Jump to content

शार्क

शार्क

शार्क (गुजराती:सूसवाट) एक मांसाहारी जलचर प्राणी आहे.शार्क मास्यांच्या ४४० जाती आजतागायत माहीत आहेत.समुद्रातील सर्वांत धोकादायक प्राणी किंवा 'टायगर ऑफ दी सी' म्हणून शार्क मासे ओळखले जातात. त्यांच्या सु. ३५० जाती आहेत. त्यांपैकी ३० जाती मानवाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. सर्व शार्क दिसण्यास सारखे दिसतात, पण त्यांच्या आकारांत व रंगांत विविधता आढळते. ते निळ्या, करड्या, पिवळ्या, तपकिरी, पांढऱ्या अशा विविध रंगांचे असतात. काहींच्या शरीरावर पट्टे, ठिपके किंवा नक्षी दिसते. शार्कचे यकृत मोठ्या आकाराचे असून त्यात तेल साठविलेले असते. त्याचा उपयोग त्यांना पोहण्यासाठी होतो. बहुतेक शार्क अनियततापी आहेत, मात्र व्हाइट शार्क व मॅको शार्क हे नियततापी आहेत. त्यांचे आयुष्य सु. २५ वर्षांचे असते, पण काही १०० वर्षेही जगतात. शार्क माशांचे अस्तित्व पृथ्वीवर सु. ३५ कोटी वर्षांपासून आहे. त्यांची उत्पत्ती इतर माशांबरोबर सु. ३६५ ते ४० कोटी वर्षांपूर्वी डेव्होनियन कालखंडात झाली असावी. जगातील सर्वच सागरात ते आढळतात. उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधातील सागरी विभागात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. भूमध्यवृत्तावर त्यांचे प्रमाण अधिक व ध्रुवप्रदेशाकडे ते कमी-कमी होत गेल्याचे आढळते. ग्रीनलंड शार्क आर्क्टिक महासागरात खोलवर राहतात, तर मुशी मासे किनाऱ्यालगत आढळतात. बहुतेक शार्क साधारणपणे ४५५५ मी. खोलीवर आढळतात.

भारताच्या सागरी परिसरात व्हेल शार्क, टायगर शार्क, व्हाइट शार्क, मुशी व हॅमर हेडेड शार्क आढळतात. भारतात ते कोठेवाड, मुंबई, केरळ व प. बंगाल लगतच्या सागरांत वर्षभर आढळतात. हे मासे जुलै ते मार्च या काळात पश्चिम किनाऱ्यावर आणि मे ते जानेवारी या काळात पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅरकॅऱ्हिनस गँगेटिकस हा गोड्या पाण्यातील शार्क गंगा नदीत आढळतो.[१]

शरीररचना

शार्कचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून त्याचा आकार साधारण लांबट व दोन्ही टोकांस निमुळता व प्रवाहरेखित असतो. त्याच्या शरीरावरील बराचसा भाग त्वचेत रुतलेले सूक्ष्म खवले असा असतो, त्यामुळे ते आपणास डोळ्यांनी दिसत नाहीत. त्याच्या शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग पडतात. डोके त्रिकोणी असून मुस्कट पाचरीसारखे पुढच्या बाजूस असते. त्याचे तोंड अधर बाजूस अर्धचंद्रकोरीसारखे असते. दोन्ही जबड्यांत तीक्ष्ण व पाठीमागे वळलेल्या दातांच्या अनेक रांगा असतात. त्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी व ते सुटू नये यासाठी होतो. डोक्याच्या दोन्ही बाजूंस डोळे असतात व त्यांच्या शेजारी नाकपुड्यांची छिद्रे असतात. डोक्याच्या डाव्या व उजव्या बाजूस लहान छिद्रांचे (अँप्युलरी पोअर्स) अनेक समूह असतात. घशाच्या दोन्ही बाजूंस पाच (काहींत सात) क्लोम-दरणे असतात व त्यावर आवरण नसते.[२]

शेवटच्या क्लोम-दरणापासून अवस्करापर्यंतच्या भागाला धड म्हणतात. धडाच्या जागी त्याचे शरीर जाड असते व शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. धडावर दोन अजोड पृष्ठपक्ष व अंसपक्ष आणि श्रोणिपक्षाची एक-एक जोडी असते. नरामध्ये श्रोणिपक्षाच्या आतील बाजूस आलिंगकाची जोडी असते. शेपटीच्या सुरुवातीस अधर बाजूस अवस्कर असते. शेपटी साधारणपणे शरीराच्या निम्म्या आकाराची असते. शेपटीच्या वरच्या भागावर अजोड लहान पृष्ठपक्ष असतो. शेपटीस मोठा पुच्छपक्ष असतो; त्याचा वरचा अर्धा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. शेपटीच्या खालच्या बाजूस अजोड अधरपक्ष असतो. शार्कच्या शरीरावर असलेले सर्व पक्ष (पर) पाठीमागच्या बाजूकडे वळलेले असतात. त्यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. उपास्थिमिनांत आंतरिक सांगाडा हाडांचा नसून तो कुर्च्यापासून बनलेला असतो. त्यात वयानुसार कॅल्शियमाचे प्रमाण वाढल्याने तो टणक बनतो. सर्व मणके स्नायूने एकमेकांस जोडलेले असतात.[३]

पचनतंत्राची सुरुवात मुखापासून होते. अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर इंग्रजी (J) आकाराचे असते. आतड्याच्या आतील बाजूस सर्पिल झडप असते. या झडपेमुळे अन्न शोषून घेण्यास अधिक वेळ मिळतो व शोषून घेणारा पृष्ठभाग वाढतो. आतड्यातील मलाचे अवस्करात उत्सर्जन होते. श्वसन तंत्रात क्लोम-दरणाच्या पाच (काहींत सात) जोड्या असतात. मुखात घेतलेले पाणी क्लोम पटलिकांवरून वाहत जाऊन मागील बाजूने बाहेर पडते. त्या वेळी पाण्यातील ऑक्सिजन रक्तात शोषून घेतला जातो व रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू पाण्यातून बाहेर टाकला जातो. शार्कमध्ये वाताशय नसते. उत्सर्जन क्रिया दोन वृक्कांमार्फत केली जाते. रक्तातील यूरिया तर्षण दाब समतोल राखतो. अंतःस्रावी ग्रंथी शरीराच्या विविध क्रिया - प्रक्रियांचे नियमन करतात. मेंदू व मेरुरज्जू या दोन्हींची मिळून केंद्रीय तंत्रिका तंत्र बनते. मेंदूत अग्रभागी दोन्ही बाजूंस गंधखंड, दाने प्रमस्तिष्क, दोन दृष्टिखंड, लंबमज्जा व खालील बाजूस निमस्तिष्क असे भाग असतात. मेंदूतून दहा मस्तिष्क तंत्रिकांचा उगम होतो. दृष्टी, श्रवणशक्ती, घ्राणेंद्रिये इत्यादींची संवेदना केंद्रे मेंदूमध्ये निरनिराळ्या ठिकाणी असतात.[४]

शार्कमध्ये पुढील प्रकारची संवेदांगे असतात

  • डोळा : याचे भिंग गोलाकार असते. भिंग व जालपटल यांतील अंतर कॅमेऱ्याप्रमाणे कमी-जास्त होते. जालपटलाच्या मागे टपेटम नावाचा चकाकणारा लेप असतो. खोल पाण्यात या लेपामुळे त्यांना दिसू शकते.
  • श्रवणेंद्रिय : हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात व तोल सांभाळण्यासाठी मुख्यत: होतो.
  • घ्राणेंद्रिये : मुखाच्या वरच्या बाजूस घ्राणेंद्रियाची दोन रंध्रे असतात. गंधज्ञानाबद्दल शार्क प्रसिद्धच आहेत. त्यांना लांब अंतरावरून भक्ष्याची चाहूल लागते.
  • त्वचा : स्पर्शाची जाणीव करून देणारे तंत्रिका तंतू त्वचेखाली सर्व शरीरभर पसरलेले असतात. तापमानातील अतिसूक्ष्म फरकही त्यांना जाणवू शकतात.
  • पार्श्विक रेखा ज्ञानेंद्रिय : त्वचेखाली असलेल्या संवेदन कोशिका नलिकांची ही रेखा बनलेली असते. या नलिका मध्य रांगेशी जोडलेल्या असून मधूनमधून संवेदनक्षम अशी रंध्रे असतात. या तंत्रामुळे पाण्यातील दाबाची, त्यातील निरनिराळ्या प्रवाहाची कल्पना येते.
  • अँप्युली ऑफ लोर्रेझिनी : डोक्याच्या दोन्ही बाजूंस व खालच्या बाजूस असे त्याचे तीन समूह आढळतात. लोर्रेझिनी कुंभिकेत ६ ते ८ लांबट नलिका भरलेल्या असतात. या संवेदांगामुळे माशांना पाण्यातील प्रदूषक रसायनाचा एक लक्षांश भागदेखील ओळखता येतो. तापमान, पाण्याचे प्रवाह, विद्युत्‌ व चुंबकीय प्रवाह इ. बदलांना ते उत्तम प्रतिसाद देतात.
  • पुटिका : या पुटिका त्वचेत शरीराच्या वरील व खालील बाजूस असतात. त्या वरून खवल्यांनी झाकलेल्या असतात. त्या प्रवाहातील बदल व पाण्यातील तरंगांची (लाटांची) हालचाल ओळखण्यास मदत करतात.

अन्न

शार्क हे प्रामुख्याने मांसाहारी आहेत. मासे, ऑक्टोपस, शेल मासे, छोटे शार्क, समुद्र कासवे हे त्यांचे अन्न आहे. त्यांची भूक अफाट असते. ते अन्न वा मांसाचे लचके तोडून सरळ गिळतात. त्यांवर चर्वण क्रिया होत नाही.[५]