Jump to content

शाहीर साबळे

शाहीर साबळे

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (३ सप्टेंबर, १९२३ - २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.[] मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले.आज जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र शासनाने राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. यातील दोन कडवी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून सन 2023 स्वीकारले आहे.


बालपण आणि शिक्षण

सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसऱ्या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.

सामाजिक आणि राजकीय कारकीर्द

शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.

पुढे तरुणपणी इ.स. १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वतःला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता. शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती.

मुंबई-पुणे-मुंबई

शिक्षणाची आबाळ होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून "हिरा हरपला‘ हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले. पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो, हे जेव्हा चुलत्यांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले. मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवा सूर गवसला. थोड्या फार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधी मिळाली; पण तेथेही मन जास्त रमले नाही. म्हणून शाहीर साबळे यांनी पुन्हाना एकदा मुंबई गाठली. अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते.

लेखन

समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.

स्वातंत्र्य आंदोलन

इ.स. १९४२ मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सामील होऊ लागले. त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली.

लोकसंगीत

लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली. यात अभंग, वाघ्या-मुरळी, शेतकरी नृत्य, लावणी, जोगवा, चिपळुणी, बाल्याचा नाच, भारूड, कोळीगीते अशा कलाप्रकारांतून मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या 'महाराष्ष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली.

राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी हे माध्यम निवडून त्यांनी 'जागृती शाहीर मंडळ' स्थापन केले. पुढे शाहिरी ही त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. तब्बल १३ मुक्तनाट्यांच्या माध्यमातून शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. शाहिरीचे प्रशिक्षण देणाऱ्या 'शाहीर साबळे प्रतिष्ठान'च्या माध्यमातून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. शाहीर साबळे यांच्यानंतर त्यांच्या समृद्ध कलेचा वारसा त्यांचा मुलगा गीतकार-संगीतकार देवदत्त साबळे, मुलगी चारुशीला साबळे-वाच्छानी आणि नातू दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे आला. वसुंधरा आणि यशोधरा अशा शाहीर साबळे यांच्या आणखी दोन मुली. भानुमती हे शाहीर साबळे यांच्या पत्‍नीचे नाव. त्या कवयित्री होत्या. त्यांनी रचलेली गीते साबळे गात असत.

पहिली ध्वनिमुद्रिका

आकाशवाणीवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्यानंतर ’नवलाईचा हिंदुस्थान’ या गीताचे त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. त्यांची ’इंद्राच्या दरबारातील तमासगीर’ या प्रहसनाच्या ध्वनिमुद्रिका दारुबंदी खात्याने प्रचारासाठी वापरल्या. दारुबंदी प्रचारक म्हणूने ते साताऱ्याला आले असताना त्यांची भेट भाऊराव पाटील यांच्याशी झाली.

जाहीर कार्यक्रम

पत्‍नी भानुमती हिच्या सहकार्याने साबळे यांनी अनेक जाहीर कार्यक्रम केले. आचार्य अत्रे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाळ ठाकरे, लता मंगेशकर आदी अनेकांनी शाहीर साबळे यांचे प्रकट कौतुक केले.

शाहीर साबळे यांचे रंगमंचावरील प्रयोग

शाहीर साबळे यांनी कलाक्षेत्रात नेहमी नवनव्या वाटा चोखाळल्या. भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावतील असे अचाट प्रयोग त्यांनी रंगभूमीवर केले. मोबाइल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील एकमेवाद्वितीय प्रयोगही त्यांनी सादर केला. लोकनाट्यात बदल करून त्यांनी 'मुक्तनाट्य' निर्माण केले.

शाहीर साबळे यांच्या लेखनकृती

  • आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
  • आंधळं दळतंय (मुक्तनाट्य; पहिला प्रयोग १३-८-१९६६ला मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात, २५वा शिवाजी मंदिरात आणि १००वा पुन्हा रवींद्रमध्ये झाला.)
  • इंद्राच्या दरबारातील तमासगीर (प्रहसन)
  • एक नट अनेक सम्राट
  • कोड्याची करामत
  • कोयना स्वयंवर
  • चित्रगुप्ताच्या दरबारातील दारुड्या
  • ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
  • नशीब फुटकं साधून घ्या
  • नारदाचा रिपोर्ट
  • बापाचा बाप (मुक्त नाट्य)
  • माझा पवाडा (आत्मचरित्र)
  • मीच तो बादशहा
  • यमराज्यात एक रात्र (पहिले मुक्तनाट्य, १६ जानेवारी १९६० रोजी अमर हिंद मंडळाच्या नाट्यगृहात पहिली प्रयोग). या मुक्तनाट्याला राज्यपातळीवरील लिखाणाच्या स्पर्धेत महाराष्ट्र सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.

यमराज्यात एक रात्र या मुक्तनाट्यातील गीते

  • अरेरे आम्ही ओळखिला व्यापार
  • तो धनिया तो बनिया
  • फुगडी यांनी मांडली
  • मन माझे तडफडले
  • विज्ञानी गढला मानव
  • सांगता धर्माची थोरी

शाहीर साबळे यांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते

  • अरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
  • अशी ही थट्टा (तमाशागीत)
  • आई माझी कोणाला पावली (भक्तिगीत)
  • आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
  • आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
  • आधी गणाला रणी आणला (गण)
  • आधुनिक मानवाची कहाणी (कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान सांगणारा पोवाडा)
  • आम्ही गोंधळी गोंधळी.. (गोंधळगीत)
  • जय जय महाराष्ट्र माझा (महाराष्ट्रगीत)
  • जेजुरीच्या खंडेराया जागराला (जागरगीत)
  • तडा तडा ते फुटले आमच्या विजयाचे चौघडे (आंधळ दळतंयमधील एक पोवाडा)
  • दादला नको ग बाई (भारूड)
  • नवलाईचा हिंदुस्थान
  • पयलं नमन हो करीतो (गण)
  • फुटला अंकुर वंशाला आज (समाजजागृती गीत)
  • बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
  • मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
  • महाराज गौरीनंदना (गण)
  • महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
  • मायेचा निजरूप आईचा (भावगीत)
  • मुंबईगं नगरी बडी बाका ((आंधळं दळतंय मधील एक गीत)
  • मुंबावतीची लावणी
  • या गो दांड्यावरना बोलते (कोळीगीत)
  • या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
  • विंचू चावला (भारूड)
  • सैनिक माझे नाव (स्फूर्तिगीत)
  • हय्‌ पावलाय देव मला (लोकगीत)

शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
  • भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
  • भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणाऱ्या पथकात सहभाग
  • महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • संत नामदेव पुरस्कार
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
  • १९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत

शाहीर साबळे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार

मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने शाहीर साबळे स्मृती गौरव पुरस्कार देण्यात येतो. पहिल्या वर्षी हा पुरस्कार पार्श्वगायक रवींद्र साठे यांना मिळाला. (१ मे, २०१५)

संदर्भ

  1. ^ संजय वझरेकर (३ सप्टेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. मुंबई. २१ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे