वैराटगड
वैराटगड | |
वैराटगड किल्ला | |
वैराटगड | |
नाव | वैराटगड |
उंची | ३३४० फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | म्हसवे आणि व्याजवाडी |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | तटबंधी, अवशेष आणि मंदिरे |
स्थापना | ११७८ ते ९३ शिलाहार राजा भोज |
वैराटगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला असून कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने ११ व्या शतकामध्ये इ.स. ११७८-११९३ या कालखंडामध्ये तो बांधला.[१]
इतिहास
शिवाजी महाराजांच्या काळात याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश केला. ब्रिटीशांनी इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला काबिज केला.
शिलाहार राजा भोजने हा गड ११७८ ते ९३ या काळात बांधला.[२] प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्या वाई शहराचा पाठीराखा म्हणून याचे नाव वैराटगड. शिवकाळातील कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात या वैराटनगरीचा उल्लेख आला आहे. शिलाहारानंतर यादव, आदिलशाही, शिवशाही, मुघल पुन्हा मराठे आणि शेवटी इंग्रज असे हे इतिहासातील थांबे या गडाने अनुभवले. औरंगजेबाने इसवी सन १६९९ मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे कधीतरी सर्जागड असेही नामकरण झाल्याचेही इतिहास सांगतो.[ संदर्भ हवा ]
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
गडदा
गडाच्या दक्षिण बाजूला कातळात कोरीव अशा पाच पाण्याचे टाके आहेत. त्यांना गडदा असे बोलतात. आजूबाजूच्या परिसरात असलेली लेणी आणि इतर अवशेष पाहता ह्या गडदा पांडवकालीन असाव्यात असं वाटतं. गडदांना स्थानिक लोक पाच पांडवांच्या नावांनी संबोधतात. गडदांमधील पाणी स्वच्छ, थंडगार आणि तिन्ही ऋतूमध्ये तहान भागविण्यासाठी उपलब्द असते. आणि वैराटेश्वर प्रतिष्ठान आणि स्थानिक लोकांच्या पुढाकाराने गडदांचे योग्य प्रकारे संवर्धन केलेले आहे.
महादरवाजा
गडदांपासून पुढे चालत आल्यानंतर भव्य अशा महादरवाजाचे भग्न अवशेष दिसतात.गडाला एकापाठीएक असे दोन दरवाजे आहेत. त्यांच्या कमानी कधीच ढासळलेल्या आहेत. परंतु भोवतीच्या भिंती, उंबरा, अलंगांनी मात्र अजून घट्ट पाय रोवलेले आहेत. कातळाची नैसर्गिक तटबंदी आणि त्यावर अजून तटबंदीचे बांधकाम यावरून किल्ल्याच्या भक्कम पणाचा अंदाज येतो. महादरवाजाचा उंबरठा आणि शेजारचे काही अवशेष सोडता इथे काहीही नाही. महादरवाजाच्या शेजारी तोप ठेवण्यासाठी सारखी नैसर्गिक जागा आहे. सद्या तिथे तोफा नाहीत परंतु आजूबाजूची सौंदर्य न्याहाळण्यासाठी ती जागा योग्य वाटते. तिथून वाई परिसराचा नजारा काही औरच दिसतो. महादरवाजाच्या जवळ पहारेकऱ्यांच्या दिवड्याचें आणि खोल्यांच्या अवशेष दिसतात. महादरवाजाच्याच शेजारून खालच्या साईडला लक्ष्मी मातेचे मंदिर आहे. तसेच महादरवाजाच्या खालच्या साईटला एक भुयारी मार्ग आहे अत्यंत अरुंद असा मार्ग असल्याने आणि गड परिसरात तरस कोल्हे, रानडुक्कर यांच्या वास्तव्यामुळे आतमध्ये जाणे टाळावे.
गडमाता आणि पुरातन अवशेष
महादरवाजातुन वर प्रवेश करताच थंडगार वाऱ्याच्या झुळूक अंगाला स्पर्श करते. खालून एखाद्या टोपीसारखा वाटणारा हा गड वर आल्यावर मात्र एखाद्या मैदानाप्रमाणे पुढय़ात येतो. या पठारावरच मग एकेक वास्तू खुणावत पुढे येते. सदर, वाडे, शिबंदीची घरे, मंदिरे अशा अनेक बांधकामांचे हे ढिगारे आणि अवशेष वर दिसतात. म्हसोबा, लाल शेंदूर फासलेले दगड, शिवलिंग ठिकठिकाणी आढळतात. नुकतेच काही स्थानिक मुलांनी उत्खनन केले असता एक पाटा, वरवंटा, दगडी समई, उखळ, धातूचा हंडा आशा प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. अजून खोदकाम केलं तर गडाची रचना आणि शस्त्र वगैरे सापडू शकतात.
तटबंधी आणि भुयारी मार्ग
पूर्व पश्चिम असा विस्तरलेला गडाचा घेर तसा फार मोठा नाही . अभेद्य काताळरूपी नैसर्गिक तटबंधी गडाला लाभली आहे. आणि जिथे गरज आहे तिथे तटबंदीचे तोरण लावलेले आहे. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये हा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. बुरुज आणि ताटबंधी आज ढासळला असला तरी त्याची एकेकाळीची भव्यता लक्षात येते. सर्पाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरूज, मारगिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, शोचकुपांची योजना आहेत.
गडाच्या तटातूनच पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी म्हसवे गावा साईटला उतरते. सद्या वाट निसरडी असल्याने तिथून खाली उतरण्याची रिस्क घेऊ नये. शेजारी चोरखिंड आहे.
वैराटेश्वर मंदिर
महादरवाजापासून सरळ पूर्व बाजूला चालत गेल्यानंतर अनेक तळी लागतात. ही तळी गडावरील इमारती बांधण्यासाठी जे दगड वापरले त्यासाठी खोदण्यात आली असावीत. त्याचप्रमाणे तटबंदीसाठी ही याच तळ्यातील तळ्यातील दगड वापरले असावेत. मंदिराकडे जाताना एक पार लागतो. पारावर बसून गप्पा मारून थोडं पुढे गेल्यावर एक छानसे मंदिर आढळते. पुरातन दगडी गाभारा आणि नवीन बनविलेला पत्र्याचा सभांडप असलेले हेच ते वैराटेश्वर महादेवाचे मंदिर! मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात संत अभयानंद गिरी महाराजांच वास्तव्य होत. अगदी पाच दहा वर्षपूर्वी शेजरच्या इमारती मध्ये अभयानंद महाराजांचे शिष्य राहत होते. मंदिराच्या सभा मंडपामध्ये एका वेळेस चाळीस-पन्नास लोक बसू शकतात. तसेच शेजारच्या घरामध्ये(जे की आता बंद असते) 20 ते 25 लोक राहू शकतात.
वैराटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी थोडं वाकून जावं लागतं. आत मध्ये सुबक अस शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. गडावरती येण्यासाठी केलेली चढाई या प्रसन्नतेत जशी हरवून जाते समजतही नाही. गाभाऱ्याच्या बाहेर एक नंदी आणि कासव आहे. नंदी नुकताच तलाव साफ करताना सापडलेला आहे. मंदिराच्या सभा मंडपात यज्ञ करण्यासाठी यज्ञ बनवलेला आहे.
वैराटेश्वर मंदिराच्या बाजूला यमाई देवीचे मंदिर जीर्ण अवस्थेत शेवटच्या घटिका मोजत आहे.
वीरगळ आणि सतीशीळा
मंदिराच्या सभामंडपामध्ये एक वीरगळ पहायला मिळते. एखाद्या व्यक्तीला लढाई करताना अथव गावाची रक्षा करताना अथवा गुरांचे संरक्षण करताना वीरमरण आले तर त्याची आठवण म्हणून कोरलेला दगड होय. मंदिरा बाहेर असणारी वीरगळ ही लढाईत वीरमरण आलेल्या योद्धयची आहे.
विरगळीच्या बाजूलाच एका सपाट दगडावर हाताच्या कोपरात काटकोनात दुमडलेला स्त्रीच्या हाताचा पंजा दाखविला असून मनगटात चुडा भरलेला, दंडावर चोळीचा भाग, तळहातावर गोल प्रतीक असलेले चिन्ह स्पष्ट दिसत आहे. मध्ययुगीन कालखंडात युद्धात वीरमरण आलेल्या विराची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरीव शिळा उभारत असत. या शिळेवर काटकोनात स्त्रीचा कंकणाकीत हात दाखविला जातो त्यास सतीशिळा असे म्हणतात.
मारुती मंदिर
वैरागडावर महादरवाजाच्या बाजूला एक मंदिर आहे. त्यामध्ये मारुतीची सुबक मूर्ती आहे. सध्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक तिथे उभारले आहे. मारुती मंदिराच्या बाहेर अजून एक मारुतीची मूर्ती आहे, कदाचित महादरवाजा पडल्यामुळे महादरवाजाच्या आजूबाजूला असलेली मूर्ती तिथे स्थान बद्द केली असावी.
प्राचीन शिलालेख
गडाच्या पश्चिम बाजूला आणि चोरवाटेच्या वर पातळ दगडावर दोन्ही बाजूला अस्पष्ट असा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेख जमिनीत गाडलेल्या चिऱ्यासारखा आहे. त्या शिलालेखाची अजून उकल झाली नाही.