Jump to content

शुभांगिनी राजे गायकवाड

शुभांगिनी राजे गायकवाड (माहेरच्या जाधव, जन्म : २४ फेब्रुवारी १९४५) या बडोदा संस्थानच्या राजमाता आहेत. त्यांच्या दिवंगत पतीचे नाव रणजीतसिंह गायकवाड. हे काँग्रेसचे नेता होते व १९८०-१९८९ या कालावधीसाठी बडोद्याहून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते.

शुभांगिनी राजे या लखनौ विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र आणि इंग्रजी साहित्य हे विषय घेऊन बी.ए.ऑनर्स झाल्या आहेत.

शुभांगिनी राजे या ग्वाल्हेरचे महाराजा ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शिनी राजे यांच्या थोरल्या आई आहेत.

शुभांगिनी राजे यांनी इ.स. १९९६ साली अपक्ष म्हणून आणि २००४ साली भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली, पण दोनही वेळा त्यांना अपयश आले. २०१४ सालच्या निवडणुकीसाठी बडोदा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांनी जास्तीचे नामांकन भरले होते, त्यावेळी शुभांगिनी राजे त्यांच्या प्रस्तावक होत्या. याच सुमारास शुभांगिनी राजे यांची आणि मोदी यांची जवळीक वाढली. आपले जावई ज्योतिरादित्य शिंदे यांना २०२० सालच्या मार्चमध्ये काँग्रेसमधून फुटून भारतीय जनता पक्षात जाण्यास शुभांगिनींचा हात होता असे मानले जाते.

शुभांगिनी राजे गायकवाड या त्यांच्या नाजुक प्रकृतीमुळे आपला बहुतेक काळ त्यांच्या बडोद्याच्या राजवाड्यात काढतात. हा 'लक्ष्मी विलास' नावाचा राजवाडा ६०० एकर जमिनीवर विसावला आहे. हा राजवाडा इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्या बकिंगहॅम पॅलेसच्या चारपट मोठा आहे.

शुभांगिनी राजेंची एकूण संपत्ती अंदाजे २० हजार कोटी रुपये इतकी आहे.