Jump to content

श्री भगवान महाराज

श्री सद्गुरू दरबार व आश्रमांची स्थापना जवळजवळ 75 वर्षांपूर्वी आपल्या श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांनी मुंबई येथे केली. मूळ कोकणातील कुडाळ तालुक्यातील वालावल क्षेत्री श्री सद्गुरू माऊली भगवान महाराज यांचा जन्म झाला.  श्री सद्गुरू माऊलींचे पूर्ण नाव श्री भगवान नारायण (चौधरी) पोखरे होते. प्रारंभीचा त्यांचा काळ हा गावीच व्यतीत झाला. ब्रिटिश साम्राज्याचा तो काळ होता. सुरुवातीची अशीच काही वर्षे गावी गेल्यानंतर, माऊलींनी मुंबईस प्रयाण केले. श्रीसद्गुरू माऊलीना कोणीही सख्खी भावंडे नव्हती. शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाल्यानंतर माऊलीने समाजसेवा करण्याचं व्रत अंगिकारले आणि त्याचबरोबर नोकरीही पत्करली. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाहही झाला. मालाड येथील मिलिटरी ऑर्डनन्स डेपो येथे त्यांनी काही काळ नोकरीच्या निमित्ताने घालविला. नोकरी करता करता समाज सेवाही चालूच होती. माऊलींचा आध्यात्मिकतेकडे ओढा होता. अडलेल्या नडलेल्या गरजवंतांना माऊली नेहमीच आपला मदतीचा हात पुढे करीत असत व त्यांना तेथून बाहेर पडण्यास मदतही करीत होत्या. मग ती मदत आर्थिक असो, मानसिक असो वा शारीरिक असो. हे जरी खरे असले, तरी माऊलींचे मन काही नोकरीत रमेना. सदानकदा समाज सेवेचा ध्यास घेतलेला ! सोबतच आध्यात्मिकतेचा प्रचार आणि प्रसार आपल्या कर्तुत्वाने करून माऊलीने हे आध्यात्मिकतेचे धडे समाजात, विशेषतः तळागाळांतील समाजात सर्वदूर पोहोचतील याची नेहमीच काळजी घेतली. अशीच काही वर्षे नोकरीत घालविल्यानंतर, खऱ्या अर्थाने माऊलीने आपल्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रबोधन आणि प्रसारण  सुरू केले तेच मुळी आपल्या कामावरील एका कामगार बंधूंच्या घरचे कर्तव्य करून. साधारण हा काल 1945 ते 1950 दरम्यानचा होता. पुढे माऊलीना अनुग्रहही झाला. त्याची कथा ही वेगळीच आहे. अशीच माऊली काही घरकुल स्थितीतील कर्तव्यासाठी घराबाहेर पडली असताना, त्यांना रस्त्यात एक कमंडलु धारी गृहस्थ भेटले. बोलणे झाले. कुठून आले म्हणून माऊलींनी विचारणा केली असता, त्यांनी जे उत्तर दिले ते मार्मिक होते. ते म्हणाले, "नागपूर से आया हु, कानपूर जाना है !" आणि त्यांनी आपल्या माऊलींच्या गालाला स्पर्श केला. हाच तो माऊलींचा रस्त्यातच झालेला अनुग्रह. असेच कार्य पुढे पुढे जात होते. काही नवीन नवीन मंडळी माऊलींच्या सानिध्यात येत होती. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कार्य माऊली करीत होती. त्याचबरोबर आध्यात्मिकतेचे धडेही संपर्कात येणा-या सर्वस्व भाविकांना माऊली देत होती. अशाप्रकारे काही कालावधी गेल्यानंतर साधारण सन 1950च्या दरम्यान त्यांचा संबंध श्री पांडुरंग वाघ यांच्याशी आला. हे श्री पांडुरंग वाघ चिंचपोकळी येथील बावलावाडी मधील एका चाळीत राहत होते. मिल मध्ये कामाला होते. त्यांच्या येथे त्यांच्या घरकुल स्थितीत काहीवेळा कर्तव्यामुळे माऊलींचे जाणे येणे होत होते. ते एकटेच घरी असायचे, त्यामुळे त्यांनी माऊलीना येथे बसण्याची व आध्यात्मिक प्रबोधन करण्याची विनंती केली होती व माऊलींनी ती मान्य देखील केली होती. त्याप्रमाणे माऊलींचे समाजसेवा व आध्यात्मिक प्रबोधनाचे हे कर्तव्य हळूहळू पुढे पुढे जात होते. असाच काही काळ गेल्यानंतर, श्री पांडुरंग वाघाना एके दिवशी, त्यांच्या घरकुल स्थितीत झोपलेले असताना प्रणव ऐकावयास मिळाले, "नीचे की संपत्ती क्या देख रहे हो, उपर की संपत्ती देख !" त्या शब्दांनी प्रेरित होऊन, श्रीयुत वाघानी आपली घरकुल स्थिती, आपल्या माऊलीना आध्यात्मिक कार्यासाठी अर्पित केली आणि आपल्या श्री सद्गुरू दरबारचा रितसर प्रारंभ झाला व येथूनच पुढे दरबारची व आपल्या माऊलींची सर्वस्व कर्तव्यें होऊ लागली. येथेच मग कायमस्वरूपी दरबार भरू लागला व आपल्या माऊलींची इथे तिथे फिरण्याची दग दग संपली. येथेच दरबार स्थिर झाला. हा काळ साधारण 1950 ते 1955च्या आसपासचा होता. या स्थानाला नंतर मुख्य दरबार म्हणून नाव मिळाले. येथूनच बरीचशी कर्तव्ये पार पडली व आज देखील पडत आहेत. प्रथमत: या दरबारात सर्व कर्तव्यें होत होती. त्यामध्ये आध्यात्मिक प्रवचने तसेच मायावी मानवी व सूक्ष्म तऱ्हेच्या कर्तव्यांचा सुद्धा सहभाग होता. नंतर काही कालावधी गेल्यानंतर मायावी कर्तव्ये ही फेरबंदरच्या मायावी दरबारात होऊ लागली व चिंचपोकळी येथील मुख्य दरबारात फक्त वेगवेगळ्या तत्त्वांची एकचित्तता, तसेच बाबांची ज्ञानयुक्त प्रवचने व वार्षिक धार्मिक कार्यक्रम होऊ लागलेत. ख-या अर्थाने लालबागचा मुख्य दरबार हा माऊलींच्या ज्ञानदानाचा दरबार झाला. हा ज्ञानदान यज्ञ जो 1945/50च्या दरम्यान आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी प्रज्वलित केला तो आजतागायत सातत्याने अखंडीतपणे तेवत आहे आणि त्यांच्या या सव्विसाव्या अवतारकार्यानंतर देखील तो ज्ञानदान यज्ञ अखंडीत व अविरतपणे चालू आहे. (या सगळ्या सव्वीस अवतार कार्यात त्यांच्या सोबत असणारे  पितामह गुरुदेव वशिष्ठ आपल्या मार्गदर्शनाने, माऊलींच्याच आदेशानुसार आपल्या संदेशांद्वारे, आपल्या प्रवचनांद्वारे अजूनही तेवत ठेवीत आहेत.) दरम्यानच्या काळात माऊलींनी सातारा येथील मुक्काम क्षेत्र इंगळेवाडी येथेही आपल्या श्री सद्गुरू आश्रमाची स्थापना तर केलीच, शिवाय आपल्या जन्मगांवी मुक्काम: वालावल, ता.: कुडाळ, जिल्हा: सिंधुदुर्ग येथील वडीलोपार्जित घराचे त्यांनी आपल्या हयातीत रूपांतर श्री सद्गुरू दरबारात केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या महानिर्वाणानंतर आपली ही गृहस्थितीची वास्तू जन्मगांव : वालावल व कर्तव्य स्थान : मालाड, लालबाग, काॅटनग्रीन तसेच इंगळेवाडी, सातारा येथील स्थावर मिळकत सद्याच्या त्यांच्याच नावांच्या विश्वस्त संस्थेला दान करून समाजामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले. अशाप्रकारे मानवी स्थितीत खऱ्या अर्थाने माऊलींच्या कार्याचा शुभारंभ झाला आणि त्यांचे हे आध्यात्मिक कार्य मानवी स्थितीत, त्यांचेच सेवेकरी, सेवेकरीणी, योगी-योगीनी अव्याहतपणे त्यांच्या आणि पितामह गुरुदेव वशिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व आदेशानुसार पुढे पुढे नेत आहेत. ! ॐ तत् सत् !