शंकर आबाजी भिसे
डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; - ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हणले जाते. [१]
शिक्षण आणि सुरुवातीची कारकीर्द
शंकररावांचे वडील धुळ्याला मॅजिस्ट्रेट होते. तिथल्या शाळेत शंकररावांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुलाची यंत्राची आवड पाहून वडिलांना फार आनंद होत असे. त्यामुळे उत्तेजनार्थ त्यांनी शंकररावांना महिना ३० रुपये पगारावर अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून चिकटवले.[ संदर्भ हवा ]
संशोधन आणि आविष्कार
त्याच सुमाराला म्हणजे साधारण १८९७मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती.
पुढील आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावले आणि त्यांतील ४०हून अधिक आविष्कारांची पेटंटे घतली.
१९०० साली मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे ते अध्यक्ष होते. त्या काली प्रचलित असलेल्या लायनो, मोनो, स्ट्रिंजरटाइप, विक्स आणि त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून शंकरराव भिसे यांनी ’भिसोटाईप’ हे छापण्यासाठीचे खिळे पाडण्यासाठी आणि नंतर ते जुळवण्यासाठीचे यंत्र शोधले आणि त्याचे पहिले तात्पुरते पेटंट इंग्लंडमध्ये, २ डिसेंबर १९०१ रोजी घेतले. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही ’भिसोटाइप’ची पेटंटे घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसठी त्यांनी रतन टाटा यांच्या भागीदारीत ’टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट’ या कंपनीची लंडन येथे स्थापना केली, पण १९१५साली ही कंपनी बंद पडली. . १९१६साली भिसे अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार ’आयडियल टाईप कास्टर’ या यंत्राचा आविष्कार केला, व अमेरिकेत त्याचे पेटंट घेतले. १९२० साली त्यांनी 'अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन'ची स्थापना करून १९२१साली पहिले यंत्र विक्रीस आणले. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्रांचे आराखडे, डॉ. भिसे यांनी बनविले. त्यांच्या टाईप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या तत्कालीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. १९२७ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.
भिसे यांनी काचेचा कारखाना काढला. १८९० मध्ये उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी काढली. भिसे यांनी सामाजिक कार्यदेखील केले. धी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. दादाभाई नौरोजींच्या साहाय्याने भिसे यांनी १९०१ साली ‘पेटंट सिंडिकेट’ नावाची कंपनी काढली.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
१९१०मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेले एक भारतीय औषध त्यांना फार गुणकारी वाटले. त्या औषधाचे त्यांनी रासायनिक पृथक्करण करून घेतले. त्यात आयोडीन असल्याचे कळताच भिसे यांनी १९१४साली एक नवीनच औषध तयार करून त्याला ’बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले. अमेरिकेच्या लष्कराने या औषधाचा पहिल्या महायुद्धात पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेले पण पोटात घेता येण्यासारखे एक औषध भिसे यांनी बनवले. आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यू यॉर्क येथे कंपनी स्थापन केली. १९२७मध्ये या औषधाच्या उत्पादनाचे आणि वितरणाचे हक्क भिसे यांनी शेफलीन या कंपनीला विकले. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ’ॲटोमिडीन’ (ॲटॉमिक आयोडीन) हे नाव दिले होते. हे औषध बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे.
भिसे यांनी आविष्कार केलेली यंत्रे
- मुंबई उपनगरीय रेल्वेत गर्दीमुळे अपघात होतात. डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी २०१६साली केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही. मुंबईतील प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले व त्यास बक्षीस मिळाले. आज आपल्याला जे हवे आहे ते डॉ. भिसे यांनी १८९८ मध्येच निर्माण केले.
- स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र. स्पर्धेसाठी बनविलेले यंत्र. यासाठी त्यांना पहिले बक्षिस मिळाले.
- स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र - त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आधीच कळणार होते. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरण्यास नकार दिला.
- आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘इंडिकेटर’ बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्माते डॉ. भिसे आहेत.
- भिसे मुद्रण यंत्र - हे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचे पहिले ’गुणित मातृका’ नावाचे मॉडेल मिनिटाला १२०० अक्षरे छापी. हे यंत्र १९१६मध्ये विक्रीला आले.
- मिनिटाला २४०० टाईप(खिळे) पाडणारे आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवले होते.
- त्यांनी पगड्या तयार करण्याचे यंत्र बनवले. पिठाच्या चक्क्या बनवल्या. सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र, १९०६ साली तारेने दूरवर फोटो पाठविण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली.
- डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत.
- सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले.
- समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा.
- वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र.
- एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विजेच्या साहाय्याने छायाचित्रे पाठविणारे यंत्र.
- धुण्यासाठी ' रोला ' नावाचा रासायनिक पदार्थ.
- जखमांवर लावण्यासाठी ’बेसलीन’ आणि पाण्यात विरघळणारे पोटात घेण्यासाठी ’ॲटोमिडीन’ (आण्विक आयोडीन) - या आविष्काराने भिसे यांना जगभर कीर्ती मिळवून दिली.
- बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले.
एडिसन
भिसे हे खऱ्या अर्थाने आपले ‘एडिसन’ होते, पण स्वातंत्र्यानंतर हा एडिसन उपेक्षित राहिला. भिसे यांचा सन्मान म्हणून त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढावे यासाठी दिलीप प्रभाकर गडकरी व पार्ल्याचे रघुनाथ पी. मेढेकर २०१० सालापासून प्रयत्न करीत आहेत. भिसे यांच्या संशोधन कार्याबाबत सर्व माहिती व पुरावे सादर करूनही त्यांचे पोस्टाचे तिकीट निघू शकले नाही व ही मागणी फेटाळण्यात आली.
गौरव
जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रंथात भारताचे एडिसन असे म्हणून शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आले आहे. खऱ्या थॉमस अल्व्हा एडिसननेही भिसे नामक भारतीय एडिसनची २३ डिसेंबर १९३० रोजी न्यू जर्सी येथे भेट घेतली होती. २९ एप्रिल १९२७ रोजी, म्हणजे भिसे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे १९०८ सालापासूनच अमेरिकन वृत्तपत्रे भिसे यांचा भारताचे एडिसन म्हणून उल्लेख करीत होती.
सन्मान आणि पुरस्कार
- मद्रास येथे भरलेल्या 'इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेस'चे अध्यक्षपद (इ.स. १९००).
- अमेरिकेत भारताचे एडिसन म्हणून वृत्तपत्र-प्रसिद्धी (इ.स. १९०८पासून).
- न्यू यॉर्क विद्यापीठाने शंकररावांना डी.एस्सी. ही पदवी दिली.(इ.स.१९२७).
- अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ’अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून गौरव (२९ एप्रिल १९२७).
- शिकागो विद्यापीठाची सायको-ॲनॅलिसिस या विषयाची डॉक्टरेट (इ.स.?)
- माउंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व बहाल केले. (इ.स.?)
- थॉमस अल्व्हा एडिसनची न्यू जर्सी येथे भेट (२३ डिसेंबर १९३०).
निधन
या मराठी शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.
चरित्र
शंकर आबाजी भिसे यांचे भालबा केळकर यांनी लिहिलेले चरित्र, निर्मल प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.
संदर्भ
बाह्य संदर्भ
- "Typography Of Devanagari"-लेखक बापूराव नाईक.(Volume Two -पाने ३७८, ३८१-८२).
वरील पुस्तकातील उतारा : The 'British Printer' in its 1908 issue reported : "Unlike any other casting or composing device on the market, the Bhisotype is the invention of an Indian gentleman and Professor S.A. Bhise, has thus set up a new record. Coming from India, with the admittedly highly skilled ingenuity of his race, it would appear that he is working on the original lines right through.
- "British and Colonial Printer" या नियतकालिकातील उतारा : "The Bisotype is an appliance that is conceived on entirely original lines and that has several novel and original features."
- "The Inland Printer"(August 1908)ने लिहिले आहे, "A surprise is about to be sprung up on the trade in the form of a new type-casting and composing machine, which even in its initial stage, seems to bid fair to prove a formidable competitor to the existing appliances".
- नामवंत शास्त्रज्ञ
- छपाई शास्त्रज्ञ Archived 2016-07-03 at the Wayback Machine.
- कथा शास्त्रज्ञांच्या (पुस्तक) लेखक : रा. शं. भागवत; प्रकाशक : मैत्रेय प्रकाशन t