शेख नूर-उद्-दीन नूरानी
शेख नूर-उद्-दीन नूरानी तथा नुंदर्योश (१३७६ किंवा १३७७:कियामू, काश्मीर, भारत - १४३८) हे काश्मीरी संतकवी होते.
त्यांचे आईवडील श्रद्धाळू, धार्मिक होते. शेख ह्यांची ईश्वरभक्ती आणि साधुत्व बालपणापासूनच त्यांच्या वर्तनातून दिसून येऊ लागले. त्यांनी विवाह केला; पण काही काळ संसारात घालवल्यावर सांसारिक जीवनाचा त्याग केला. त्यानंतर बारा वर्षे एका गुहेत बसून ईश्वरचिंतनात आणि प्रार्थनेत त्यांनी व्यतीत केली. पुढे सय्यद मुहंमद हमदानी ह्यांनी त्यांना कुबाव्ही पंथाची दीक्षा देऊन जगातील वास्तवासमोर खुलेपणाने उभे राहण्याची शिकवण दिली. परिणामतः शेख हे एकांतातून बाहेर पडले. पुढे ‘ रेशी ’ ह्याधार्मिक संप्रदायाची त्यांनी स्थापना केली. ह्या संप्रदायाने काश्मीरी समाजावर प्रभावी संस्कार केले. तसेच करुणा आणि मानवता ह्या मूल्यांनी भारलेल्या सामाजिक वर्तनाची जडणघडण केली. काश्मीरात मानवतावादी मूल्ये नष्ट झाली नाहीत, ह्याचे श्रेय ह्या संप्रदायाला जाते.
‘श्रूख’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काव्यप्रकारातील शेख ह्यांच्या छोट्याछोट्या रचना हे काश्मीरी साहित्याला त्यांनी दिलेले मोठे योगदान होय. ह्या रचनांचा आशय उपदेशपर असून त्यांतून स्वयंशिस्तीची, धर्मपरायणतेची आणि सर्वांवर प्रेम करण्याची शिकवण मोठया तळमळीने दिलेली आहे. त्यांच्या कवितेतील सुभाषिते, म्हणी आणि एकंदर शब्दकळा ह्यांनी काश्मीरी भाषेला संपन्न केले आहे. त्यांच्या कवितेच्या काही उत्तर-कालीन संकलकांनी त्यांच्या काही शिष्यांच्या रचनाही त्यांच्याच नावावर घातल्या आहेत.
शेख यांचे जीवन आणि कार्य ह्यांचे दर्शन घडविणारे अनेक नूरनामे आणि रेशीनामे संकलित करण्यात आले आहेत. पहिला रेशीनामा बाबा नसिबुद्दीन यांनी शेख ह्यांच्या मृत्यूनंतर काश्मीरच्या तत्कालीन सुलतानाच्या आदेशानुसार संकलित केला. काश्मीरच्या सांस्कृतिक अकादमीसाठी एम्. ए. कामील ह्यांनी एक रेशीनामा संकलित केला आहे. शेख ह्यांनी ‘श्रूख’ खेरीज अन्य काही नवे काव्यप्रकारही हाताळले. काश्मीरी साहित्य आणि संस्कृती ह्यांचे क्षेत्र त्यांनी विस्तारले. काश्मीरी लोकांच्या ऐहिक-आध्यात्मिक विचारशैलीचे ते प्रतीक बनले. त्यांच्या दफनविधीच्या प्रसंगी काश्मीरचा तत्कालीन सुलतान स्वतः उपस्थित होता. त्सरारशरीफ येथील त्यांची कबर हे आज सर्व काश्मीरी लोकांचे एक यात्रास्थान झालेले आहे.