शिल्पकार (तारकासमूह)
शिल्पकार (इंग्रजी: Sculptor; स्कल्प्टर) खगोलाच्या दक्षिण गोलार्धातील एक छोटा तारकासमूह आहे. १८व्या शतकातील निकोलस लुई द लाकाई या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याची व्याख्या केली होती.[१]
गुणधर्म
शिल्पकार एक छोटा तारकासमूह आहे ज्याच्या सीमेवर उत्तरेला कुंभ आणि तिमिंगल, पूर्वेला अश्मंत, दक्षिणेला जटायू, नैऋत्येला बक आणि पश्चिमेला दक्षिण मस्त्य हे तारकासमूह आहेत. या तारकासमूहाचे आंतरराष्टीय खगोलशास्त्र संघाने मान्यता दिलेले लघुरूप 'ScI' असे आहे. विषुववृत्तीय निर्देशांक पद्धतीमध्ये या तारकासमूहाची सीमा विषुवांश २३ता ०६.४मि ते ०१ता ४५.५मि आणि क्रांती −२४.८०° ते −३९.३७° यादरम्यान आहे. हा तारकासमूह खगोलावरील ४७५ चौ. अंश एवढ्या क्षेत्रफळाचा भाग व्यापतो.
वैशिष्ट्ये
शिल्पकार तारकासमूहामध्ये कोणताही ताऱ्याची आभासी दृश्यप्रत ३ पेक्षा कमी नाही. याचे कारण या तारकासमूहामध्ये दक्षिण दीर्घिकीय ध्रुव आहे जिथे ताऱ्यांची घनता अतिशय कमी आहे. या तारकासमूहातील आर स्कल्प्टोरिअस या रेड जायंट ताऱ्याभोवती त्याने अंदाजे १८०० वर्षांपूर्वी उत्सर्जित केलेल्या पदार्थाची सर्पिलाकार रचना आढळली आहे.
त्याचबरोबर या तारकासमूहामध्ये कार्टव्हील दीर्घिका ही एक असामान्य दीर्घिका आहे.
संदर्भ
- ^ ख्रिस साकाकी. द कॉन्स्टेलेशन्स: स्टार्स अँड स्टोरिज (The Constellations: Stars & Stories) (इंग्रजी भाषेत).
- ^ "सर्प्रायझिंग स्पायरल स्ट्रक्चर स्पॉट्टेड बाय अल्मा (Surprising Spiral Structure Spotted by ALMA)". 11 October 2012 रोजी पाहिले.