व्यंजन
मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.
- स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत).
- अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.य,र,ल,व)
- उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.श,ष,स)
- महाप्राण व्यंजन (हे एक आहे.ह)
- स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.ळ)
- स्पर्श व्यंजने (एकूण २५):
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. उदा. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- कठोर वर्ण
- मृदु वर्ण
- अनुनासिक वर्ण
१. कठोर वर्ण (१३) – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.यानाच श्वास, अघोष असे म्हणतात.
- उदा.: क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, ष, स.
२. मृदु वर्ण (३५)– ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. यांनाच नाद, घोषवर्ण असे म्हणतात.
- उदा.: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ ए, ऐ, ओ, औ, अं, आः,
ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ य, र, ल, व, ह, ळ, ङ, ञ, ण, न, म
३. अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केला जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
- उदा.: ङ, ञ, ण, न, म
वर्ग | कठोर | मृदु | अनुनासिक |
---|---|---|---|
क | क ख | ग घ | ङ |
च | च छ | ज झ | ञ |
ट | ट ठ | ड ढ | ण |
त | त थ | द ध | न |
प | प फ | ब भ | म |
ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो.
विभाजन
मराठी व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-
- कण्ठ्य - पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, आ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह् आणि विसर्ग. जिव्हामूलीय (दुःखमधील विसर्गसदृश अक्षर). अकुहविसर्जनीयां कण्ठ:।, जिव्हामूलीयस्य जिव्हामूलम्।
- तालव्य - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श्. इचुयशानां तालुः।
- मूर्धन्य - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्, ष्, ळ्. ऋटुरषाणां मूर्ध:।
- दन्त्य - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स्. लुतुलसानां दन्त:।
- ओष्ठ्य - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय ('कःपदार्थ'मधले विसर्गसदृश अक्षर) उपूपध्मानीयां ओष्ठ:।
कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.
मराठी लिपीत क्ष (क्ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्य वापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ (द्+न्+य्+अ) हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..
'श्' व 'ष्' यांत फरक काय
असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जिज्ञासूने वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे त्याच्या लक्षात येईल.
श-सदर वर्णाचा उच्चार करतांना वरच्या दाताच्या मागील बाजूस स्पर्श करावा. म्हणजे कठोर तालुला स्पर्श करूनच 'श' वर्णाचा अचूक उच्चार करता येतो.
ष-हे मूर्धन्य वर्ण आहे. 'ष'चा उच्चार करतांना जिभेचा शेंडा तालू व कंठ यास जाऊन भिडतो.म्हणजे 'ष'उच्चारतांना जिभेचा शेंडा मूर्धास घर्षण करून जातो.अशावेळेस 'ष'अचूक उच्चार बाहेर पडतो.
हे सुद्धा पहा
- वर्ण
- मराठी भाषेतील वर्णमाला
- मराठी व्याकरण विषयक लेख