Jump to content

व्लादिमिर नाबोकोव्ह

व्लादिमिर नाबोकोव्ह
जन्म नाव व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह
जन्म २२ एप्रिल १८८९ (1889-04-22) ग्रेगोरियन कालमापन पद्धतीप्रमाणे [],
१० एप्रिल १८८९ (1889-04-10) ज्युलिअन कालमापन पद्धतीप्रमाणे
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य []
मृत्यू २ जुलै, १९७७ (वय ८८) []
माँत्रू, स्वित्झर्लंड []
कार्यक्षेत्र कादंबरीकार, प्राध्यापक, फुलपाखरांचा अभ्यासक
भाषा रशियन, इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी, कविता, नाटक
चळवळ आधुनिकतावाद, उत्तराधुनिकतावाद
प्रसिद्ध साहित्यकृती द डिफेन्स (१९३०),
द रियल लाइफ ऑफ सेबॅस्टिअन नाइट (१९४१),
लोलिता (१९५५),
पेल फायर (१९६२),
स्पीक, मेमरी
प्रभावित मार्टिन अमिस, मायकेल शेबॉन, झुम्पा लाहिरी, डॉन दे'लिल्लो
पत्नी वेरा नाबोकोव्हा
अपत्ये द्मित्री नाबोकोव्ह
स्वाक्षरीव्लादिमिर नाबोकोव्ह ह्यांची स्वाक्षरी
संकेतस्थळhttp://vladimir-nabokov.org

व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह (रशियन: Влади́мир Влади́мирович Набо́ков, २२ एप्रिल, १८८९ - २ जुलै, १९७७) (साचा:IPA-ru) हा एक रशियन-अमेरिकन कादंबरीकार होता. [] आपल्या पहिल्या ९ कादंबऱ्या रशियन भाषेत लिहिल्यानंतर त्याने इंग्रजीमध्ये लिखाणास सुरुवात केली. १९५५ साली प्रकाशित झालेली लोलिता कादंबरी ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे.’माँडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये लोलिता ही चौथ्या क्रमांकावर, पेल फायर ५३व्या आणि नाबोकोव्हची आत्मकथा स्पीक, मेमरी ही आठव्या क्रमांकावर आहे. [] लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये, वर्णनाचे बारकावे आणि शैलीदारपणा ही नाबोकोव्हच्या कामाची सर्वोत्तम खासियत होती.

कादंबऱ्या लिहिण्याबरोबरच नाबोकोव्हला फुलपाखरांचा अभ्यास करण्याची आणि बुद्धिबळाचे डावपेच लिहिण्याची देखील आवड होती.

जीवन

नाबोकोव्हचा जन्म रशियन साम्राज्यातील जुन्या उमराव कुटुंबात झाला होता []. त्याचे वडील कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रॅटिक पक्षाचे (केडेट पक्षाचे) नेते होते. १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर नाबोकोव्ह कुटुंबीयांनी क्रिमेआला पलायन केले. १९१९ मध्ये त्यांनी पश्चिम युरोपमध्ये आश्रय घेतला. नाबोकोव्हचे उच्च शिक्षण केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात झाले. शिक्षण संपल्यावर १९२२ मध्ये त्याने बर्लिनला स्थलांतर केले, आणि व्हेरा स्लोनिम या रशियन ज्यू स्त्रीशी १९२५ मध्ये बर्लिनमध्ये लग्न केले. []. १९३४ मध्ये जन्मलेला त्यांचा मुलगा द्मित्री हा त्यांचे एकुलते एक अपत्य होता.

नाबोकोव्हने अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे कीटकांचा अभ्यासक म्हणून विनापगारी काम सुरू केल्यावर, नाबोकोव्ह कुटुंबीयांनी १९३७ मध्ये न्यू यॉर्क शहराच्या मॅनहॅटनमध्ये स्थलांतर केले. [] साहित्याचा प्राध्यापक म्हणून त्याने १९४१ मध्ये वेलस्ली महाविद्यालयात काम करण्यास सुरुवात केली. ’लोलिता’च्या यशानंतर नाबोकोव्ह दांपत्य युरोपला परतले. १९७७ मध्ये माँत्रू, स्वित्झर्लंड येथे त्याचा मृत्यू झाला.

साहित्यकृती

नाबोकोव्ह यांनी कादंबऱ्यांप्रमाणेच कविता, लघुकथा आणि नाटकेही लिहिली. 'माशेन्का' ('मेरी'चे रशियन रूप) ही त्याची पहिली रशियन कादंबरी १९२६ मध्ये प्रकाशित झाली होती. 'द रियल लाइफ ऑफ सेबॅस्टिअन नाइट' (१९४१) ही त्यांची इंग्रजीतील पहिली कादंबरी. 'द गिफ्ट' ही नाबोकोव्ह्ची सर्वोत्तम रशियन कादंबरी मानली जाते.

लोलिता: १९२३पासून २००५ पर्यंत प्रकाशित झालेल्या १०० सर्वोत्कृष्ट इंग्लिश भाषेतील कादंबऱ्यांच्या टाईम मासिकाने केलेल्या यादीत लोलिता आहे. डोलोरेस या अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या हंबर्ट हंबर्ट या प्राध्यापकाची ही काल्पनिक कथा आहे. त्या काळात प्रसिद्ध झालेल्या ’युलिसिस’, ’लेडी चॅटर्लीज लव्हर’ या कादंबऱ्यांप्रमाणेच ’लोलिता’ या कादंबरीवरही अनैतिकतेचा शिक्का बसला होता. तरीसुद्धा या कादंबरीमुळे तोपर्यंत दारिद्‌ऱ्यात राहणाऱ्या नाबोकोव्ह यांना साहित्यिक आणि आर्थिक यश मिळाले.

स्पीक, मेमरी ही नाबोकोव्हने रशियामध्ये आणि युरोपमध्ये व्यतीत केलेल्या जीवनाची कहाणी आहे. [] या पुस्तकाला अमेरिकेतील आपल्या जीवनाचा वृत्तान्त जोडून त्याने १९६६ मध्ये पुन्हा आपले आत्मचरित्र लिहिले. []

निधन

माँत्रू, स्वित्झर्लंड येथील व्लादिमिर नाबोकोव्ह यांचे समाधिस्थळ

२ जुलै १९७७ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी स्वित्झर्लंड मधील माँत्रू येथे व्लादिमिर नाबोकोव्ह यांचे निधन झाले.

मृत्यूच्या दिवसापर्यंत ते 'ओरिजन ऑफ लॉरा' या पुस्तकाचे लेखन करीत होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c d e f नाबोकोव्हचे जीवनचरित्र - एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी मजकूर)
  2. ^ माँडर्न लायब्ररीच्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या (इंग्रजी मजकूर)
  3. ^ व्हिजिटिंग मिसेस नाबोकोव्ह and अदर एक्सकर्शन्स, मार्टिन अमिस (१९९३), पान ११५-११८, ISBN 0-14-023858-1 (इंग्रजी पुस्तक)
  4. ^ नाबोकोव्हने शोधलेली फुलपाखराची जात - लीसांद्रा कोर्मियम[permanent dead link] (इंग्रजी मजकूर)
  5. ^ उत्कृष्ट ललितेतर पुस्तके - Globalmarathi.com[मृत दुवा]
  6. ^ स्पीक, मेमरी - एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे