श्रीकृष्ण बेडेकर
श्रीकृष्ण बेडेकर (६ डिसेंबर, १९४४ - ) हे एक मराठी कवी आहेत. त्यांनी कालनिर्णय, किस्त्रीम, दीपावली, मौज, हंस यांसारख्या दिवाळी अंकांमधून लेखन केले. याशिवाय ते स्वतःच आध्यान, पत्र सारांश, शब्ददर्वळ या दिवाळी अंकाचे संपादक आहेत.
बेडेकर मूळचे मुंबईचे असून ते शिक्षणानिमित्त मध्य प्रदेशात गेले आणि इंदूरला स्थायिक झाले. बेडेकरांनी फारच अल्प काळ नोकऱ्या केल्या. शेवटी ॲलर्ट ॲडव्हरर्टायझिंग नावाची जाहिरात संस्था काढून त्यांनी तेथे काम केले.
बेडेकरांनी काव्यलेखन, गद्यलेखन, गायन, चित्रकला, पत्रकारिता, रांगोळी, संपादनात काम केलेले आहे.
सन १९९४मध्ये त्यांनी जान्हवी प्रकाशनची स्थापना केली, आणि पहिलेच पुस्तक म्हणून डाॅ. प्रभा अत्रे यांच्या २०० बंदिशींचा संग्रह, 'स्वरांगिनी' प्रकाशित केला. या संदर्भग्रंथाच्या निमित्ताने झालेल्या पत्रव्यवहारासाठी, अभिप्रायांसाठी बेडेकरांनी १९९८ सालच्या एप्रिलमध्ये 'पत्र सारांश' नियतकालिकाचा 'स्वरसाधना' विशेषांक काढला.
बेडेकर हे अंदाजे सन १९६५पासून किमान ५५वर्षे कवितालेखन करीत आहेत, पण या दीर्घ कालावधीत त्यांचे दोनच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आत्मनाद हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. पहिला 'अंतर्याम'.
आत्मनाद (कवितासंग्रह)
- या संग्रहात श्रीकृष्ण बेडेकर यांनी लिहिलेल्या ५० गझला, ३७ भावगीते, सात लावण्या, सहा अभंग आणि दोन त्यांच्याच हस्ताक्षरातील मुक्त छंदातील कविता आहेत. मंगेश पाडगांवकर आणि शिरीष पै यांनी 'आत्मनाद'ला दीर्घ प्रस्तावना लिहिल्या आहेत. 'आत्मनाद'मधल्या स्वतः बेडेकर यांनी लिहिलेल्या 'मनोगता'तून आणि भालचंद्र गुजर यांच्या सोबतच्या संवादामधून कवी बेडेकर यांचा मिश्किल स्वभाव, आनंदी वृत्ती, शब्दसंपदा आणि प्रगल्भ जाणिवा दिसतात. समकालीन प्रतिभावंत कवी अनिल, इंदिरा संत, कुसुमाग्रज, गजानन वाटवे, गो.नी. दांडेकर, दत्ता डावजेकर, दुर्गा भागवत, ना.धों. महानोर, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, विठ्ठल वाघ, शिरीष पै यांच्याबरोबरचे संवाद, काव्यचर्चा यांविषयी बेडेकरांनी आपल्या मनोगतात प्रांजळपणे लिहिले आहे.
श्रीकृष्ण बेडेकर यांच्या अनेक गेय कविता अनुराधा पौडवाल, अरुण दाते, राणी वर्मा आदी गायकांनी गाऊन रसिकप्रिय केल्या आहे. या कवितांसाठी बेडेकरांना अनिल-अरुण, दत्ता डावजेकर यांसारखे संगीत दिग्दर्शक लाभले आहेत.