शंकर शाह
शंकर शहा या क्रांतिकारकांचे नाव मध्यप्रदेशातील जबलपूरच्या क्षेत्रात अतिशय आदराने घेतले जाते. यांनी आपल्या काळात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.
जन्म व बालपण
शंकर शहा यांचा जन्म सुप्रसिद्ध गोंड राजवंशातील गढामंडळाच्या राजघराण्यातील राजे नरहर शहा यांच्या घरी इ.स. १७७५ मध्ये झाला होता. धूर्त इंग्रजांनी राजे नरहर शहा यांचा पराभव केल्याने शंकर शहा लहानपणापसूनच जंगलात आश्रयाला होते. तेथील इतर आदिवासी बांधवांना संघटित करून इंग्रजांनी अन्यायाने घेतलेले आपले राज्य परत मिळवण्याचे मनोरथ शंकर शहा यांनी योजले होते.
कार्य
इ.स. १८१० मध्ये शंकर शहांना पुत्र झाला. त्याचे नाव रघुनाथ शहा ठेवण्यात आले. अत्यंय धाडसी, शूर आणि पितृभक्त असलेल्या रघुनाथ शहांना तरुण वयातच सैनिकी शिक्षण देण्यात आले. शंकर शहांनी एक धाडसी योजना आखून रघुनाथ शहाला इंग्रजांच्या जबलपूर येथील ५२ व्या नेटिव्ह रेजिमेंटमध्ये गुप्तपणे भरती केले. तेथे राहून रघूनाथ शहा आपल्या वडिलांना गुप्त माहिती देत असे. त्या महितीच्या आधारे शंकर शहा इंग्रजे सेनेवर गनिमी काव्याने हल्ले करून इंग्रजांना सळो की पळो करायचे. जबलपूरचा रेसिडेंट मॅक ग्रेगर याचा शंकर शहा यांनी वध केला.
अटक व मृत्यू
इंग्रज शंकर शहा व रघुनाथ शहा यांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर शंकर शहाच्या नातलगाने इंग्रजांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी पडून शहा पिता-पुत्रास पकडून दिले. १८ सप्टेंबर १८५७ रोजी शंकर शहा व रघुनाथ शहा या दोघांनाही एकदमच तोफेच्या तोंडी दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी झालेल्या पिता-पुत्रांनी एकाच वेळी बलिदान दिल्याचे हे एकमेव उदाहरण आहे.