Jump to content

शितला देवी मंदिर (माहीम)

भारतात बऱ्याच राज्यात शितलादेवीची मंदिरे आहेत. पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात केळवे गावात एक पुरातन मंदिर आहे. तसेच मंदिर मुंबईत माहीम भागात आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे स्थानकावर उतरून पश्चिमेला लेडी जमशेटजी रोडवर हे मंदिर आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून सुद्धा येथे जाता येते. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसेस शितलादेवी मंदिर बसथांब्यावर थांबतात.

इतिहास

मौखिक परंपरेनुसार पोर्तुगीज काळात या देवतेची स्थापना इथे झाली आणि तिचे मूळ स्थान पालघर तालुक्यातील केळवे-माहीम केळवे गावात आहे असे म्हणले जाते. मुंबईतील ह्या शितलादेवी मंदिराच्या दर्शनी स्थापत्यावरून त्याचे प्राचीनत्व सिद्ध होऊ शकत नाही. परिसरात असलेल्या मूर्तीचे भग्नावशेष ११व्या ते १३ व्या शतकातले असावेत. महिकावतीच्या बखरीमध्ये शितलादेवीच्या मंदिराचे उल्लेख आहेत. हे मंदिर साधारण १७ व्या शतकातील असावे. मंदिराचा अनेकदा जिर्णोद्धार झाला आह

मंदिर आणि परिसर

प्रवेशद्वारात एक प्रचंड दगडी दीपमाळ आहे. परिसरात एक दगडी देवळी आहे. ती चारही बाजूंनी उघडी आहे. शितला देवीचे मंदिर साधे पण मोठे आहे. मोकळा मंडप आणि नेटके गर्भगृह हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. परिसरात घुमटीवजा शिखर असलेली शंकर, विठ्ठल- रखुमाई, शांतादुर्गा अशी अनेक मंदिरे आहेत. परिसरात नंदी, विहीर, दीपमाळा, वृक्षांभोवती बांधलेले पार आहेत. गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टकडून कारभार पाहिला जातो. कोळी, भंडारी, पाठारे प्रभु, पाठारे क्षत्रिय, सोमवंशी क्षत्रिय आणि गौड सारस्वत असे अनेक लोक येथे दर्शनासाठी येत असतात. आजूबाजूच्या परिसरात प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले होते. काही अवशेष माहीम पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळतात. जवळच ७०० मीटर अंतरावर असलेल्या साती आसरा मनमाला मंदिरात प्राचीन मंदिरांचे काही अवशेष आहेत. महिकावतीच्या बखरीत बिंबाराजाची राजधानी म्हणून महिकावतीचा उल्लेख येतो. भाभा ॲटोमिक रिसर्च परिसरात नुकताच सापडलेल्या एका शिलालेखात मुंबईचा माहीम बिंबस्थान असा उल्लेख आहे. शितलादेवीची मूर्ती मंदिराच्या परिसरातील विहिरीत सापडली होती असे म्हणले जाते. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपले सांस्कृतिक अस्तित्व जपणाऱ्या अनेक स्थानिक जनजातींचे हे श्रद्धास्थान आहे.

संदर्भ

महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार, १० ऑगस्ट २०२१.