शेख महंमद
- पार्श्वभूमी
तो काळ इस्लामी राजवटीचा. दिल्लीचा मुघलबादशाहा, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज तसेच देशात इतरत्र छोटी मोठी राज्य अस्तित्वात होती. या सर्व शाह्या सत्तेसाठी, स्वार्थापायी एकमेकांशी लढत होत्या, यात गोर-गरीब जनता भरडली जात होती. दुसऱ्या बाजूने समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता.
देशात बहुतांशी मुस्लिमांची सत्ता होती तर बहुसंख्य जनता हिंदू होती. दोन्ही धर्मात देव -देव, पूजाअर्चा, राहणीमान यात फरक होता. हिंदू मुर्तीपुजक तर मुस्लिम निर्गुण निराकार अल्लास भजणारे, हिंदू धर्मात जातीवर्ण व्यवस्था प्रबळ होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णव्यवस्थेची मुळे घट्ट रोवलेली होती. प्रत्येक जातीचे देव व परंपरा वेगळ्या होत्या. श्रेष्ठ, कनिष्ठ यावर जातीवाद होत होता. समाज बुरसट विचाराने रसातळाला गेला होता. समाज दिशाहीन झाला होता. अशावेळी एका समाधसुधारकाची, समानतेची वागणुक देणाऱ्या महात्म्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली संत शेख महंमद महाराजांच्या रूपाने.
- जन्म
राजमहंमद पिता व फुलाई मातेच्या पोटी शेख महंमदांचा वाहिरा (ता.आष्टी,जि.बीड) या त्यांच्या मुळ गावी जन्म झाला. त्यावेळी राज महंमद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाचे पदरी नोकरीस होते. स्वामी जयराम आपल्या अभंगात संत शेख हंमदांच्या माता पित्यांवीषयी म्हणतात, “ राजे महंमद पिता, फुलाई माता। त्यांचे पोटी संता अवतार॥” राज महंमद आणि फुलाई मातेच्या पोटी अवतारी संत शेख महंमद जन्माला आल्याचे सुचक त्यांनी या ठिकाणी केले आहे. किंवा शेख महंमद स्वतः योगसंग्राममध्ये लिहीतात याती गोरे राज महंमद पिता। सगुण पतिव्रता फुलाई माता। प्रसवली अविनाश भक्ता। शेख महंमदालागी ॥
शेख महंमदांवर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. घरात गुरुपरंपरा व धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांना चांगले शिक्षण मिळाले. वडील राजमंहमद किल्लेधारुर या ठिकाणी हवालदार असल्याने त्यांना समाजात मान सन्मान होता. शेख महंमदांंनी लहानपणापासून सामाजिक, राजकीय परिस्थिती जवळून पाहिली होती. साहजीकच शेख महंमदांचा वावर किल्ल्यावर असणे स्वभाविक आहे. त्यांची नजर तीक्ष्ण होती. लहानपणापासूनच ते चिकित्सिक वृत्तीचे होते. अफाट व तिक्ष्ण बुद्धिमत्ता असल्याने समाजातील गोरगरीब जनतेचे निरिक्षण ते करीत. समाजातील विषमता, जाती धर्मातील द्वैष, चातुवर्ण्य व्यवस्था व परिस्थितीला बळी पडलेला समाज त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला व वैचारिक क्रांती करण्याचे बिजारोपण बालवयातच झाले. यानंतर ते श्रीगोंदा (चांभारगोंदे) येथे स्थिरावले.
- अनुग्रह व गुरुपरंपरा
शेख महंमद महाराज हे जरी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असले तरी त्यांचा सुफी संप्रदायाशी संबंध असावा असे इतिहासकारांनी नोंदवले आहे. त्यांच्यावर सुफी, वारकरी, दत्त, नाथ या चारही संप्रदायाचा संस्कार स्थल काल परिस्थिती नुसार घडला असावा असे म्हणता येईल. व त्यानुसार त्यांचा व्यासंग व योगसाधनाही बलवत्तर असावी असे म्हणता येईल.
कादरी संप्रदाय जगातील सुफी संप्रदायाच्या चार उपपंथापैकी एक पंथ होय. या शिष्य परंपरेतील भारतात आलेला पहिला कादरी सुफी म्हणून महंमद गौस हा मानला जातो. याचेपासून शेख महंमदाची परंपरा मांडता येते. महंमद गौस - राज महंमद - कादरी चांदसाहेब (चंद्रभट उर्फ चाँद बोधले) कादरी महंमद साहेब म्हणजेच शेख महंमद अशी गुरू परंपरा आहे. चाँदबोधले यांचे दोन शिष्य ते म्हणजे जनार्धन स्वामी व शेख महंमद म्हणजे हे दोघे गुरू बंधु होय. जनार्धन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरुपरंपरा आहे. सुफी पंथ हा ध्यानधारणा, अनुष्ठाण, भजन, पूजन, योगसाधना, इ.वर भर देणारा व अद्वैत मानणारा आहे. एकंदरीत या चारही संप्रदायातील तत्त्वज्ञान व विचार प्रणाली थोड्याफर प्रमाणात सारखीच आहे. त्यात वारकरी संप्रदायाची समतावादी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, सरळमार्गी असणारी भक्ती शेख महंमदांना भावली व ते त्याच ठिकाणी रमले असे म्हणावे लागेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदा भेद भ्रम अमंगळ ॥ किंवा यारे यार ेलहान थोर। याती भलती नारी नर। करावा विचार । नलगे चिंता कवणाशी ॥ म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्व जाती-धर्म, वंश, लिंग आदींना सोबत घेणारा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय होय. त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत केले.
अख्यायीका:-
अनेक अख्यायिका, मौखिक परंपरेतील चमत्कार आजही ऐकावयास मिळतात.
- खाकेबाची कथा
- मोदोबाची कथा
- व्यापारी भक्ताची जहाज तारली
- देहू येथील मंडप विझवला
- गोधडी थरथर कापायला लागली
- बिगार हवेतच तरंगली
- गाय जिवंत केली
- योगसंग्राम कोरडा निघाला
- तेलीणबाईंची कथा
- मुधा पांगुळ प्रसंग
साहित्य
सोळाव्या शतकातील संत परंपरेतील साहित्य क्षेत्रातील सर्वांत श्रीमंत संत कोणते असतील तर संत शेख महंमद महाराज. मुस्लिम समाजात जन्म घऊन सुद्धा तमाम बहुजन समाजाच्या उद्धारासाठी साहित्य लिहून ठेवले मात्र ज्यांच्या साठी लिहून ठेवले त्यांना त्याची किंमत कळाली नाही असेच म्हणवे लागले. त्यांनी 10 ग्रंथ लिहीले पैकी काही प्रकाशीत झाले तर अझुनही काही ग्रंथ अप्रकाशीत आहेत. 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10) ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. यामध्ये योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे. यात 18 अध्याय आहेत. वरील ग्रंथापैकी साठी संवत्सर व ज्ञान गंगा हे ग्रंथ अप्रकाशीत आहेत.
- वाहिरा येथील सनद
वाहिरा येथील- (सनदेचा मजकूर) (मूळ मजकूर उर्दू) त्याचा मराठीत मजकूर असा-
1277 हिजरी रोजी सनद सादर होऊन मौजे वाहिरे व नालकोल रुई 3 चाहुर व 1 चाहुर असे एकूण चार चाहूर जमीन वंशपरंपरेने उपभोग घेऊन आशीर्वादाप्रित्यर्थ बहाल इनाम सनदशीर इस्त्रीईलखान यांनी मशिदीची दिवाबत्ती करून खिदमत करावया करता बहार इनाम दिलेले आहे शेख महंमद यांचे मुलगे ह्यांनी वंशपरंपरेने उपभोग घ्यावा सनदेचा कोणीही हुजूर करू नये असे फर्मावले आहे.
नखळ अल्लाहू परवाना मुहर मुरोद आलमगीर बादशाह अजफरार साह गरह मूहर 1077 मुहर मुताबिक 10 जुळूस वालद मुस्तादयीन महमातहाळ व इस्तकबाळ परगना पांडेपेडगाव मानोर.
मोगल सत्तेला वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज यांना इनाम जमीन द्यावीशी वाटली या घटनेतून महाराजांचे सामर्थ्य स्पष्ट होते. स्वतःला जिंदा पीर म्हणविणारा आलमगीर बादशहा संत शेख महंमद महाराजांना शरण आला.शेख महंमदम हाराजांच्या अध्यात्मज्ञानाचा साक्षात्कार हेच महत्त्वाचे कारण ठरते. निजाम, निजामशाहीतील अनेक अधिकारी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असलेले शूर सेनानी सरदार मालोजीराजे यांनी संत शेख महंमद महाराजांचे गुरुत्व स्वीकारले. शस्त्र, शक्ती आणि महत्त्वकांक्षा यांच्या आधीन असलेल्या व्यक्ती केवळ दिव्यज्ञानापुढेच शरण येत असतात. संत शेख महंमद महाराजांपुढे अवघ्या भरतखंडाला हादरे देणाऱ्या राजकीय व्यक्ती शरण आल्या ही त्यांच्या संतत्त्वाची शक्ती आहे. दिव्यज्ञानच नवसमाज घडवू शकते हे संतांनी जाणले होते. मरगळलेल्या समाजाला तेजस्विता आणि तत्परता या गुणांनी उजळण्याचे कार्य संत शेख महंमद महाराजांनी केले.
मालोजीराजेंचे ‘आशिर्वाद प्रित्यर्थ’ बहाल इनाम...
मालोजीराजे यांचे श्रीगोंदामार्गे जाणे येणे असायचे. वेरूळवरून शिखर शिंगणापूरला जाताना एकदा श्रीगोंदा येथे थांबले. शेख महंमद महाराजांची कीर्ती ते ऐकून होते. शेख महंमद महाराजांच्या भेटीनंतर शेख महंमद हे थोर सिद्धपुरूष आहेत. ते ज्ञानी, योगी, तपस्वी आहेत. साक्षात अवतारी पुरूष आहेत. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद महाराजांचे त्यांनी दर्शन घेतले. मालोजीराजे व बाळाजी कारभारी यांनी शेख महंमद कडून अनुग्रह घेतला. आणि पाच चाहूर जमीन इनाम देऊन आजच्या मठास कोट विहीर बांधून दिली. इनाम पत्र दिले ते असे आहे.
तुम्ही आमचे गुरू आहात व आपण तुमचे शिष्य आहो. म्हणून पाच चाहूर खरेदी जमिनीतून बारा बिघे इमान तुम्हास मुकर्रर दिला असे, यास जर कोणी दावा करील तर त्यास आपण वारू. यामुळे शेख महंमद महाराजांना मालोजीराजे भोसले ह्या वजनदार व मातब्बर मनसबदारांचा आश्रय लाभला होता. पुढे शहाजी राजे हे सुद्धा शेख महंमद महाराजांना गुरू मानत.
मोगल सत्तेने वाहिरा येथे इनाम जमीन दिली व मालोजीराजे यांनी श्रीगोंदा येथे इनाम जमीन दिली. यावरून संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा व वाहिरा येथे जास्त काळ वास्तव्यात होते. त्यांची कर्मभूमी वाहिरा व श्रीगोंदा होती.
शेख महंमदांचा लौकिक प्रपंच
शेख महंमद महाराजांना वारकरी व सुफी संप्रदायाचा वारसा घरातुनच लाभला होता. वडील राज महंमद यांनी आपल्या तोडीस तोड घराण्यातील फातीमाबाई (फातीमाबी) या मुलीशी शेख महंमदाचा विवाह लावून दिला. पुढील काळात फातीमाबाई या महाराजांच्या सर्व कार्यात सक्रीय होत असतील. फतीमाबी आणि शेख महंमद महाराज यांचे पती-पत्नी संबंध, कुटूंब व सांसारिक स्थिती याचे कुठेही स्पष्ट उल्लेख अढळत नाही. त्यांच्या पत्नी फतीमाबी या धार्मिक वृत्तीच्याच असाव्यात कारण जर त्यांना तसा विरोध झाला असता तर त्यांनी लेखणात ऐनकेनप्रकारे व्यक्त केला असता. त्यांना दावलजी, अजमजी, हकीमजी ही तीन मुले झाली. संत शेख महंमद महाराज व फातीमाबी या दांपत्याचे संस्कार मुलांवर झाले. एकूण संपूर्ण घराणेच वारकरी संप्रदयाचा विचार जाणत होते. संत शेख महंमद महाराजांची योगसाधना व विद्वत्वा याचा विचार करता त्यांच्या तिनही मुलांनी दावलजी, अजमजी, हकीमजी यांनी महाराजांना गुरू मानुन दिक्षा घेतली असावी. शेवटच्या टप्प्यामध्ये फतीमाबी यांनीही शेख महंमद महाराजांना सोब समाधी घेण्यासंबंधी गळ घातली असणार म्हणून श्रीगोंदा येथे व वाहिरा येथे सपत्निक समाधी आहे.
संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधी काळ :
संत शेख महंमद महाराजांचा जन्म व समाधीकाळा संदर्भात अभ्यासकांमध्ये एकमत पहायला मिळत नाही. जसे अनेक संतांच्या बाबतीत घडते तसेच महाराजांच्या बाबतीतही घडत आहे. डॉ. भिमा मोदळे यांनी संत कवी शेख महंमद: एक चिकित्सक अभ्यास या पुणे विद्यापीठात सादर केलेल्या टंकलिखीत प्रबंधात संत शेख महंमद महाराजांच्या जन्मशकांविषयीच्या मतभिन्नतेचा साक्षेपाने आढावा घेतला आहे. त्यानुसार
चरित्रकार बा.ना.शिंदे यांच्या मते शके 1548 (इ.स.1626)
महाराष्ट्र सारस्वत पुरवणी लेखक शं.गो. तुळपुळे यांच्या मते शके 1482 (इ.स.1560) जन्मकाल नोंदवला आहे.
तर श्रीगोंद्यातील मठात, फलकावर नोंदवल्या प्रमाणे शके 1548 असा दिलेला आहे.
मालोजीराजे यांनी मठ उभारणीसाठी दिलेल्या चकनाम्याची घटना इ.स.1595 अशी आहे.
जयरामस्वामींच्या समाधीचा (इ.स.5 सप्टेंबर 1672) उल्लेख व त्यानंतर संत शेख महंमद महाराजांची समाधी सुमारे अडीच वर्षांनंतर झाली असे गृहीत धरून महाराजांचे समग्र साहित्य संपादक वा.सी.बेंद्रे महाराजांचा समाधीकाळ इ.स.1672 असा मानतात.
डॉ.गं.ना. मोरजे यांच्या नोंदीप्रमाणे बेंद्रे यांनी इ.स. 1560 ते 1660 असा शेख महंमदांचा काळ मानला आहे.
ही मतभिन्नता लक्षात घेऊन डॉ. भिमा मोदळे यांनी शेख महंमद महाराजांचा कालखंड तारतम्याने इ.स.1575 ते 1674 असा मानावा असे म्हणले आहे. त्यानुसार संत शेख महंमद महाराजांचा जन्मकाळ पंधराव्या शतकाचा उत्तरार्धात अखेरीस झाला आसावा असे मानता येते. नदीचे मूळ आणि ऋषीचेकुळ शोधू नये असे म्हणतात.
ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||
काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा ||
फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे ||
नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन ||
शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||