पार) ही एक बाजारपेठ होती. सातारा – वार्इ - मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील महाड, पोलदपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येऊन मोठा बाजार भरवीत असत. या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व त्यांसाठी वेगवेगळी मुलकी व पोलीस पाटलांची व्यवस्था केली.

श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील एक जागॄत शक्तीपीठ आहे. ही महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची कुलदेवता आहे..

वर्णन

मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत. डाव्या बाजूस असलेली अडीच फूट उंचीची मूर्ती “श्री वरदायिनी” या नावाने आणिउजव्या बाजूची तीन फूट उंचीची मूर्ती “श्रीरामवरदायिनी” या नावाने ओळखली जाते.

श्री रामवरदायिनी माहात्म्य

प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. अर्थात रामवरदायिनीची स्थापना प्रभु रामचंद्रांनी केली अशी श्रीरामवरदायिनीची आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणातील अरण्यकांड या भागात आणि पुढे श्रीधरस्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केली आहे.

श्री वरदायिनी माहात्म्य

सध्याच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली असली तरी त्यापूर्वीच्या पुरातन काळामध्ये खुद्द ब्रम्हा‚ विष्णू आणि महेश यांनी या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशी आख्यायिका सांगितली जाते.

देवालय परिसर

श्रीरामवरदायिनी आईचे देऊळ हेमाडंपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभीकरण केले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत नटलेले हे गाव असून, निसर्गाने अतिशय उदार अंतःकरणाने अनोखे असे सॄष्टिसौंदर्य ह्या पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी कोयना नदी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या नदीवर बांधलेला प्राचीन पूल हे या गावाच्या सौंदर्याचे आणखी एक आभूषण आहे.

श्रीरामवरदायिनी देवी मंदिर कमान ,पारसोंड

जत्रा आणि उत्सव

ह्या देवीची जत्रा वर्षातून दोन वेळा भरते. वार्षिक यात्रोत्सव चैत्र वैद्य त्रयोदशी पासून सुरू होऊन तो वैशाख शुद्ध षष्ठी पर्यंत चालू असतो. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र अमावस्येला आसपासच्या गावांमधून त्या त्या गावचे ग्रामदैवत गुढीच्या काठीच्या रूपात घेऊन येतात. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. यात्रेचा शेवटचा दिवस असतो याला छबिना म्हणतात. या दिवशी मंदिरात लघुरूद्रभिषेक, होमहावन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व पहाटे पाच वाजता देवीची मूर्ती पालखीत ठेवून पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. तर नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात केला जातो.

श्रीरामवरदायिनी देवीचे बगाड, पारसोंड

देवीची इतर स्थाने

श्रीरामवरदायिनी या देवीचे मूळ स्थान हे मौजे पारसोंड, महाबळेश्वर तालुका, जिल्हा सातारा येथे आहे. या देवीची इतर स्थाने खालीलप्रमाणे:

  • जय रघुवीर रामवरदायिनी देवी, शिरगाव, तालुका खेड, जिल्हा रत्‍नागिरी
  • श्री रामवरदायिनी, (दसपटी) दादर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्‍नागिरी
  • श्री वर्धनीदेवी, वर्धन गड, तालुका खटाव, जिल्हा सातारा,
  • कालगांव (चिंचणी), तालुका कऱ्हाड, जिल्हा सातारा
  • रामवरदायिनी, खर्शी, तालुका जावळी, जिल्हा सातारा
  • वर्धनीदेवी, चिंचणी, तालुका जावळी जिल्हा सातारा
  • भवनी माता, प्रतापगड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा
  • वरदायिनी (कोळदुर्ग किल्ला - मेट) पारघाट, तालुका महाबळेश्वर. जिल्हा सातारा
  • कापडे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड

संदर्भ

या देवीच्या अधिक महितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट दया http://shreeramvardayinee.com Archived 2016-08-08 at the Wayback Machine.