शाही पाम
इंग्रजी नाव
Roystonia regia (H.B.K) Cook रॉयल पाम,बॉटल पाम
माहिती
‘रॉयल पाम’ हा ताडमाड कुळातील एक अतिशय सुंदर व देखणा वृक्ष म्हणून ओळखला जातो.मूळचा हा क्युबा,वेस्ट इंडीज मधला,पण आज संपूर्ण जगात उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो.रॉयल पामचे शास्त्रीय नाव रॉयस्टोनिया हे प्रसिद्ध अमेरिकन सेनानी जनरल रॉयस्टोन याची आठवण म्हणून दिले गेले.वृक्षाची उंची साधारण ५०-६० फुट,खोड गुळगुळीत,राखाडी रंगाचे सरळ शिस्तीत वाढलेले आणि त्यावर छत्रीप्रमाणे हिरवागार पर्णसंभार खोड मधून आणि मुळाजवळ फुगीर झालेले असल्याने वृक्षाची बाह्यकृती काहीशी बाटलीसारखी दिसते, म्हणून ‘बॉटल पाम’ नाव पानांच्या खाली ५-६ फुट खोड हिरव्या पदराने लपेटल्यासारख आणि त्याखाली छान एकसारख्या राखी रंगावर किंचित गडद राखी रंगाची कंकणं उमटलेली बलदंड खोड असा एकूण साज असतो. मुंबईत हा वृक्ष अनेक उद्यानातून,इंडस्ट्रीयल हाऊसेसच्या परिसरात प्रामुख्याने लावला गेला आहे.जिजामाता उद्यान, सागर उपवन,हॉर्निमन सर्कल अव्ह्ल मैदान व इतर अनेक जागी बघायला मिळतो.आय.आय.टी.परिसरातला लांबलचक बॉटल पाम ॲव्हेन्यू आता बराच जुना झाला.ते सणसणीत वाढलेले पाम्स पहाण म्हणजे एक विशेष आनंद.उपनगरातून आता अनेक ठिकाणी झालेल्या मॉल्सच्या भवती, मोठमोठ्या हॉटेल्स आणि शैक्षणिक संस्थांच्या बागांभोवती रॉयल पाम्सचे राजस कोंदण रचण्यात आले आहे.उद्यान तज्ञांचे लाडके झाड म्हणजे रॉयल पाम.कोणत्याही मुख्य इमारतीकडे नेणाऱ्या रस्त्याच्या दोबाजूंना रॉयल पाम लावला कि काही न करताही शाही स्वागत झाल्याची भावना होते...आणि ते ‘रॉयली’ झुलू लागले कि सारा परिसरच राजेशाही ऐटीने सजु लागतो. या झाडांच्या देखणेपणाची मजा एकटया झाडाला पाहताना जाणवत नाही.त्यासाठी ती रांगेतच खडी करावी लागतात.
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची:मुग्धा कर्णिक