Jump to content

श्री शिवाजी सार्वजनिक वाचन मंदिर कापूसतळणी

श्री शिवाजी सार्वजनिक वाचन मंदिराची ओळख करून घेण्यापूर्वी ज्या शहरवजा खेड्यात ही संस्था आहे, त्या कसबा कापूसतळणीचा थोडा परिचय पाहू. कापुसतळणी हे गाव महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुर्जी या तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावर आहे.

इतिहास[]

[] विधायक कार्याचा वारसा लाभलेल्या या गावात १९ व्या शतकाच्या ४२ व्या दशकात कै. अमृतराव कुल्हे यांनी १९३५ साली कार्यकर्त्यांची एक फळी उभारली त्यात कै. नाना उर्फ देविदासराव चोरे, कै. रा.ना. मानकर, कै. समसुद्दीन उर्फ बाबाभाई, कै. शं. की.भयने व 50 ते ६० कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यात जसे तरून होते, तसेच बाल व वृद्ध ही होते. त्यांच सळसळत रक्त धडाडीच नेतृत्व, अचाट धैर्यशक्ती व प्रगाढ जिद्दीने श्री शिवाजी सार्वजनिक वाचन मंदिर या संस्थेची स्थापना दि. ५ मे १९३५ या शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर झाली.

पुढे यांमधील सर्व कार्यकर्ते स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले व त्यामधील काही भारत छोडो आंदोलनात तुरुंगातही गेले. तेव्हा ही संस्था रा. ना. मानकर , भाई विठ्ठल मोरे, रामराव राणे, आदी कार्यकर्त्यांनी सांभाळली. संस्था स्थापन झाली पण उत्पन्नाचे साधन नाही म्हणून काही हौशी तरुणांनी नाटके बसवून, गावातील लग्न प्रसंगातील व्यवस्थापन व पंगत वाढण्याची कामे अंगिकारली आणि यजमानांकडून वाचनालयाला काही मदत म्हणून फंड गोळा केला.तर काहींनी महिन्याला एक आणा वर्गणी आदी रूपाने वाचनालयाला सहकार्य केले.

ई.स.१९४४ साली स्वातंत्र्य लढ्यातील मंडळी तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा संघटनेची बांधणी व विधायक कार्यांना गती देण्यात आली समाजकार्याकडे ही मंडळी अशी काही आकर्षित झाली होती की , त्यांनी हरिजनांना मंदिरप्रवेश व्हावा म्हणून येथील रुक्मिणी-पांडुरंग मंदिरावर १९४६ साली रा. ना. मानकर, तसेच 50 ते साठ कार्यकर्त्यांनी ७२ तासांचे उपोषण केले. एवढेच नव्हे तर गावात स्वच्छता राखण्याकरिता दर रविवारी ग्रामसफाई कार्यक्रम सुरू केले.

वाचनालयाच्या इमारतीची पायाभरणी

अश्या ध्येयवेड्या कार्यातून वाचनालयाच्या इमारतीची कल्पना उभी राहिली पण कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. असे असतांनाच उत्पन्नाची एक सुवर्णसंधी चालून आली . ई.स. १९५५ साली विदर्भातील बहुसंख्य लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, व त्यांनी मेलेल्या गुरांची चामडी सोलणे या वंशपरंपरेने चालत आलेल्या व्यवसायावर तुळशीपत्र ठेवले. त्यामुळे सर्व समाजात एक चिंतेची बाब निर्माण झाली. याचा नेमका फायदा समाजापेक्षा सेवाभावाला व समाजकार्याला अधिक महत्त्व देणाऱ्या या मंडळींनी घेतला . त्याकाळातील बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला मान्य नसतांनासुद्धा या मंडळींनी मेलेल्या गुरांची चामडी सोलण्याचा व्यवसाय तब्बल ८ ते १० वर्षांपर्यंत करून त्यातून बरीच रक्कम उभारली. त्यामुळेच इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला. ज्या मृत पशूंमुळे हे सर्व शक्य झाले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी वाचनालयामध्ये "मृत पशूंच्या अमर स्मृतीस" हा वाचनालयाचा इतिहास विचारायला प्रवृत्त करणारा शिलालेख लिहिला.

आर्थिक सहाय्य

अमरावती निवासी व त्यावेळच्या मध्यप्रदेशचे एक मंत्री मा.ना. श्री. पी.के. देशमुख आणि दर्यापूर जनपद सभेचे अध्यक्ष स्व.बाबासाहेब सांगळूदकर[] यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आर्थिक सहाय्य केले .

संस्थेचे पंजीकरण

संस्था पंजीकृत करण्याकरीता प्रयत्न करीत असतांना काही तांत्रिक बाबी अडल्या आणि त्यांचे पूर्ततेसाठी एक समिती गठीत केली गेली. या समितीमध्ये डॉ.वि.द.करंदीकर, वि.पु.उर्फ राजाभाऊ पाठक ,नानासाहेब चोरे ,शंकरराव भयने गुरुजी ,केशवराव सी. काळे या समितीने आपले कौशल्य पणाला लाऊन घटना तयार केली व दि. ३० नोव्हे. १९६२ रोजी संस्था पंजीकृत केली.

श्री शिवाजी सार्वजनिक वाचन मंदिर कापूसतळणी

महाराष्ट्र शासन ग्रंथालय कायदा १९६८[]

१९६८ साली महाराष्ट्र शासनाने ग्रंथालय कायदा केला. त्यानिमित्ताने अमरावती जिल्ह्याचे ग्रंथालय उपसंचालक यांनी शासकीय तपासणीद्वारे नियमांची पूर्तता करून घेऊन या संस्थेला "क वर्ग " वाचनालयाचा दर्जा देऊन अनुदान मंजूर केले. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये नियम १९७० च्या कलम ३८ अन्वये मा.ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, २३ यांनी उपरोक्त संदर्भाकीत प्रशासकीय आदेशान्वये ग्रंथालयाचे १ एप्रिल २००० पासून पुनःवर्गीकरण करून ग्रंथालयाचा क वर्ग बदलवून इतर ब हा सुधारित पुढचा वर्ग दिला आहे.

वाचनालयाला मिळालेले पुरस्कार

१.महाराष्ट्र शासन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विशेष पुरस्कार १९९८-९९ (मुंबई दि.१४ एप्रिल १९९९)

  1. ^ a b "Shri Shiwaji Sarwjanik Wachan Mandir". www.facebook.com. 2018-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ गावंडे, डॉ ज्योती. अष्टपैलू नेतृत्वाचा साक्षात्कार. Lulu.com. ISBN 9781329158528.
  3. ^ https://htedu.maharashtra.gov.in/divisions/directorate-of-libraries/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/. Missing or empty |title= (सहाय्य)[permanent dead link]