वॉर्न-मुरलीधरन चषक
वॉर्न-मुरलीधरन चषक | |
---|---|
देश | ऑस्ट्रेलिया श्रीलंका |
आयोजक | क्रिकेट ऑस्ट्रेलिया श्रीलंका क्रिकेट |
प्रकार | कसोटी क्रिकेट |
प्रथम | २००७-०८ |
शेवटची | २०१६ |
पुढील | २०१८-१९ |
स्पर्धा प्रकार | कसोटी मालिका |
संघ | २ |
यशस्वी संघ | ऑस्ट्रेलिया (३ वेळा) |
सर्वाधिक धावा | मायकेल हसी (९९४) [१] |
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (५६) [२] |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६ | |
२००७-०८ मोसमापासून ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी मालिका विजेत्याला वॉर्न-मुरलीधरन चषक देऊन गौरविण्यात येते. सदर चषकाचे नामकरण हे कसोटी क्रिकेटमधील दोन अव्वल गोलंदाजांच्या नावावरून देण्यात आले आहे, श्रीलंकेचा मुथिया मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न.[३] ह्या चषकाने ऑस्ट्रेलिया-श्रीलंका कसोटी क्रिकेटचा २५वा वर्धापनदिन साजरा केला.[४] चषकावर दोन्ही गोलंदाजांच्या उजव्या हाताचे साचे आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वापरलेले चेंडू यांचा समावेश आहे.[५] श्रीलंकेमधील क्रिकेटचे नियामक मंडळ श्रीलंका क्रिकेटने, त्यांचे ऑस्ट्रेलियाचे सहकारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला लिहिले की, विजेत्याला दोन गोलंदाजावरून नाव दिला गेलेला चषक देण्यात यावा.[६] ज्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शवली. चषकाचे अनावरण करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विधान केले की,
... क्रिकेट जगताच्या इतिहासातील दोन महान गोलंदाजानी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या एका शाश्वत पारितोषिकाला त्यांची नावे दिले आहे.[४]
ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी दिला जाणारा बॉर्डर-गावस्कर चषक, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेसाठी दिला जाणारा चॅपेल-हॅडली चषक यानंतर वॉर्न-मुरलीधरन चषक हे माजी क्रिकेट खेळाडूंच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यादीमधील नवीन नाव आहे.[७]
इतिहास
पार्श्वभूमी
वॉर्न-मुरलीधरन चषकाआधी, (१९८३-२००४), ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका २१ वर्षांत १८ वेळा आमने-सामने आले, ज्यामध्ये प्रत्येक देशात चार मालिका झाल्या. १८ कसोट्यांमधून ११ ऑस्ट्रेलियाने जिंकल्या तर श्रीलंकेला फक्त १९९९ मध्ये एकदाच विजय मिळविता आला, आणि ६ सामने अनिर्णित राहिले.[८] ह्या कसोटी मालिका खालीलप्रमाणे होत्या:
वर्ष | यजमान | सामने | विजेते | फरक |
---|---|---|---|---|
१९८२-८३ | श्रीलंका | १ | ऑस्ट्रेलिया | १-० |
१९८७-८८ | ऑस्ट्रेलिया | १ | ऑस्ट्रेलिया | १-० |
१९८९-९० | ऑस्ट्रेलिया | २ | ऑस्ट्रेलिया | १-० |
१९९२ | श्रीलंका | ३ | ऑस्ट्रेलिया | १-० |
१९९५-९६ | ऑस्ट्रेलिया | ३ | ऑस्ट्रेलिया | ३-० |
१९९९ | श्रीलंका | ३ | श्रीलंका | १-० |
२००३-०४ | श्रीलंका | ३ | ऑस्ट्रेलिया | ३-० |
२००४ | श्रीलंका | २ | ऑस्ट्रेलिया | १-० |
पहिली मालिका
२००७ साली ७०८ बळी मिळवून शेन वॉर्न क्रिकेटमधून विवृत्त झाला आणि मुथिया मुरलीधरन २००७-०८ मालिकेच्या सुरुवातील वॉर्न पासून अवघे आठ बळी दूर होता.[९] रिकी पाँटिंगने नमूद केले की मुरलीधरनला वॉर्नचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक बळींचा विक्रम मोडण्यासाठी आवश्यक असलेले ९ बळी ऑस्ट्रेलियामध्ये असताना मिळवून द्यायचे नाहीत असा त्याने निश्चय केला होता.[१०] मालिकेच्या शेवटपर्यंत मुरलीधरनला अवघे चार गडी बाद करता आले. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसह चषक २-० ने जिंकला.[११] दुसऱ्या कसोटीमध्ये, कुमार संगाकाराला पंच रुडी कोर्टत्झन यांनी तो १९२ धावांवर खेळत चेंडू खांद्याला लागलेला असताना झेलबाद दिले.[१२] सामन्यानंतर कोर्टत्झनने संगाकाराची माफी मागितली. मालिकेदरम्यान श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अटापट्टुने निवड समितीचे अध्यक्ष अशांत डिमेल यांना उल्लेखून निवड समितीवर "मपेट्स हेडेड बाय जोकर" असे म्हणून टीका केली. [१०] मालिका संपल्यानंतर अटापट्टु क्रिकेट मधून निवृत्त झाला.
२०११ मधील मालिका
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसी, नाथन ल्योनने त्याच्या पहिल्याच चेंडूवर कुमार संगाकाराला बाद करून पहिला कसोटी बळी मिळवला; असे करणारा तो १४ आंतरराष्ट्रीय आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू. त्याने ३४ धावांमध्ये ५ गडी बाद केले, आणि कसोटी पदार्पणात पाच बळी घेणारा तो १३१वा खेळाडू ठरला.[१३] त्याशिवाय, ट्रेंट कोपलँडने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर पहिला बळी घेतला; त्याने तिलकरत्ने दिलशानला बाद केले. तसेच पहिल्या कसोटीमध्ये आयसीसीने मान्यकेले की हॉक-आय किंवा इगल-आय चूक करु शकते.
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शमिंदा एरंगाने त्याच्या पहिल्या चेंडूवर पहिला कसोटी बळी घेतला; त्याने शेन वॉटसनला बाद केले. त्याशिवाय पहिल्या दिवशी शॉन मार्श २२२ची सरासरी पार करु शकला, ऑस्ट्रेलियन फलंदाजीमधील हा एक विक्रम आहे. [१४]
तिनही कसोटी सामन्यांचा सामनावीराचा पुरस्कार मायकल हसीला मिळाला त्याशिवाय त्याला मालिकावीर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले.
२०१२-१३ मधील मालिका
ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
पहिल्या कसोटीदरम्यान सामना प्रसारण करणाऱ्या फुटेजमध्ये पीटर सिडल चेंडूशी फेरफार करताना दिसल्याने थोडा वाद निर्माण झाला होता, परंतु त्याच्या विरोधात औपचारिक तक्रार न होता सदर वाद मिटला.[१५] पुराव्याअभावी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने नंतर सिडलला निर्दोष घोषित केले.[१६]
मेलबर्न येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने कारकिर्दीतील १०,००० धावा पूर्ण केल्या, आणि हा टप्पा सर्वात जलद पार करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१७]
सिडनी मधील शेवटच्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू मायकल हसीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.[१८]
२०१६ मधील मालिका
या मालिकेआधी श्रीलंकेची कामगिरी अगदीच वाईट झाली होती, त्यांना इंग्लंडमध्ये सर्व प्रकारांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. पल्लेकेले मध्ये झालेली पाहिली कसोटी दोन गोष्टींमुळे संस्मरणीय ठरली एक कुशल मेंडीसचे पहिले कसोटी शतक (१७६) आणि रंगना हेराथची गोलंदाजी ज्यामुळे श्रीलंकेने सामना १०६ धावांनी जिंकला. हा त्यांचा पाहुण्या संघावर १७ वर्षांनंतर पहिला कसोटी विजय होता. विजयामुळे यजमानांना एक आत्मविश्वास मिळाला ज्याचा फायदा त्यांना गॅलेमधील दुसऱ्या कसोटीत झाला. हेराथ आणि दिलरुवान परेरा ह्यांच्या कामगिरीमुळे श्रीलंकेने सामना २२९ धावांनी जिंकला. सामन्यामध्ये ह्या फिरकी जोडगोळीने २० पैकी १८ गडी बाद केले.
एसएससी वरील तिसऱ्या कसोटीमधील पहिल्या डावात दिनेश चंदिमल आणि धनंजय डी सिल्वा ह्यांनी पहिल्या डावात शतके झळकावली. उत्तरादाखल, शॉन मार्श आणि स्टीव्ह स्मिथ ह्यांनी शतके झळकावली. तिसऱ्या आणि अतिमहत्त्वाच्या डावामध्ये, कुशल सिल्वाने झळकावलेल्या शतकामुळे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवले. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली, फक्त डेव्हिड वॉर्नर अर्धशतकापर्यंत मजल मारु शकला आणि इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावाही करता आल्या नाहीत. हेराथने सामन्यात १३ बळी घेतले आणि श्रीलंकेने १६३ धावांनी विजय मिळवला आणि इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला. हेराथला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. ह्या विजयासहीत कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेचा संघ कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या वर गेला तर ऑस्ट्रेलियाला आपले अव्वल स्थान गमवावे लागले.
वॉर्न-मुरलीधरन चषक मालिकांची यादी
मालिका | मोसम | यजमान | पहिला सामना | एकूण कसोटी सामने | ऑस्ट्रेलिया विजयी | श्रीलंका विजयी | अनिर्णित | मालिकावीर | मालिका निकाल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | २००७-०८ | ऑस्ट्रेलिया | ८ नोव्हेंबर २००७ | २ | २ | ० | ० | ब्रेट ली | ऑस्ट्रेलिया |
२ | २०११ | श्रीलंका | ३१ ऑगस्ट २०११ | २ | १ | ० | २ | मायकल हसी | ऑस्ट्रेलिया |
३ | २०१२-१३ | ऑस्ट्रेलिया | १४ डिसेंबर २०१२ | ३ | ३ | ० | ० | मायकल क्लार्क | ऑस्ट्रेलिया |
४ | २०१६ | श्रीलंका | २६ जुलै २०१६ | ३ | ० | ३ | ० | रंगना हेराथ | श्रीलंका |
5 | २०१८-१९ | ऑस्ट्रेलिया | जानेवारी/फेब्रुवारी २०१९ | २ | – | – | – | – |
ऑस्ट्रेलिया विजयी (ऑगस्ट २०१६ पर्यंत) | श्रीलंका विजयी (ऑगस्ट २०१६ पर्यंत) | अनिर्णित |
---|---|---|
६ | ३ | २ |
टाईमलाईन
संदर्भ आणि नोंदी
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / मायकल हसी / कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / रंगना हेराथ / कसोटी सामने". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्न-मुरलीधरन चषकाचे अनावरण". एबीसी न्यूझ. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "वॉर्न-मुरली ट्रॉफी गोज ऑन द लाईन". एबीसी न्यूझ. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नवीन वॉर्न-मुरलीधरन चषकाची घोषणा". cricket.com.au. 2009-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्न-मुरली चषकासाठी ऑस्ट्रेलियाने लढा देण्याची श्रीलंकेची इच्छा". एबीसी न्यूझ. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ क्रिकइन्फो स्टाफ. "वॉर्न-मुरलीधन चषकासाठी संघ लढणार". क्रिकइन्फो. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया कसोटी" (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "वॉर्न-मुरलीधरन चषकाचे अनावरण" (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b कॉवर्ड, माईक. "ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका २००७-०८". विस्डेन क्रिकेटर्स अल्मानाक (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय". cricketnews.com.au (इंग्रजी भाषेत). 2009-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ इंग्लिश, पीटर. "कोर्टत्झनने संगाकाराची माफी मागितली". क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "गोलंदाजी नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अनदर फर्स्ट-बॉल विकेट अँड द माईलस्टोन दॅट वॉजन्ट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दूरचित्रवाणी रिप्लेमुळे श्रीलंकेला चेंडू फेरफार घटनेची चिंता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "चेंडू फरफारीचे कोणतेही पुरावे नाहीत, आयसीसी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "जॉन्सन आणि मित्रपरिवारामुळे ऑस्ट्रेलियाचा दिवस साजरा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मायकल हसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.