Jump to content

शाहीर हैबती

शाहीर हैबती हे पेशवाईच्या उत्तरकालातील प्रसिद्ध शाहीर होते. ‘हैबतीबुवा’, ‘शाहीरश्रेष्ठ’, व ‘कलगीसम्राट’ या नावांनीही परिचित. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील डिक्सळ येथे घाडगे घराण्यात झाला. ते लहान असतानाच त्यांचे वडील डिक्सळहून जवळच असलेल्या पुसेगाव-राजेगाव येथे राहण्यास गेले. तेथे ते शेतीचा व्यवसाय करीत. गुरे राखणे हे हैबती यांचे आवडते काम होते. लहानपणापासून स्वयंस्फूर्तीनेच ते कवने करीत असत. आपल्या काव्य-स्फुलिंगाला चेतविण्यासाठी ते आईवडिलांसह जवळच्या त्रिपुटी या गावी गेले. तेथे गोपाळनाथ (भोलानाथ) या नाथपंथी संतांचा त्यांना सहवास लाभला. हैबती यांनी त्यांचे शिष्यत्व पतकरले.

गोपाळनाथांजवळ असलेल्या विपुल ग्रंथ-भांडाराचे अध्ययन त्यांनी केले. रामायण, महाभारत इ. महाकाव्ये निरनिराळी पुराणे, वेद, उपनिषदे, गीता इ. तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ कोकशास्त्र, संगीतशास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र इ. विषयांचा त्यांनी अभ्यास केला. स्थापत्य, शिल्पशास्त्र आदी विषयांवर त्यांनी निरनिराळी कवने लिहिली. ज्या कवनांना गणिताचा आधार आहे, अशा रचनांना ते गणित कविता म्हणत. त्या रचना उपलब्ध आहेत. ते कथा-कीर्तन करू लागले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू अमृतबुवा कारंडे यांच्या बरोबर त्रिपुटी सोडून ते पुसेसावळी येथे आले. येथे नाथपंथ आणि वारकरी पंथ यांची धुरा सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडून ते अद्वैतभक्तीचा प्रसार करू लागले.

हैबती पंढरपूरच्या वारीस गेले असताना तमाशात स्त्रीजातीची होणारी विटंबना त्यांनी पाहिली. तमाशाचे शृंगारिक रूप बदलून तमाशा आध्यात्मिक करमणुकीचा प्रकार करावा, असे त्यांनी ठरविले आणि तमाशाचा परंपरागत ढाचा कायम ठेवून विषयाच्या दृष्टीने तमाशाचे स्वरूप बदलले. अध्यात्म, शृंगार आणि त्यातून लोकरंजन हे या नव्या तमाशाचे विशेष होते. नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदाय यांच्या समन्वयाच्या दृष्टीने त्यांनी तत्कालीन काळातील कलगी पक्षाचा स्वीकार केला.हैबतीची सारी रचना कलगी पक्षाची आहे. त्यांत काही ‘भेद’ (रहस्य) किंवा प्रतिपक्षाचा भेद करणारी अशी कवने असल्याने हैबतींच्याकवनांना ‘भेदिक कवन’ अशी संज्ञा आहे. हैबतींच्या तमाशाचा बहुतेक भाग प्रश्नोत्तररूपी कवनांनी भरलेला असे. तमाशात म्हणावयाची पदे, गण, लावण्या, कटाव, फटके, साक्या, चरित्रपर आख्याने अशी विविध प्रकारची काव्यरचना त्यांनी केली.

शाहिरांना त्यांनी सवाल-जवाबाचे तंत्र, तसेच त्यांतील गूढे व त्यांची उकल करण्याची पद्धती शिकविली व त्यासाठी ग्रंथान्तरीचे पुरावे दाखविले. गुरुपरंपरेतून मिळालेल्या आध्यात्मिक वारशामुळे हैबती ‘कलगी सम्राट’ ठरले. त्यांनी आपला मोठा शिष्यपरिवार उभा केला. ते नाथ पंथीय असल्यामुळे जातिभेद, धर्मभेद मानत नव्हते. त्यामुळे त्यांच्या शिष्यपरंपरेत निष्ठावंत मुसलमानही होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पुसेसावळी हे भेदिक कवनांचे केंद्र बनले.

सु. एक लाख साठ हजार शास्त्रसंमत कवने त्यांनी रचली. त्यांपैकी फारच थोडी आज उपलब्ध आहेत. ‘पृथ्वीची मोजणी’, ‘चारचंद्र’, ‘नरदेहसाधन’, ‘देहावरील मळा’, ‘चुडा कटाव’, ‘गजगौरीव्रत’, ‘सिमंतक मणी’, ‘अधरताल’, ‘यमघंट योग’, ‘मृत्यु योग’, ‘घबाड मुहूर्त’ इ. त्यांची कवने प्रसिद्ध आहेत. श्री नाथलीलाविलास, तूर्तबोध, श्रीअर्जुनगीता आणि श्रीआत्मानुभवग्रंथसार ही त्यांची ओवीबद्ध ग्रंथरचना आहे. सातारा जिल्ह्यातील आद्य नाट्यकलावंत-शाहीर हैबती आणि शाहीर हैबती : चरित्र आणि काव्य या दोन ग्रंथांतून त्यांची स्फुट-रचना प्रकाशित झाली आहे.

लोकरंजन करताना कलावंताने उच्च नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. शाहीर कवी, विचारवंत आणि प्रयोगशील कलावंत असणाऱ्या हैबती यांनी लावणीलाच कीर्तनाचा साज चढवत आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी पहावा असा कीर्तनसश तमाशा निर्माण केला.