वैमानिक
विमान चालकाला वैमानिक असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते. लढाऊ वैमानिकांना वेगळे प्रशिक्षण दिलेले असते. भारतीय हवाई दलातील महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला वैमानिक भूपाली वडके ही आहे.
प्रशिक्षण
वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा दर्जा उच्च असतो. त्यात नेमकेपणा आणि शिस्त असते. वैमानिक होण्यासाठी तंत्रज्ञानाचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते. वैमानिकाच्या प्रशिक्षणामध्ये हवाई वाहतूक नियंत्रण, हवामानशास्त्र, रेडिओ, नॅव्हिगेशन, विविध यंत्रांची देखभाल यांचा अंतर्भाव असतो. वैमानिकांचे प्राविण्य आणि नैपुण्य सूक्ष्म दृष्टिने तपासून मगच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. वैमानिक प्रशिक्षण हे वेगवेगळ्या विमानांसाठी निरनिराळे असते. ऐनवेळी एखादा भाग अथवा इंजिने बंद पडल्यास किंवा निकामी झाल्यास, आणीबाणीच्या परिस्थितीला शांतपणे सामोरं जाऊन योग्य निर्णय घेणे, सातत्याने जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे योग्य पालन करणे, हे प्रशिक्षण वैमानिकाला दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतरच त्यांची नेमणूक विशिष्ट विमानांसाठी होते. या शिवाय प्रशिक्षणात वैमानिक आणि तंत्रज्ञांची मानसिकताही बारकाईने तपासली जाते. भारतात वैमानिक प्रशिक्षण घेण्यासाठी डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन (डी. जी. सी. ए.) या संस्थेच्या मान्यता असलेल्या संस्थेमध्येच प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. भारतात वैमानिक प्रशिक्षण इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अॅकॅडमी देते.
खासगी वैमानिक परवाना
खासगी वापरासाठी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन हा परवाना मिळतो. यासाठी १०वी उत्तीर्ण असणं आवश्यक असते. तसेच वय १७ र्वष पूर्ण असले पाहिजे. ७० तासांच्या हवाई प्रशिक्षणानंतर परीक्षा देऊन खासगी वैमानिक परवाना मिळतो. यानंतर एक इंजिन असलेल्या प्रवासी अथवा मालवाहतूक करणाऱ्या विमानाचा वैमानिक बनता येते. मात्र यासाठी आर्थिक मोबदला घेता येत नाही.
व्यावसायिक वैमानिक परवाना
व्यावसायिक वैमानिक परवाना प्रशिक्षणामध्ये २५० तासांचे हवाई प्रशिक्षण पूर्ण केले जाते. १८ महिन्यांच्या या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकां समवेत आणि स्वतंत्रपणे विमान उड्डाण करायला शिकवले जाते. मात्र या प्रशिक्षणासाठी यासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे व वय किमान १७ वर्षे असणे आवश्यक असते.
तंत्रज्ञान
वैमानिकाला तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यावा लागतो. विमान वर चढताना आणि खाली उतरताना मार्गदर्शन करणाऱ्या यंत्रणेसारखीच अंतरासाठी मार्गदर्शन करण्यासाठीची यंत्रणाही असते. ही यंत्रणा वापरून विमान योग्य रितीने आकाशात अथवा जमिनीवर आणावे लागते.
निर्बंध
वैमानिकांची शारीरिक तपासणीही होते. मद्याचा अंमल अथवा हँगओव्हर असेल तर त्याला त्या दिवसाचे काम मिळत नाही. असे काम केल्यास त्यावर कारवाई होते.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- [www.dgca.nic.in डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन यांचे संकेतस्थळ] (इंग्रजी)
- [www.igrua.com इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अॅकॅडमी] (इंग्रजी)