शतक (कविता)
'शतक' ही कवी वसंत आबाजी डहाके यांची (विसावे शतक संपताना लिहिलेली कविता) 'चित्रलिपी' या कविता संग्रहात आहे. या कवितेत एकूण सात कडवी आहेत. 'कवीचे स्वगत आणि शतकाची अखेर' या समीक्षण लेखात कवितेचे समीक्षण करताना प्रा. देवानंद सोनटक्के म्हणतात 'शतक कविता वाचली की अंगावर काटा येतो. कारण एक क्षण, एक दिवस किंवा काही वर्षे – यांबद्दल कुणाची तक्रार असू शकते. पुन्हा सुखाचे दिवस येणारच असतात. तेवढ्यापुरती ती तक्रार असते. सामान्य माणूस तो क्षण जागून पुढे जात असतो. येथे `या शतकाची अखेर आता जवळ आली आहे ` ही पहिलीच ओळ वाचून वाचक हादरतो. मिलेनियम सेलिब्रेशन केलेल्या पिढीला तर ते खटकतेच. कवी इथे तत्त्ववेत्ता म्हणून बोलत आहे. कवीला अशी दार्शनिक विधाने करायला विश्वव्यापक अनुभूती पाहिजे. आपल्या निष्कर्षाबद्दल खात्री पाहिजे. मुख्य म्हणजे पुढेही तो त्या विधानावर ठाम राहिला पाहिजे.'[१]
काव्यानुभूती
या आधी कवी नारायण सुर्वे यांनीही `दोस्तहो तर या शतकाची सुरू होत आहे संध्याकाळ ` असे म्हणले होते. अशा कवीजवळ एक युटोपिया असतो. जाहीरनामा असतो. तो पढिक नसतो. अनुभूतीयुक्त असतो. मूल्यनिष्ठा आणि मानवतावाद कवीच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेला असतो.कवी वसंत आबाजी डहाके हे असेच मानवतावादी कवी आहेत. `चित्रलिपी` मध्ये त्याचे दर्शन जागोजागी होते.
पहिले कडवे
या शतकाची अखेर आता जवळ आली आहे काही मास काही दिवस, काही सूर्याचं उगवणं मावळणं
बाकी राहिलेलं आहे. आणखी काहीही नाही. पुढच्या शतकात सूर्य असाच उगवेल, मावळेल? पहिले कडवे कवीची हताश भावना आहे ? की निष्कर्ष ? की कालनिर्णयपर सत्य ? कवीला केवळ याच नव्हे तर पुढील शतकातही हा सूर्य (मानवी मूल्ये) उगवेल याची खात्री नाही. कारण माणसं `सहनिवासात` राहत नाहीत इमारतीत राहतात. एकमेकांना ओळखत नाहीत. ती नुसती स्वार्थी, आत्मकेंद्रित नाही तर संवेदनाहीन आणि खुनशी झाली आहेत- असा कवीचा अनुभव आहे. याच कविता संग्रहातील दुसऱ्या एका कवितेत कवी म्हणतो:
` माणसांचं प्रेतासारखं वावरणं बघून नजर अंधूक होते, बाकी काही नाही. हे एक मुकं जनावर रस्त्यातच कोणत्यातरी विचारसरणीला बळी पडून देह ठेवून गेलं वेगवेगळया रंगांच्या झेंड्या लहरत आहेत जाळलेल्या घरांच्या अवशेषावर (काही नाहीच गाणं) .
मानवी असंवेदनशीलता, क्रूरता कवीला अस्वस्थ करते. हे वाचले की, कवीने केलेली शतकाच्या शेवटाची घोषणा यथार्थ वाटू लागते.
चौथ कडव
चौथ्या कडव्यात महानगरी जीवनात होण्याऱ्या घुसमटीची जाणीव व्यक्त होते. त्यासाठी डहाक्यांनी, ` शहर म्हणजे हजार पायांचा कीटक, आणि माणूस म्हणजे जगण्याच्या तापाने फणफणलेलं मन `, अशा समर्पक पण नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरल्या आहेत. अशा घुसमटीत सामान्य माणसाचा स्वाभिमान फणा ठेचलेल्या सापासारखा होतो. मग तो भोवतालच्या नको असलेल्या, न पटणाऱ्या, गोष्टीनाही वरवरचा होकार देत राहतो. आतून मात्र त्याचा नकार तो घुमवत राहतो. तो त्याच्या देहबोलीतून बाहेर पडतोच. `मी नकार घुमवत राहतो उघडलेल्या तळहातात आणि बोटांत` ` या ओळीत या मानसिक अवस्थेचे शारीरिक प्रकटीकरण आहे. हा डहाक्यांचा नायक जनतेचा प्रतिनिधी आहे; नव्हे ते कवीचेच एक रूप आहे.
माध्यान्हीच्या सूर्यानं डोळे होरपळले
आणि दिसेनासं झालं, असं म्हणता येणार नाही. हजार पायाच्या किटकाप्रमाणे शहर चालून येत असतं; जगण्याच्या तापानं फणफणलेलं मन फणा ठेचलेल्या सापासारखं थोडं कळवळतं, तिथल्या तिथं तळमळतं.
कवी नुसता एक माणूस नसतो, त्याची संवेदनशीलता, त्याच्याजवळ असलेली भाषिक क्षमता त्याला प्रतिभावंताचा दर्जा देत असते. प्रतिभावंताची जबाबदारी मोठी असते. त्याने अखिल जगाच्या वेदना समजून नुसत्या दर्शवायच्या नसतात- नाहीतर काव्य ही एक नुसती दृश्यकला झाली असती- तर त्यावर आपापल्या परीने उपाय सुचवायचा असतो ; म्हणजे साहित्याला सामाजिक प्रयोजनही असते. म्हणूनच असा उपाय सुचवताना मुक्तिबोध- सुर्वे क्रांतीची भाषा बोलतात. इथे डहाके मात्र मर्ढेकरांप्रमाणे हताशपणाची जाणीव व्यक्त करतात. परिवर्तन होत नसेल तर शतकाच संपणारच !
शतक मावळल्यानंतर येणाऱ्या दिवसांनाही आपण काही देऊ शकत नाही याची खंत मात्र कवी व्यक्त करतो. खरे तर शतकभरातील मानवी संस्कृतीने, परंपरेने नव्या पिढीला किमान जगण्याचा, लढण्याचा, मूल्यांचा समृद्ध वारसा द्यायचा असतो. हेच तर सांस्कृतिक संचित असते. पण या शतकात असे काही नाही. येणाऱ्या पिढीला देण्यासाठी आधीच्या पिढीजवळ काही सांकृतिक संचित नसणं ही भयानक गोष्ट असते. एका शतकाच्या वाटचालीनंतरही मानवी संस्कृतीला हे संचित प्राप्त करता आले नसेल तर याहून शोकांतिका कोणती? ही मानवी शोकांतिका, हा सांस्कृतिक संचिताचा अभाव कवीला अस्वस्थ करतो.
कवितेची संहिता
कवितेची संहिता म्हणजे केवळ ओळी नसतात. तिच्यात एक आंतरसंहिता असते. ते कवितेचे संचित असते. कवी ते समाजजीवनातूनच प्राप्त करतो; पण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कवी -प्रतिभावंताची असते. एक कवी- प्रतिभावंत म्हणून या शतकात आपण ती पेलू शकलो नाही, याची खंत कवी जेव्हा व्यक्त करतो; तेव्हा कवितालेखन हा छंद नसून ती एक सांस्कृतिक घटना असते, याचे भान डहाक्यांना आहे हे दिसते. इथे कवितेची आंतरसंहिता सांस्कृतिक भाष्याचे रूप धारण करते. कवी म्हणतो:
दिवसाच्या सगळ्या अस्वस्थ क्षणांनो; माझ्या हातात यातनांच्या शिवाय दुसरं काही नाही.
शतक संपल्यानंतर तरी यातना, हा आकांत संपेल असेही नाही. लोक पुन्हा नव्या शतकासाठी वाट पाहतील, पुन्हा मग नव्या पिढीचा अशाच यांतनाच्या दिशेने प्रवास होईल, असे कवीला वाटते. अर्थात सारेच नकारात्मक नाही. कवीला एक आशा आहे की नव्या शतकातही नाहीची ओझी वाहणारे लोक आपल्याप्रमाणेच किमान नाही म्हणतील. जगण्याच्या प्रचंड संघर्षात किमान नकाराचा अधिकार पुढील पिढी वापरेल हा आशावाद कवी शेवटी व्यक्त करतो.
कवितेतील प्रतिमा
सात कडव्यांच्या कवितेत प्रत्येक कडवे नव्या प्रतिमा प्रकट करते. पहिल्या कडव्यात सूर्य ही प्रतिमा उगवणे आणि मावळणे अशी कालवाचक आहे. हीच सूर्य प्रतिमा दुसऱ्या कडव्यात मूल्यानिष्ठ आहे. तर तिसऱ्या कडव्यातील माध्यान्हीचा सूर्य ही प्रतिमा मूल्यभ्रमाची निदर्शक आहे.
कीटक आणि साप यांच्यात साप वरचढ; पण ते हजार पायांचे, संघटित आक्रमक तर साप फणा ठेचलेला. महानगरी जाणीव व्यक्त करणारी, महानगरी गती, धावपळ, हव्यास, हिंसा यांसाठी वापरलेली ही प्रतिमा अप्रतिम आहे.
दिवस, रात्र, पहाट, संध्याकाळ आणि क्षण या प्रतिमा कालनिदर्शक आहेत; तर ओझी वाहणारे , गाड्या ओढणारे ही प्रतिमा कष्टकऱ्यांसाठी वापरली आहे. कवी मध्यमवर्गीय आहे, तर कष्टकरी निम्नवर्गीय . कवी हताश, पण कष्टकरी आशावादी आहेत. नव्या शतकात कवीला त्यांच्याबद्दल आशा आहे. ते कवीचा युटोपिया पूर्ण करतील. नेहरू गेल्यानंतर येणाऱ्या अंधारया युगासाठी सुर्व्यानी नाही का कष्टकरी हातगाडीवाल्याचाच हाती कंदील दिला होता !
संहितेचे रूप
संपूर्ण कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे. कवी नायकाच्या भूमिकेतून ते व्यक्त करतोय. इथे शेक्सपिअर किंवा कुसुमाग्रजांच्या शोकान्तिकांतील स्वगताची आठवण होते. कवितेचा सूर पाहता जीएंच्या कथांमधील मुक्तकाव्याचीही आठवण होते. आणि हो बारकाईने पहा संपूर्ण कविता रंगभूमीचे दृश्य डोळ्यांसमोर उभे करते. नायक रंगमंचावरून प्रेक्षकांना जणू संबोधून स्वगत व्यक्त करतोय. म्हणजे या कवितेत नुसता आत्माविष्कार नाही तर नाट्याविष्कारही आहे. मराठी कवितेत ही दृश्यात्मकता कोलटकर, चित्रे, सुर्वे यांच्या कवितेत दिसते. तीच इथेही आहे.कवी वसंत आबाजी डहाके हे त्याच परंपरेतील महत्त्वाचे कवी आहेत.