शतपत्रे
शतपत्रे ही गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी लिहिली आहेत. लोकहितवादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रखर देशभक्त होते. समाजात बदल घडवण्याचा, समाज सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून लोकहितवादींनी लेखणी हातात घेतली आणि लहान-थोर सगळयांना हिताच्या गोष्टी सांगणारी तब्बल १०८ पत्रे त्यांनी लिहिली. शंभर पत्रे या अर्थाने शतपत्रे म्हणून ही पत्रे प्रसिद्ध आहेत. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, नवीन विद्या, परंपरा, धर्मकारण, जातिभेद, स्त्रीजीवन अशा कितीतरी विषयांवर ते सतत लिहीत राहिले. ‘प्रभाकर’ या त्यावेळच्या साप्ताहिकातून त्यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.
सुरुवात
१८८२ साली त्यांनी स्वतःचे मासिक लोकहितवादी या नावाने चालू केले. या मासिकातून त्यांनी स्थानिक स्वराज्यव्यवस्था, ग्रामरचना, पृथ्वीराज चौहान, दयानंद स्वामी यांची चरित्रे अशी पुस्तके प्रसिद्ध केली. १८८३ मधे त्यांनी ऐतिहासिक विषयांसाठी स्वतंत्र मासिक चालू केले आणि त्याचे नावही लोकहितवादी असेच होते. बदलत्या काळाची पावले लोकहितवादींसारख्या धुरीणांनी ओळखली आणि त्यासंबंधी लेखन केले. लोकांच्या चांगल्याचा, हिताचा विचार करणारे म्हणून त्यांनी स्वतःसाठी लोकहितवादी हे टोपणनाव घेतले आणि ते नाव सार्थही केले. स्वतःच्या कामाची त्यांना किती योग्य जाणीव होती हेतेच या नावातून दिसून येते.
‘प्रभाकर’ नावाच्या साप्ताहिकात महाराष्ट्रातील चळवळींची माहिती गोपाळरावांनी दिलेली आहे. २६ मार्च १८४८ साली लिहिलेल्या तिसऱ्या पत्रात ते पुण्यात ग्रंथालय चालू व्हावे यासाठी कशा सभा घेतल्या गेल्या आणि इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अभ्यासू लोकांनी त्याला कशी मान्यता दिली हे लिहिले आहे. याच पत्रात ते पुढे लिहितात की ‘पुण्यातील किती एक आळशी लोकास लायब्ररी काय, हे माहीत नाही. याच कारणामुळे सरदार आणि कामदार लोकांनी पैसा दिला नाही . तथापि अजमासे दीड हजार रुपये जमले आहेत.’ याच पत्रात लोकांना विद्या शिकण्याची कशी लाज वाटते, गरज वाटत नाही आणि पोटापुरते मिळण्यावरच ते कसे खूश आहेत याचे वर्णन त्यांनी केले आहे. वर्तमानपत्रांत लेख लिहून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांविषयी लोकमत जागे करण्याचा गोपाळरावांनी आरंभ केला होता. पुढे त्यांच्या प्रेरणेने पुण्यातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश सुरू झाले. कदाचित त्यातील काही लिखाण हे लोकहितवादींचे असावे असे वाटते.
लोकहितवादी आणि त्या काळातल्या समाज सुधारकांनी समाजाच्या भविष्याचा विचार केला. भारतीय समाज, भारतीय माणसे जगात मागासलेली राहू नयेत. जगात जे नवीन, चांगले चालू आहे त्याच्या बरोबरीने भारतीय समाजाने गेले पाहिजे. या तळमळीने ते लिहीत होते. त्याच पत्रात हे स्पष्ट करत असताना ते पुढे म्हणतात, ‘थोरपणा पाहिजे असेल त्यांनी सांप्रत काळच्या ज्ञानाची संपदा मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्ञानाने इतर लोकांनी आपली सरशी केली ते ज्ञान आपण धिक्कारू नये. कारण की, आपणांस त्याचा अनुभव आला आहे. याजकरिता सावधगिरीचे लक्षण हेच कीं, काळास ओळखून त्याप्रमाणे करावे, असे न केले तर फार फजित होऊन दुर्दशा झाली आहे त्यापेक्षा अधिक होण्याचा संभव आहे. आता आपण अनेक देशांच्या कल्पना एके ठायी करून नवे शोध करून ते सुधारावें म्हणजे खरा थोरपणा मिळेल व लोकांचे हित होईल.’
लोकहितवादी सांगतात, ‘कोणास खोटें वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पाहावे आणि त्यांस पुसावें की, इंग्रज हिंदुस्थानांत कोठे कोठे राज्य करतात ? ते म्हणतील की, छी, इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानांत तो एक ताम्रमुखी मात्र असतो. याप्रमाणे पेशवाईत अवस्था होती.’ पत्र क्र. ४८ मधे ते लिहितात, ‘ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रहणांत राहू चंद्रास ग्रासतो, हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. (पत्र क्र. ६२) कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसें बुडालें हो? दुसरा उत्तर करतो, अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार तें झालें. त्यास उपाय काय? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसें घडतें.’ (पत्र क्र. ५५) ‘ज्ञान म्हणजे काय हेंच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडांतील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस (फ्रान्स) यांची राज्यक्रांति, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थहि बहुत हिंदू मनुष्यास ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस कांही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खुष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठें ज्ञान संपादन केलें.’
बदलत्या काळाची पावले ओळखून लोकहितवादी आणि त्यांच्या बरोबरीच्या समाजसुधारकांनी इंग्रजांनी आणलेल्या नवीन ज्ञानाची, नवीन विषयांची माहिती करून घेण्याची गरज पुन्हा पुन्हा दाखवून दिली. लोकहितवादींनी पहिल्या काही पत्रांतून त्यांनी त्याकाळातील लोकांच्या अज्ञानावर टीका केली आहे. त्यावेळच्या समाजाचा कोणी तरी कान पकडायची गरज होतीच. मरगळलेल्या, निष्क्रिय झालेल्या समाजाला कोणी तरी हलवण्याची, मनात उभारी भरण्याची गरज होती. ती गरज लोकहितवादींसारख्या समाजसुधारकांनी पूर्ण केली.
भारतीय समाजात संस्कृत ही ज्ञानभाषा होती. प्राचीन काळी व्याकरण, वेदान्त, ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांवरचे ग्रंथ संस्कृतात लिहिले गेले. त्या काळी संस्कृत ही ज्ञानवंतांची भाषा होती. तत्कालीन अभ्यासकांनी अतिशय बारकाईने केलेले निरीक्षण, विश्लेषण या ग्रंथातून परत परत दिसते. पण दुर्दैवाने काळाच्या ओघात इथे बाहेरच्यांची आक्रमणे होऊ लागली. त्या आक्रमणांमुळे कदाचित समाजाची घडीच बदलली. नवीन अभ्यास बंद झाला. नवीन विचार, नवीन संशोधन बंद झाले आणि संस्कृत विद्येला वाईट परिस्थिती आली. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीप्रमाणे नवीन ज्ञानशाखा, अभ्यासशाखा, विद्याशाखा विकसित होण्यासाठी समाजाला वेळ मिळाला नाही. पत्र क्र. ३० आणि ५९मधे लोकहितवादी म्हणतात, ‘धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्यामुळे आज प्रत्यक्षांत व शास्त्रांत मेळ पडत नाही. प्रत्येक वेळी लोकस्थिती पाहून धर्मशास्त्रांत परिवर्तन केले पाहिजे. पण असे न झाल्यामुळे आमचे धर्मशास्त्र व त्याचबरोबर इतर शास्त्रे अगदी निरुपयोगी झाली आहेत.’ ‘संस्कृतात इतिहास नाही. भारतात राज्ये किती होतीं, कोणाची होती, तीं बुडाली केव्हा, कशामुळे बुडाली, मुसलमान केव्हा आले, पाश्चात्त्य केव्हा आले याविषयीं संस्कृत पंडितांचे ज्ञान, नांगरहाक्याइतके असते.’
समाजातील लोकांची विचारांची पद्धत बदलणे हे सोपे नव्हते. लोकांच्या आपल्या पिढयानुपिढया चालत आलेल्या विचारांवर दृढ विश्वास होता. लोक कसा विचार करत होते हे दाखवून देताना पत्र क्र. ३०मध्ये लोकहितवादींनी लिहिले आहे, ‘हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरांत आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लोक पोरासारखे बोलतात की, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपीकर हे पाण्यांतले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करूं लागल्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केश देखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेहि ठाऊक नाहीत.’
एकीकडे आजूबाजूला काय चालू आहे याची जाणीव अनेकांना नव्हती आणि दुसरीकडे विद्या, ज्ञान यासंबंधीच्या कल्पनाही जुन्या होत्या. अनेकदा संस्कृत विद्येचा नीट अर्थही माहीत नसायचा. केवळ पाठांतर करणे यालाच विद्या म्हणण्याची पद्धत पडली होती. विद्या या शब्दाचा असा अर्थ करावा याची लोकहितवादींना अगदी चीड यायची. ते ७७व्या पत्रात यासंबंधी म्हणतात, ‘अहो, पाठ म्हणणें ही विद्या केली कोणी? यांत फळ काय? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याहि देशात झाला नसेल.’ लोकहितवादी म्हणत की, नुसते व्याकरण पाठ म्हणणे ही विद्या नव्हेच. त्यापेक्षा माणसाला लाकडे तोडण्याचे कौशल्य शिकवलेले बरे. कारण नुसते समजून न घेता पाठ केल्यामुळे काहीच फायदा होत नाही. उलट केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपतनाचे पहिले कारण आहे असे त्यांना वाटत असे.
परदेशी आक्रमणांमुळे भारतातल्या अनेक भूभागातील राज्यव्यवस्था, कामाच्या पद्धती, अर्थव्यवस्था बदलू लागली. राजे-महाराज्यांचा जमान संपत चालला होता. त्यामुळे त्यांच्या पदरी काम करणाऱ्या अनेकांची नोकरी संपली. महाराष्ट्रात इ.स. १८१८ च्या सुमारास दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नामर्दपणामुळे पेशावाई बुडाली. त्यामुळे पूर्वीच्या सगळयाच व्यवस्था कोलमडू लागल्या. समाजात वेगळे वारे वाहू लागले. आगरकर याचे वर्णन करताना म्हणतात की, पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे वा हाडकाचे, रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसले राहिलेच नव्हते. पण पाश्चात्त्य विद्येमुळे नवी दृष्टी प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला आणि नवभारताची निर्मिती झाली.
इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे इंग्रजी भाषा शिकणे आवश्यक झाले. या भाषेमुळे भारतीयांसाठी जगाचे दरवाजे खुले झाले. तोपर्यंत हिमालयापलीकडच्या जगात काय आहे याची हिंदुस्थानी लोकांना जाणीवच नव्हती. जगात काय चालू आहे, नवीन काय घडते आहे, जगात कोणत्या मूल्यांवर समाजघडणी होते आहे अशी सगळी माहिती शिकलेल्या भारतीयांना समजू लागली. त्यामुळे एक विस्तृत जग खुले झाले. इंग्रजी शिकलेल्या नवशिक्षितांना स्वातंत्र्य, समता, बंधुता ही समाज बांधणीची नवीन तत्त्वे समजली. लोकशाहीची नवी तत्त्वे समजू लागली. त्याच्या बाबतीत २८ मे १८४८ साली लिहिलेल्या पत्र क्र. १८मध्ये लोकहितवादी लिहितात ‘आता फिराशिसांचे (फ्रान्स) मुलखात असे झाले की ’राजा रयतेस पीडा करूं लागला व विनाकारण खर्च करून रयतेकडून नानाप्रकारचे कर वगैरे बसवून पैका घेऊं लागला, तेव्हा पारीस (पॅरीस) म्हणून फ्रेंचांची राजधानी आहे, व तेथे मोठमोठे विद्वान लोक आहेत. त्यांणी संपूर्ण रयतेस त्रास आला आहे, असे जाणून तेथें एक युद्धविद्या शिकविण्याची शाळा आहे, तेथील विद्यार्थी वगैरे लोक मिळवून राजवाड्यावर गेले व तेथें फौजफाटा होता त्यांस सांगितले की, आम्ही राज्याची सुधारणा करावी व आपल्यास स्व-इच्छ राजापासून सुख होत नाहीं. यास्तव लोकसत्तात्मक राज्य करावें यांसाठी झटतों. आमचा हेतु इतकाच कीं, सर्व लोकांस सुख व्हावें व जाचे त्याचे हक्क कायम राहावें, आम्ही लुटणारे नव्हेत; व आम्हांस काही नको. हें ऐकून ती फौज त्यांस वश झाली आणि त्यांचेबरोबर गेली. मग ते सर्व लुईस फिलीप राजास हस्तगत करणार तों तो धाकानें स्त्रीसहित पळून गेला. मग मागें शहरचे लाकांनी वाडा घेऊन सभा भरवली व असें ठरविलें कीं, आजपासून रयतेचें राज्य रयतेनें करावें. व त्याप्रमाणे नऊशें आसामी सभेस बसण्यास मुकरर केले. आणि राजाचे असबाबास काहीं हात लाविला नाहीं. राजाचे खोलीत जे मोहोर केलेले लखोटे सांपडले तेही जांचे नावावर होते त्यांजकडे पाठवून दिले. असे मर्यादेने ते लोक चालले. हल्ली फ्रेंचांचे राज्यांत लोक राज्य करतात, हे पाहून दुसरे टोपकारचे (इंग्रज) मुलूख म्हणजे अमेरिका व सुइजरलंड (स्वीग्झरलंड) वगैरे यांणीहीं आपले देशांत लोकांचे राज्य स्थापन केलें. फ्रेंचांचे देशातं ज्या वेळेस राजास काढून टाकिले तेव्हां फौजेमध्यें बोनापार्ट म्हणून एक नामांकित सरदार होता. त्याणें जय पुष्कळ मिळविले व त्यास राज्याचा लोभ उत्पन्न होऊन त्याणें राज्य बळकावलें, तेव्हां, इंग्रजांनी वेसलीसाहेब म्हणजे ड्यूक वेलिंग्टन यास पाठवून त्यास कैद करून टाकले आणि पूर्वीचे राजाचा वंशज बसविला परंतु हल्लीं प्रेंचांचे राज्यांत हात घालूं नये असा निश्चय इंग्रजांनीं केला आहे कारण संपूर्ण लोकांचा एकोपा ठरला कीं, राजा नसावा आणि प्रजा एकत्र होऊन राज्य चालवितात व इंग्रजांशी स्पर्धाही करीत नाहीत. त्यापेक्षां आपल्यास बोलण्यास काहीच जरूर नाही. असे इंग्रजांनी ठरविले आहे व इंग्रजांचे काही आधीच्या राजे-रजवाड्यांच्या काळाची पडझड होऊ लागली होती. त्यावेळचे समाजाचे नेतृत्व करणारे ब्राह्मण, सरदार, जहागीरदार यांची सत्ता तर नष्ट झाली होतीच पण त्यातल्या अनेकांना दारिद्र्याला तोंड द्यावे लागत होते. आजूबाजूला नेमके काय चालू आहे. काय बदल होत आहेत याचे त्यांना भान नव्हते. पूर्वी रावणाचे संकट आले तेव्हा रामाच जन्म झाला आणि रामाने रावणाचा संहार केला. त्याप्रमाणे कोणी देव पुन्हा या भूतलावर येईल आणि आपल्या संकटाचे निवारण करेल अशा कल्पनांमधे हा समाज अडकला होता. त्यासाठी वेगवेगळी व्रते, उपास, परंपरा यांचा सांभाळ करत होता. अशा जुनाट उपायांनी आपण संकटातून बाहेर पडू शकणार नाही. एवढेच नाही तर भारताबाहेरील देश ज्या वेगाने प्रगती करत आहेत त्यातही आपण मागे पडू हे या द्रष्टया समाजसुधारकांनी जाणले. आज आपण भारताचे जे रूप पाहतो आणि अनुभवतो आहोत त्यामागे या समाजसुधारकांचे विचार आहेत. त्यांनी काळाची बदलती पावले वेळेवर ओळखली त्यामुळेच आज आपला देश आधुनिक भारताच्या रूपात दिमाखात उभा आहे.
‘ इंग्रजी विद्वान पूर्वी हिंदुस्थानात एक असता तर राज्य न जाते याचा भावार्थ हाच की ती विद्या येथे असती तर आम्ही इतिहास, भूगोल, गणित, रसायन, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यात प्रवीण झालो असतो. आणि मग आम्ही पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर गेल्या शंभर वर्षात जसे संघटित व समर्थ झालो, तसें आधीच झालो असतो व मग अर्थातच आपले राज्य गेलें नसतें. पण हे भट, कारकून, मूर्ख जमा झाले म्हणूनच राज्य बुडालें. जर विद्या पहिल्यासारखी असती तर हिंदू लोकांची अशी अवस्था न होती.’
विद्येमुळेच स्वातंत्र्य
लोक अज्ञान सोडून नवीन विद्या शिकले की भारताला स्वातंत्र्य मिळेल असे लोकहिवादींना वाटत होते. त्याविषयी ते ५४ व्या पत्रात लिहितात, ‘आता हिंदू लोकांनी उघड पाहावें की, आम्ही श्रेष्ठ की दुसऱ्या देशाचे लोक श्रेष्ठ. ग्रंथांवरून पहावें व लोकांचे तोंडून एकावॆ तेव्हां समक्ष भेट झाली तरचासगलें कीं नाहीं याचा विचार पहावा. तेव्हां साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहूत सुटल्या व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांचीं मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापरधंदा कसा करावा हे ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणांत होत नहीं, तीस पुष्कळ विलंब लागतो. लहानमुलांस शहाणे होण्यास दाहवीस वर्षे लागतात, मग हा देश चांगला होण्यास दोनचारशें वर्षे लागतील. तोपर्यंत या लोकांस दुःख आहे परंतु त्यास उपाय नाहीं. जशी शाळेमध्ये मुलांनीं शिक्षा घेतली पाहिजे तद्वत् हें आहे. यापासून उत्तम फळ पुढें होईल. ...... धर्मामध्ये अध्रमाची भेसळ झाली आहे, त्यास लोक अधर्म म्हणतात. ते मात्र ज्ञानचक्षू आल्यावर जाईल. वर्ण जे आहेत ते स्वाभाविक सृष्टींत आहेत. म्हणजे कोणतेही देशांत वर्ण नाहींत असे नाही. वर्ण म्हणजे इतकेंच की, चार प्रकारचे व्यापार. ते स्रव देशांत नेहमी असावयाचेच. मात्र हल्लीं जो वर्णसंकर आहे म्हणजे वास्तविक ब्राह्मण नसतां ब्राह्मण म्हणवितात, शूद्र असतां ब्राह्मण म्हणवितातव ब्राह्मण नसतां ब्राह्मण म्हणत नाहीत. हा वर्णसंकर मात्र जाईल आणि व्यवस्थित होईल....... लोक शहाणे जाले म्हणजे इंग्रजांस म्हणतील कीं, तुम्हांसारखेच आम्ही शहाणे आहों. मग आम्हांस अधिकार कां नसावे? मग हिंदू लोकांचे असे बहुमत पडले म्हणजे सरकारास देणं अगत्य आहे. इकडील लोक राज्याचा करभार चांगला करूं लागले, लांच कावयाचें सोडून दिलें म्हणजे मोठाली कामें गर्व्हनरराचीं सुद्धां त्यांचे हातीं येतील. आणि आपले लोक पार्लमेंट व स्वराज्य भोगतील – वगैरे असे होईल यांस संशय नाहीं.’
अर्थातच लोकहितवादींना ज्या प्रकारे इंग्रज हे मुळात चांगले आहेत आणि भारत देशाचे भले करण्याकरिता आले आहेत असे वाटत होते आण त्यांच्या चांगुलपणावर समाजसुधारकांचा विश्वास होता. त्यामुळे आपले लोक शहाणे झाले की इंग्रज आपणहून स्वातंत्र्य देतील असे त्यांना वाटत होते. ते मात्र खरे नव्हते. इंग्रज केवळ भारतीय समाजाला शहाणे करण्याकरता आले नसून राज्य करण्याकरता आले होते. भारतीयांनी इंग्रजांनी आणलेले नवीन विषय शिकल्यामुळे स्वातंत्र्य मिळाले नसले तरी शिकल्याचा, नवीन यंत्र, तंत्रज्ञान समजून घेतल्याचा भारतीय लोकांना उपयोग झाला हे निश्चित.
विद्येसाठी ग्रंथ आवश्यक
इंग्रजी राजवटी बरोबर आलेली नवीन विद्या उपयोगी आहे आणि ती सगळयांनी मिळवली पाहिजे हे सांगताना ती विदया कशी मिळवावी याबद्दलही लोकहितवादींनी विचार मांडले आहेत. हिंदुस्थानात पूर्वी भूर्जपत्रावर म्हणजे झाडांच्या वाळलेल्या पानांवर ग्रंथ हाताने लिहिले जात. राजाच्या, श्रीमंतांच्याकडे असे ग्रंथांची नकल करणारे म्हणजे ग्रंथांच्या भूर्जपत्रावर प्रती तयार करणारे लेखनिक कामाला असत. पण अर्थातच अशा किती प्रती तयार करणार ? त्यामुळे सगळया लोकांना ग्रंथ वाचता येत नसत. इंग्रजांनी छापाईची यंत्रे येथे आणली आणि भारतात छापखाने चालू झाले. यंत्रांवर छापल्यामुळे पाहिजे तेवढे ग्रंथ छापता येऊ लागले. आणि छापील ग्रंथ किंवा छापलेली पुस्तके हा विद्या मिळवण्याचा मार्ग झाला. आपण वर पाहिलेच की ग्रंथालय सुरू करणे ही त्याकाळी अगदी नवीन कल्पना होती. पण छापील पुस्तके विकत घ्यावी लागत. ते पैसे वाया गेले असे काही लोकांना वाटत असे त्यामुळे ग्रंथ खरेदी, लायब्ररी याचे लोकांना फारसे महत्त्व वाटत नव्हते.
म्हणून लोकहितवादी माहीत होते की खरे तर देशी भाषांतून नवीन ग्रंथ तयार करवून घेऊन ते शाळांतून शिकवावे व मोठ्या लोकांनी वाचावे. त्यांच्या पिढीचे मोठे लोक संसारात पडून पोट भरण्याच्या मार्गाला आधीच लागलेले आहेत. ते यापुढे काही तरी शिकतील अशी फारशी आशा नाही. तरुण पिढीच्या हातूनच काही झाले तर होईल अशी आमची आशा आहे. आपल्या 93व्या पत्रात ते म्हणतात की, ‘विद्याभ्यास जो करविणें तो चांगली समजूत पटेल ,लोक विचार करणारे होतील अशा प्रकारचे त्यास पंतोजी व शाळा पाहिजेत. जी भाषा व जे ग्रंथ प्रथम मुलांचे हातीं पडतात व ज्या मनुष्यची संगत त्यांस असते तशी त्यांची समजूत होते. यास्तव मुलांस ग्रंथ वाचावयास द्यावयाचे ते प्रथम चांगले पाहिजेत. त्यांस सुबुद्धी होऊन त्याची समजूत चांगली पटावी व त्यांनी बहुत वाचण्यावर लक्ष द्यावें. व त्यांच्या मनांत जुन्या ज्या समजुती येतात त्या सर्व लबाड आहेत असे त्यास भासले पाहिजे. व त्यांस ग्रंथांची गोडी लागून ग्रंथ वाचावे असे त्यांस वाटले पाहिजे. ग्रंथ करणारास आजकाल या देशांत खप नाही. ग्रंथ करून त्यांस विकत घेणार मिळविणे म्हणजे मोठा प्रयत्न पडतो. जुलमानें व बळानें ते लोकांचे गळीं बांधावे लागतात. त्याजबद्दल किंमते देणे म्हणजे लोकांस असे वाटते की हा पैसा व्यर्थ आहे. यात पुण्य नाहीं व धर्म नाहीं. याप्रमाणे हे लोक दुर्भाग्य आहे. यांचा काळ विपरीत म्हणून अशी बुद्धी झाली हे तर उघड आहे. परंतु लोक असें समजतील तर बरें. या देशांत ग्रंथ छापणारास पैसा द्यावा हे उत्तम आहे, हाच धर्म आहे. हें मूर्खांस शहाणे करण्याचें काम हाच श्रेष्ठ धर्म आहे. असे झाल्यावांचून लोक सुधारणार नाहीत.’
ग्रंथ हेच गुरू
ग्रंथ लिहिणे हे लोकहितवादी विद्वत्तापूर्ण काम समजतात. कारण त्यांच्या समोर युरोपियन देशात काय घडत आहे ते होते. बेकन, गॅलिलिओ, देकार्त, कोपरनिकस, केप्लर यांना अर्वाचीन युरोपचे जनक असे म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेलच. ह्या सगळ्यांनी पुस्तके लिहिली. खूप निरीक्षण करून, संघोधन करून त्यांनी भोवतीची भौतिक सृष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातून हाती लागलेले सिद्धांत पुस्तकांच्या रूपाने जगासमोर ठेवले. ‘छापण्याची कला’ या पत्रात लोकहितवादी म्हणतात, ‘वृत्तपत्रे म्हणजे बृहत्तर जिव्हा असे समजले पाहिजे. (वर्तमानपत्रे म्हणजे मोठी जीभ असे समजले पाहिजे . कारण एक जण आपल्या छोटया जीभेने जेवढे बोलेल आणि जितक्यांना ते ऐकू जाईल त्याच्यापेक्षा वर्तमानपत्रामुळे जास्त लोकांपर्यत आवाज पोहोचेल. म्हणून वर्तमानपत्र म्हणजे मोठी जीभ आहे, असे त्यांना वाटते.) याचा उपयोग इंग्रज लोक जसा करितात तसा आपले लोक करून शहाणपणा वाढवतील तर फार चांगले होईल. आणि हा समय आला आहे की, आता आपले मनातील गोष्ट उघडपणीं व निर्भयपणाने सांगतां व कळवतां येते. असे पूर्वी नव्हते.’ लोकहितवादींचे हे विचार आज आपण ज्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणतो तेच आहेत. मुद्रणकला आणि वर्तमानपत्र यामुळे एक प्रकारचे निर्भीड लेखन सुरू झाले त्याचे महत्त्व लोकहितवादींना समजले होते.
मुद्रण, वर्तमानपत्र तसेच उत्तम ग्रंथ यामाध्यमातून समाजसुधारणा घडवून आणता येईल हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यासाठीच ते इंग्रज विद्वानांचा आणि त्यांच्या ग्रंथांचा गौरव करतात. ‘त्यांची योग्यता अशी आहे की, त्यांस कोणताही विषय सांगा, त्या दिवशीं तो ग्रंथ लिहूं शकतील. कोणत्याही विषयावर बोलू शकतील. जे जे या पृथ्वीत आणि आकाशांत आहे ते सर्व त्यांस ठाकठीक दिसतें आणि चंद्र फिरतो याचें त्यास आश्चर्य वाटत नाही. दगड वरती उडविला म्हणजे खाली पडतो याचें देखील कारण त्यास माहीत आहे. तात्पर्य त्यास कोणत्याही विषयी आश्चर्य वाटत नाही.’ लोकहितवादींची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि तारतम्याने समजून घेण्याची वृत्ती या पत्रातून तुमच्या लक्षात आली का ? त्याकाळात भारतीयांना सृष्टीत जे घडते ते चमत्कार वाटत असत. ईश्वराची करणी वाटत असे. पण पाश्चात्त्य जगात विज्ञानाची प्रगती झाली होती. आणि अशा वैज्ञानिक विषयांवर पुस्तके लिहून ते ज्ञान त्यांनी सगळयांपर्यंत पोहोचवले होते याचे लोकहितवादींना विशेष कौतुक वाटते असले तर त्यात नवल ते काय ?
==सुधारणा करणार कोण ? भारतीय समाज सुधारायची गरज होती हे नक्की. धर्म, नीती, राज्यशासन या सर्वात सुधारणा करायला हवी होती. पण मुख्य प्रश्न होता की ह्या सुधारणा करणार कोण ? त्यासाठी कोण पुढाकार घेणार ? आणि देशभर त्याची अंमलबजावणी कोण करणार ? विद्येचे महत्त्व तर समजले पण समाजात त्यासाठी बदल कोण करणार ? जातींमध्ये, स्त्री-पुरुषांमधे समानता असली पाहिजे, ती कशी येणार ? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर समाजसुधारकांना दिसत होते ते म्हणजे ते म्हणजे इंग्रज शासन. इंग्रज केवळ धर्मावर भिस्त न ठेवता बुद्धिवर विश्वास ठेवतात. ते अधिक कर्तबगार आणि प्रामाणिक आहेत असे समाजसुधारकांना वाटत होते. इंग्रज हे खरेतर युरोपातून म्हणजेच बाहेरून आलेले. त्यांचे राज्य म्हणजे परक्यांचे राज्या होते. पण तरीसुद्धा आपल्या समाजाची सध्याची दुरवस्था, निर्नायकी अवस्था या सगळयात आपल्या समाजाला योग्य त्या मार्गाला लावण्याची क्षमता फक्त इंग्रज लोकांच्यात आहे असे मत लोकहितवादींनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळया पत्रांमधून मांडले आहे.
ह्या प्रकारची समाजसुधारकांची मते आज आपल्याला विचित्र आणि चुकीची वाटतात. परक्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे पारतंत्र्यात राहण्यासारखे आहे असे आपल्याला सहजच वाटते पण लोकहितवादींनी आधीच्या राज्याशी तुलना करत, इंग्रजांचे राज्य कसे जास्त चांगले आहे त्याची मांडणी केली आहे. त्या काळात पुष्कळ शास्त्री-पंडित आणि मराठा सरदार यांच्या काळात समाजात दुर्व्यवहार, असंतोष, अन्याय होत होता. जुलूम होत होता. देशात सुधारणा नव्हती. नवीन विद्या, संशोधन याला वाव नव्हता. अनेक लोक स्वतःच्या राज्यातच लूट करत होते. आधीच्या राजांनी, सरदारांनी परमुलखांत लूटपाट केली, जाळपोळ केली त्यापेक्षा इंग्रज बरे असे त्यांना वाटते. राज्य करणारेच लुटारूंची टोळी बाळगून आपल्याच रयतेला लुटर होते. त्या लुटारूंचा इंग्रजांनी बंदोबस्त केला. सती सारख्या अन्यायकारक चाली इंग्रजांनी बंद केल्या. यामुळे लोकहितवादींना इंग्रजांचे राज्य अधिक बरे आहे असे वाटत होते. आपल्या १२ व्या पत्रात ते त्याविषयी लिहितात, ‘तेव्हा इंग्रजांचा अंमल हा हंगाम बरा आहे. पेशव्यांचे राज्यांत कोणी कांही सुख भोगिलें. परंतु विचार केला नाही, खाल्ले मात्र, शेवटीं दुसऱ्याने तोंडांत मारून नेले, तेव्हा डोळे उघडले. तस्मात् इंग्रजांचे अमलाचा परिणाम चांगला, पण लोक शहाणे होण्यास खुशी नाहीत. ...... बाजीरावांचे मूर्तिमंत राज्य डोळयांपुढे उभे राहतें. मामलेदार मक्ते चठ करून रयत लुटतात. जमा येते ती रांडा, गोंधळी, भट, आर्जवी, ढोंगी वगैरे खाऊन जातात. हेंच बाजीरावाने केलें व अद्याप मराठी राज्यात हेंच आहे. उजाडले किंवा मावळले, यांची त्यांस खबर नसते. फक्त जनावराप्रमाणे खाणे, निजणे एवढयापुरती काळजी.’
अशी अवस्था त्यांना दिसत होती म्हणून ते लोकांना विनवणी करतात, ‘हिंदू लोकांनी याचा विचार पाहावा. या साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदू लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या. व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांचीं मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हें ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलांस हुशार होण्यास दहावीस वर्षे लागतात, मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशें चारशें वर्षे लागतील.’ अर्थात लोकहितवादींचे हे सगळेच तर्क योग्य होते असे नाही. इंग्रज सर्व बाबतीत आपल्यासाठी अनुकूल किंवा फायद्याचे होते असे खरे तर नव्हतेच. पण त्यावेळी परिस्थिती पाहता आपल्या समाजामधे कोणाकडे योग्य नेतृत्व नव्हते आणि इंग्रजांची आधुनिक विचारसरणी आणि विज्ञान वृत्ती ही आपल्या समाजात नव्हती. त्यामुळे समाजात बदल घडवायचा असेल तर पूर्ण वेगळया विचारांची माणसे हवीत असे लोकहितवादींना वाटले यात नवल नाही.
संदर्भ
- लोकहितवादी, लेखक - ग.ह. केळकर, प्रकाशक - मा.रा.जोशी, १९३७
- लोकहितवादींची शतपत्रे - लेखक- डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, प्रकाशक -कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७७