शिवनदी
वाशिष्ठी नदी ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गावातून वाहते. शहरातून वाहणारी शिवनदी वाशिष्ठीला जाऊन मिळते व वाशिष्ठीचे पुढे दाभोळ खाडीत रूपांतर होते.
शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात असलेल्या डोंगरातून होतो. ही नदी चिपळूण शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. शिवनदीची चिपळूण शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत.
शिवनदी ही चिपळूण शहराची एकेकाळची जीवनवाहिनी होती. फार वर्षांपूर्वी या नदीपात्रातून थेट चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत लहान होड्यांचा प्रवास चालत असे. ऐतिहासिक काळात मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून वाशिष्ठी नदीमधून बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत असत. त्यातील माल हा पुढे लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून थेट पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येई, असे जुने जाणकार सांगतात.
शिवनदीमध्ये पावसाळ्यानंतर निर्माण झालेल्या डबक्यांमध्ये मगरींनी अधिवास निर्माण केला आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे या मगरी पुराच्या पाण्याबरोबर शहरात पसरतात व पुढे अनेक दिवस नाल्यात, गटारात आढळून येतात. येथील निसर्गप्रेमी लोक त्यांना पकडून नदीत सोडून देतात.
चिपळूण शहरातील भोगाळे, खाटीकगल्ली व अन्य ठिकाणच्या शिवनदीच्या डोहांमध्येही मगरींचा मुक्त संचार आहे. शहरातील रामतीर्थ तलावामध्ये मगरी आहेत; याशिवाय कामथे धरणातही त्यांचा संचार आहे.
असे असले तरी या शिवनदीचे अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांनी संपत चालले आहे.