Jump to content

शंकर पळशीकर

शंकर बळवंत पळशीकर (जन्म : १७ मे, इ.स. १९१७; निधन : मुंबई, इ.स. १९८४) ) हे एक मराठी चित्रकार होते. त्यांचा जन्म साकोली जिल्ह्यातील भंडारा या लहान गावात झाला. १९४२ ते १९४७ ही पाच वर्षे त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले. पाचही वर्षं वर्गात प्रथम, आल्यामुळे त्यांना मेयो मेडल हे महाविद्यालयातील सर्वोच्च पारितोषिक मिळाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्याच संस्थेत कलाशिक्षक झाले.

पळशीकरांनी व्यक्तिचित्रण कलेला अभिव्यक्तीचा दर्जा दिला आणि मॉडेलचे केवळ हुबेहूब चित्रण करण्यापेक्षा व्यक्तिचित्रणातूनच स्वतःकडे, स्वतःच्या शैलीकडे आणि सोबत अभिव्यक्तीकडे येण्यासाठी लागणारे धाडस आणि दृष्टी असावी असे शिकवले.

सहा वर्ष संस्थेचे डीन पदावर राहून एकूण तेहतीस वर्षांच्या शासकीय सेवेनंतर पळशीकर इ.स. १९७५ साली निवृत्त झाले.

पळशीकरांची मिस के', 'सुलभा आनंदकर', 'गायकवाड', 'पौल कोळी' आणि 'कोलते' ह्या जे.जे.शीच निगडित असणाऱ्या व्यक्तींची चित्रणे बेमिसाल अभिव्यक्तीची उदाहरणे ठरली. त्या व्यतिरिक्त त्यांनी केलेली लोकमान्य टिळक, विष्णूदास भावे, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू इत्यादी अनेक महान व्यक्तींची चित्रणे ही व्यावसायिक कामे असूनही त्यांत पळशीकरांची अभिव्यक्ती जाणवते.

शंकर पळशीकरांची चित्रे १९५२ साली निघालेल्या 'Dancers with Snake' या, आणि १९७२ साली निघालेल्या 'Colour and Sound' या पुस्तकात समाविष्ट होती.

१९८४मधे पळशीकरांचे निधन झाल्यावर मुंबईच्या जहांगीर कलादालनात त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच कलाकृतींचे एक मोठे प्रदर्शन भरवण्यात आले.

शिष्यवृंद

शंकर पळशीकरांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले. वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते हे त्यांपैकी काही.

शंकर पळशीकरांना मिळालेले सन्मान

  • मेयो मेडल
  • भारत शासनाची चित्रकाराला मिळालेली सर्वात पहिली प्रवासी सांस्कृतिक शिष्यवृत्ती
  • बॉम्बे आर्ट सोसायटीची दोनवेळा रौप्य आणि एकदा सुवर्णपदक
  • कलकत्ता आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक