व्यंकटेश मंदिर
व्यंकटेश उर्फ बालाजी मंदिर,महिकावती
हे मंदिर पालघर तालुक्यातील माहीम गावी पालघर-माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीमबाजार बसथांब्यावर आहे. पालघरवरून रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, दातिवरे, माकुणसार, दांडा, मथाणे, कोरे, उसरणी, भवानगड या गावांकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ह्या थांब्यावर थांबतात.येथे वरील गावांवरून रिक्षाने सुद्धा येता येते.
माहीमबाजार बसथांब्यापासून थोडे मागे उजव्या बाजूस हे मंदिर वसविलेले आहे. मंदिराच्या उत्तर दिशेकडून तांबळई रस्ता जातो व त्यापुढे ७०० मीटरवर अरबी समुद्र किनारा आहे.
दसरा उत्सव
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत नवरात्रीच्या काळात येथे उत्सव भरला जातो. दसऱ्यास सकाळी जवळच असलेल्या महादेव मंदिरात व्यंकटेश देवाचे तुळशी /ऋक्मिणीबरोबर लग्न विवाह साजरा केला जातो.त्याच दिवशी संध्याकाळी जवळच असलेल्या आपटा वृक्षाजवळ सरकारी अधिकारी तहसिलदार पालघर ह्यांचे हस्ते आपटा वृक्षाची पूजा केली जाते व सोनेलूटीचा महोत्सव साजरा केला जातो. आसपासच्या सर्व गावातून ह्या उत्सवात भाग घेतला जातो. आश्विन द्वितीयेपासून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वाहनावर व्यंकटेश देवाची पालखीतून मिरवणूक काढली जाते.पहिले वाहन मोर असते. मिरवणूक रात्री १० वाजता चालू होऊन रात्री ११ वाजता संपन्न होते.तृतीयेच्या दिवशीचे वाहन वाघ असते. चतुर्थीला मारुती वाहन असते. पंचमीला श्रींची रमा-लक्ष्मी सह गरुड वाहनावर पालखी काढली जाते. गरुडपंचमी असल्याने रात्री ९ ते १०.३० पर्यंत कीर्तन असते व त्यानंतर रात्री ११ ते १२ अशी पालखी काढली जाते. षष्ठीला वाहन शेष (नाग) असते.सप्तमीला वाहन घोडा असते. अष्टमीला वाहन हत्ती असते. नवमीला पालखी सोहळा नसतो. दशमी अर्थात दसरा सणाला सकाळी ६ ते ७ कीर्तन असते व श्रींची सकाळी ७.३० वाजता हरीण वाहनावर मिरवणूक काढली जाते आणि सकाळी ८ ते ९ दरम्यान श्रींचा शंकर मंदिरात तुळशीचा विवाह सोहळा साजरा करण्यात येतो. पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत कीर्तन असते व संध्याकाळी ६.३० वाजता घोडा वाहनावर श्रींची रथ मिरवणूक काढली जाते व आपट्याच्या झाडाजवळ पालघर तहसीलदार यांचे हस्ते पूजा केली जाते व सीमोल्लंघनाचा उत्सव साजरा केला जातो. उत्सव सोहळ्यात आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात व देताना 'जय गोपाळ' किंवा 'जय व्यंकटेश' बोलले जाते.एकादशीला सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्रींचे समुद्र स्नान केले जाते व श्रींची रमा-लक्ष्मीसह गरुड वाहनावर रथ मिरवणूक काढली जाते.त्याच रात्री ९ ते १०.३० कीर्तन असते व त्यानंतर १०.३० ते ११ वाजेपर्यंत वराह वाहनावर श्रींची रथ मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर शेज आरती व तीर्थप्रसाद होतो व उत्सव संपन्न होतो.
संदर्भ
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
बाह्य दुवे
https://www.facebook.com/116089225408331/posts/961919174158661/?sfnsn=wiwspmo