Jump to content

शेडा

शेडा, पवना किंवा शारा (हिंदी: पवना, सेद्वा, शेडा; कन्नड: चिक्कसळ्ळी हुळ्ळू; लॅटिन: सेहिमा नर्व्होसम, से. सल्केटम) गॅमिनी कुलातील गवत आहे. हे गवत पवना भारतात सर्वत्र आढळते. ते सर्व प्रकारच्या जमिनींत वाढते. ते झुपकेदार बहुवर्षायू असून त्याचे जमिनीखालील खोड आखूड, बळकट व सरपटत वाढणारे असते. पाने साधी, उभी, रेखीय, निळसर असून त्यांची टोके तंतूसारखी असतात. फुलोरे एकाकी व चपट्या मंजरी प्रकारचे उभे, फिकट हिरवे किंवा जांभळट असतात. पवना हे गवत उत्तम प्रकारचा चारा असून फुले झडून गेल्यावरही जनावरे ते खातात. ते रूचकर व पौष्टिक आहे. त्यामुळे ते जनावरांना चांगले मानवते. वाळवून व मुरघास बनवूनही त्याचा उपयोग होतो. तसेच झोपड्यांची छपरे शाकारण्यासाठीही ते वापरतात. कागदाचा लगदा करण्यासाठी रोशा गवताबरोबर त्याचा वापर होतो.

शेडा गवताची खास लागवडही करतात. ५०-७५ सेंमी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात ते फक्त पावसाच्या पाण्यावरही येते. नव्या ठिकाणी ते लवकरमूळ धरत नाही, परंतु एकदा मूळ धरल्यास त्याची कापणी केल्यासही चालते. 

जमीन नांगरून व्यवस्थित तयार करतात व हेक्टरी ११-१३ किग्रॅ. बी फोकून पेरतात. सामान्यपणे याला कोणतेही खत देत नाहीत; परंतु नायट्रोजनयुक्त खते दिल्यास चांगली वाढ होते. पहिली कापणी साडेतीन महिन्यांनी करतात. एका वर्षात चार कापण्या केल्यास हेक्टरी ११ हजार ते १६ हजार किग्रॅ. हिरव्या गवताचे उत्पन्न येते. 

से. सल्केटम या जातीचे गवत बारीक, ३०-६० सेंमी. उंच असून त्याचा प्रसार मध्य प्रदेश व दक्षिण भारतात आहे. ह्याला कापणीयोग्य होण्यास तीन महिने लागतात. हे ओले, वाळवून तसेच मुरघास बनवूनही चारा म्हणून वापरता येते. दख्खनमध्ये गवताळ राने पेरण्यासाठी त्याचे बी वापरतात. चांगल्या परिस्थितीत ह्याचे हेक्टरी सु. ९,००० किग्रॅ. उत्पन्न येते. 

से. नोटॅटम या जातीचे गवतही उत्तम चारा म्हणून वापरात आहे. ते प. हिमालयात चंबा ते कुमाऊँमध्ये १,२००-२,१०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात आढळते