Jump to content

शिकेकाई

शिकेकाई ( Acacia concina) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याच्या शेंगा कुटुन डोक्यास लावतात. बाभूळ, खैर व हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अ‍ॅकेशिया रुगेटा हे आहे.ह्या वनस्पतींच्या अ‍ॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात. शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात. दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.

उपयोग

  • शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात.
  • केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.
  • त्वचा कोरडी पडत नाही. रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.
  • खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.
  • हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.
  • कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो.
  • शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.
  • चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.
  • बिया सुलभ प्रसूतीकरिता देतात.
  • गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.
  • बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.
  • शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात [→ रिठा], कारण शेंगात सॅपोनीन हे ग्लायकोसाइड ५% असते. शिकेकाईयुक्त साबण बाजारात उपलब्ध आहेत. ‘
  • सप्तला’ ह्या नावाने सुश्रुतसंहितेत शिकेकाईचा निर्देश शाकवर्गात केलेला आढळतो.

संदर्भ

http://mr.vikaspedia.in/health/90691c94092c93e90891a93e-92c91f93593e-90593094d92593e924-91893091a93e-93594892694d92f/93693f91594791593e908