व्होल्गा (लेखिका)
व्होल्गा तथा पोपुरी ललिताकुमारी या स्त्रीवादी तेलुगू साहित्यिक आहेत.
यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर असून त्यांनी येथून १९७२मध्ये एम. ए. (तेलुगू) पदवी मिळवली. १९७३ ते ८६पर्यंत त्यांनी तेनाली येथे अध्यापन केले. त्यांच्या वडिलांच्या उदारमतवादी विचारांच्या प्रभावाने त्यांना लहानपणीच स्त्रीवादाबद्दल माहिती होती.
त्यांनी आंध्रज्योती या तेलुगू वर्तमानपत्राच्या पुरवण्यांमध्ये अनेक स्त्रीवादी लेख लिहिले.
व्होल्गा यांची स्वेच्छा हीकादंबरी लोकप्रिय झाली. तिच्या पन्नास हजाराहून अधिक प्रती विकल्या गेल्या. नॅशनल बुक ट्रस्टद्वारा ती इंग्लिश तसेच अनेक भारतीय भाषांत अनुवादित करण्यात आली.
राजकीय कथालु या कथासंग्रहात स्त्रीने काय पहावे (डोळे), काय बोलावे (वाचा), काय घालावे, (नथनी), तिचा विवाह, तिने कुठे जावे-यावे (पाय, सुरक्षा, भिंती) या विषयांवरील कथा आहेत.
व्होल्गा यांची बालनाट्ये लोकप्रिय आहेत.
रामोजीराव यांच्या उषाकिरण मूव्हीजमध्ये त्या पटकथा विभागप्रमुख आहेत. व्होल्गा यांनी तोडू या चित्रपटासाठी कथा, पटकथा लिहून सहदिग्दर्शक म्हणून काम केले.
स्त्रीवादाचा परिचय करून देणाऱ्या तीन स्वतंत्र ग्रंथांसह दहा ग्रंथांचे व्होल्गा यांनी संपादन केले आहे त्यांचे गांधी चित्रपटाच्या तेलुगू अनुवादासह एकूण दहा ग्रंथ इंग्रजीतून तेलुगूत आणले.
स्त्री-विषयक कार्य
१९७५ हे साल जागतिक महिला वर्ष जाहीर झाल्यानंतर स्त्रीविषयक काम करणाऱ्या अनेक संस्था उदयाला आल्या. हैदराबादमधील वसंता कन्नाभिरान, सूझी थारो अशा काही समीक्षक, अभ्यासक लेखकांसह व्होल्गाही समाजकार्यात अग्रेसर होत्या. १९९१ मध्ये व्होल्गा, वसंता यासारख्या समविचारी स्त्रीवादी महिलांनी येथे 'अस्मिता' संस्था स्थापली.
साहित्य
- अमूल्यम् (कथासंग्रह, १९९५)
- अयोनी व इतर कथा (कथासंग्रह, १९९५)
- आकाशजलो संगम् (आकाशाचा अर्धा भाग, कादंबरी, १९९०)
- कन्निटी केरटला पेन्नाला (कादंबरी, १९९१)
- गांधी (मूळ इंग्रजी पटकथेचे तेलुगू भाषांतर)
- गुलबिलु (कादंबरी, २०००)
- थोडु (कथा, पटकथा)
- निली मेघालु (स्त्रीवादी कवितांचा संपादित संग्रह, १९९३)
- नुरेल्ला चलम् (समीक्षा ग्रंथ, १९९४)
- प्रयोगम (कथासंग्रह, १९९५)
- माकु गोडालु लेवु (आम्हाला भिंती नाहीत) या स्त्रीवादी साहित्याचा तत्त्वज्ञानाचे ५ खंड
- मानवी (कादंबरी, १९९८)
- राजकीय कथालु (कथासंग्रह, १९९३)
- वाळ्ळु आरुगुरू (१९९५) (त्या सहा, नाटक, १९९५) : सहा नायिका असलेले नाटक
- विमुक्ता(पारितोषिकप्राप्त कथासंग्रह)
- 'Womanscape (संपादित महिला चरित्रकोश, २००१)
- स्वेच्छा (कादंबरी, १९९४)
पुरस्कार
व्होल्गा यांना २०१५चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.