Jump to content

शंकर वासुदेव किर्लोस्कर

शंकर वासुदेव किर्लोस्कर

शंकर वासुदेव किर्लोस्कर (८ ऑक्टोबर, इ.स. १८९१; सोलापूर[] - इ.स. १९७५) ऊर्फ ’शंवाकि’ हे मराठी संपादक, लेखक व व्यंगचित्रकार होते. ते किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक होते[]. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे यांचे चुलते होत.

जीवन

शंकरराव किर्लोस्करांचा जन्म ८ ऑक्टोबर, इ.स. १८९१ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव किर्लोस्कर सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. किर्लोस्कर कुटुंबीयांचे स्नेही असणाऱ्या चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे लहानग्या शंकरासही चित्रकलेची गोडी लागली. पुढे त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात दाखला घेतला. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी लाहोरास श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना मुंबईच्या सर जे.जे. कलाविद्यालयात वरच्या वर्गात प्रवेशही मिळाला[].

शिक्षणानंतर ते किर्लोस्करवाडीस आले. तेथे त्यांचे चुलते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातीची सूत्रे ते सांभाळू लागले. उद्योजकांचा वारसा लाभलेल्या किर्लोस्कर या घराण्यात जन्माला येऊन उद्योगाबरोबर साहित्याचा वारसाही तेवढ्याच जोमाने सांभाळणाऱ्या शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी विक्रीशास्त्राची पदवी घेतल्यावर आपल्या कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने इ.स. १९२० साली त्यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. इ.स. १९२९ साली विनायक दामोदर सावरकरांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले[]

पुढे किर्लोस्कर मासिकाच्या 'स्त्री', ‘ मनोहर’ या भावंडांचाही जन्म झाला. त्याचे संपादकही शं.वा.च होते. या मासिकांनी रूढी परंपरा, यांवर यांनी चढवले. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना एक विशेष प्रतिष्ठा लाभली, ती शं वा.कि.मुळेच. या मासिकांच्या निमित्ताने किर्लोस्करांच्या हातून फार मोठी साहित्यसेवा हातून झाली. साहित्याबरोबर औद्योगिक क्षेत्रावरही त्यांनी आपला ठसा उमटवला. किर्लोस्कर समूहात विक्री आणि कार्यालयीन व्यवस्थापक आणि प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेतही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे ‘ यांत्रिक यात्रा’ हे पुस्तक खूप गाजले.

शं.वा. किर्लोस्करांच्या शंवाकिनी या नावाच्या आत्मकथनातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन स्पष्ट होते.

शं.वा. किंची चित्रकला हा एक त्यांच्या ग्रंथ लेखनाप्रमाणे स्वतंत्र विषय. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी चित्रकलेचा अभ्यास केला होता. त्यांच्या चित्रांचे ‘टाकाच्या फेकी’ हे एक गाजलेले पुस्तक आहे.

शं.वा. किर्लोस्कर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आत्मप्रभाव
  • टाकांच्या फेकी
  • यशस्वी धंद्याचा मार्ग
  • यात्रिकाची यात्रा
  • व्यापाराचे व्याकरण
  • शंवाकीय (आत्मचरित्र)

संदर्भ

  1. ^ a b c d राजाध्यक्ष,मं.गो. "शंवाकिचे किर्लोस्कर[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)