वॉल्त्झ नृत्य
वॉल्त्झ नृत्य हा एक जर्मन नृत्यप्रकार आहे. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत ऑस्ट्रियन आणि बव्हेरियन शेतकऱ्यांच्या नृत्यांमध्ये वर्तुळाकार जलद गतीतील हे लोकप्रिय नृत्य ‘वेलर’ या नावाने प्रसिद्ध होते. ‘लेण्ड्लर’ या जर्मन लोकनृत्यामध्येही वॉल्ट्सची बीजे आढळतात.
उच्चभ्रू समाजातील लोकही जेव्हा या नृत्यप्रकाराकडे आकर्षिले गेले, तेव्हा त्याला सामाजिक प्रतिष्ठा लाभली. स्त्रीपुरुषांनी एकमेकांना बाहुपाशात घेऊन करण्यात येणारा हा नृत्यप्रकार सुरुवातीला उत्तान मानला जाई परंतु फ्रेंच राज्यक्रांतीनंतर सर्व यूरोपीय कलाक्षेत्र स्वच्छदतांवादाच्या प्रभावाखाली आले आणि या नृत्यप्रकाराने पाश्चात्त्य नृत्यक्षेत्रात स्वच्छंतावादी क्रांती घडवून आणली. जर्मनी आणि फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये वॉल्ट्सचा प्रसार झाला. ⇨ मोट्सार्टने (१७५६-९१) व्हिएन्नीज युग्मनृत्यासाठी (बॉल) वॉल्ट्सच्या रचना केल्या आहेत. मार्यूस पेतिपा
(१८१९-१९१०) या फ्रेंच नृत्यविशारदाने वॉल्ट्स संगीताचा नृत्यलेखक म्हणून खूप लोकप्रियता मिळविली. द स्लीपिंग ब्यूटी, द स्वॉन लेक, रेमोण्डा, द वॉल्ट्स ऑफ द फ्लावर्स इत्यादींसाठी पेतिपाने केलेल्या नृत्यरचना प्रसिद्ध आहेत मोठ्या जनसमुदायाच्या संमेलनामध्ये करण्यात येणाऱ्या या बॉलरूम नृत्याचे दोन प्रकार आहेत.
वर्तुळाकार गतीतील या नृत्याचा ताल ३/४ भागात असून, व्हिएन्नीज वॉल्ट्समध्ये स्त्रीपुरुष युगुले जलद गतीत एकाच दिशेत वर्तुळाकार वळतात तर बॉस्टनमधील वॉल्टसमध्ये स्त्रीपुरुष युगुले अनेक वर्तुळांच्या आकृतिबंधातून अनेक दिशांमध्ये फिरून संथ लयीत नृत्य करतात. १८४० च्या सुमारास पुढे आलेल्या ⇨पोल्क या नृत्यप्रकारामुळे वॉल्ट्सची लोकप्रियता जरी ओसरू लागली, तरी पश्चिमी समाजांमध्ये आजही हा कलाप्रकार टिकून आहे. पाश्चात्त्य संगीतामध्येही वॉल्ट्सचा अंतर्भाव झालेला असून तेथील बोलपटांतून ते लोकप्रिय झाले आहे.
मोट्सार्टप्रमाणे ⇨फ्रेदेरीक शॉर्प, मॉरिस रॅव्हेल हे संगीतरचनाकार वॉल्ट्सच्या रचनांसाठी प्रसद्धि असून, व्हिएन्नीज वॉल्ट्सच्या संगीतरचनांसाठी जोहान स्ट्राऊस (ज्यूनिअर), एदुआर्द स्ट्राऊस, फ्रँझ लेहर आणि ऑस्कर स्ट्राऊस हेही प्रसिद्ध आहेत. भारतीय चित्रपटसंगीतामध्ये वॉल्ट्स या नृत्यप्रकाराचे संगीत १९५०-५५ पर्यंत सातत्याने वापरले गेले. व्हिएन्नीज वॉल्ट्स या प्रकारात ‘फर्स्ट लेडी’ या नात्याने कारमेन मिरान्दा ह्या गोमंतकीय युवतीला १९७५ मध्ये एका प्रमुख समारंभाचे नृत्याद्वारा उद्घाटन करण्याचा सन्मान लाभला होता. पश्चिमी नृत्यकलेला एकेकाळी नवे चैतन्य देणाऱ्या या कलाप्रकाराला पौर्वात्य वळण देण्यात पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेल्या गोमंतकीय संगीतकारांनी खूप यश मिळवले आहे. आजही महाराष्ट्रातील पारशी लोकांमध्ये लग्नसमारंभात आणि अन्य आनंदोत्सवप्रसंगी वॉल्ट्स नृत्य करण्याचा प्रघात आहे.
संदर्भ
- ^ "https://vishwakosh.marathi.gov.in/32561/". External link in
|title=
(सहाय्य)