Jump to content

व्ही.के. कृष्ण मेनन

वेंगालील कृष्णन कृष्णमेनोन (मे ३, इ.स. १८९६- ऑक्टोबर ६, इ.स. १९७४) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९४७ ते इ.स. १९५२ या काळात भारताचे इंग्लंडमधील राजदूत होते. ते इ.स. १९५३ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आणि फेब्रुवारी ३, इ.स. १९५६ रोजी त्यांचा जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रीमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून समावेश झाला. ते इ.स. १९५७ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची काश्मीर प्रश्नावर बाजू मांडायला केलेले जानेवारी २३, इ.स. १९५७ रोजी केलेले आठ तासांचे भाषण संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात जास्त चाललेले भाषण आहे. एप्रिल इ.स. १९५८ मध्ये त्यांची भारताचे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाली. इ.स. १९६२च्या चीनविरूद्धच्या युद्धात भारताच्या झालेल्या पराभवानंतर सर्वत्र होत असलेल्या टिकेमुळे त्यांना संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण ते इ.स. १९६९ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत ते केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून लोक्सभेवर निवडून गेले. त्यांचे ऑक्टोबर ६, इ.स. १९७४ रोजी निधन झाले.